साताऱ्यात उदयनराजेंना उमेदवारी नाकारणं शरद पवारांना परवडणार?

    • Author, स्वाती पाटील-राजगोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी साताऱ्याहून

"उमेदवारीबाबत माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सर्वसामान्य माणसाला उमेदवारी द्या, माझी हरकत नाही. पण मी निवडणुकीला उभा राहणारच. उमेदवारी द्यायची की नाही हा त्यांचा प्रश्न आहे," हे म्हणणं आहे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचं. ते बीबीसी मराठीशी बोलत होते.

उदयनराजे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी ही भेट कामानिमित्त असल्याचं जरी सांगितलं असलं तरी राज्यात यावरून बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्याला कारणही तसंच आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार हे साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना उदयनराजे यांनी केलेलं वक्तव्य आणि पवार यांनी घेतलेल्या भेटीगाठी यानंतर उदयनराजे यांच्या उमेदवारीबाबत वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत.

"शरद पवार यांच्यावर आपला विश्वास आहे आणि साताऱ्याबाबत ते योग्य निर्णय घेतील. उदयनराजेंना आपला पाठिंबा नाही मात्र पवारांना पाठिंबा आहे," हे वक्तव्य आहे उदयनराजेंचे चुलतभाऊ आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं.

छत्रपतींच्या गादीचं स्थान म्हणून ओळख असलेल्या साताऱ्यात सध्या छत्रपतींच्याच वंशजांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसमधून विरोध होत असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे यांनी बीबीसीशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे.

'युट्यूबवर बघायला बरं वाटतं'

राष्ट्रवादी काँग्रेसमधून उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा सुरु झाली ती सातारा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर.

या भेटीबाबत विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर म्हणतात की, "उमेदवारीबाबत अंतिम निर्णय जो घ्यायचा आहे तो शरद पवारच घेतील, पण अर्थात आमदारांच्या विरोधाबाबत बोलाल तर त्यांना गेल्या वर्षभरात जे काही अनुभव आले त्याबाबत ते बोलले आहेत. अर्थात शरद पवार जो काही निर्णय घेतील त्यासोबत राष्ट्रवादीचे सर्व नेते कार्यकर्ते असतील."

उदयनराजेंनी वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे किंवा वक्तव्य करतात. याबाबत विचारलं असता रामराजे म्हणाले की "ते ज्या पद्धतीनं वागतात तो त्यांचा ब्रँड होऊन गेला आहे. आता लोक ते किती सिरियसली घेतात हा वेगळा वादाचा मुद्दा आहे. पक्षावर त्याचा फार काही परिणाम होत नाही. वेळ जात नसेल युट्यूबवर बघायला असं बरं वाटतं."

शरद पवारांच्या भेटीबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, "शरद पवार यांच्या भेटीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा आढावा घेतला गेला. लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली नाही. अर्थात पक्षीय पातळीवर शरद पवार जो निर्णय घेतील तोच मान्य असेल."

'मी उच्चस्तरीय समिती मानत नाही'

राष्ट्रवादीत काँग्रेसच्या या नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर आम्ही थेट बोललो ते खासदार उदयनराजे भोसलेंशी. साताऱ्यातल्या इतर नेत्यांपाठोपाठ उदयनराजे भोसले यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे.

याबाबत उदयनराजे यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं, "मला स्वाभिमानानं जगू द्या इतकी माफक मागणी मी शरद पवारांकडे केली आहे. उमेदवारीबाबत माझं म्हणणं असं आहे की, सर्वसामान्य माणसाला उमेदवारी द्या माझी हरकत नाही. पण मी निवडणुकीला उभा राहणारंच. तसंच उमेदवारी बाबत पक्षाची उच्चस्तरीय समिती निर्णय घेईल. उमेदवारी द्यायची की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण पक्षाच्या उच्चस्तरीय समितीला आपण मानत नाही."

यावेळी परिस्थिती बदली आहे का?

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या गोंधळावर आम्ही ज्येष्ठ पत्रकार हरीश पाटणे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या सातारा जिल्ह्यात मजबूत स्थितीत आहे.

"सातारा मतदारसंघात शरद पवार हे उदयनराजे यांनाच उमेदवारी देणार असं वाटतंय. पहील्या टर्म वेळी उदयनराजे भोसले याना उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आग्रह होता. मात्र नंतर पक्षविरोधी वक्तव्य, विरोधी भूमिका यामुळे गेल्या टर्मला उदयनराजे यांना विरोध सुरू झाला. पण तरीही पक्ष आदेश म्हणून उदयनराजे यांना निवडून आणण्यासाठी पक्षानं पूर्ण क्षमतेनं काम केलं. पण यावेळची परिस्थिती बदलली आहे."

"उदयनराजे यांना असलेला विरोध वाढताना दिसतोय. एकीकडे आमदार शिवेंद्रराजे यांचा उघड विरोध आहे तर इतर आमदारांचा विरोध ही वाढताना दिसतोय. त्यामुळे उदयनराजे यांना जरी लोकसभेची उमेदवारी दिली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जोमाने काम करतील असं चित्र सध्या तरी नाही.

कराड, पाटण या तालुक्यात उदयनराजे यांना टोकाचा विरोध आहे. त्याचा परिणाम म्हणून कार्यकर्ते पूर्ण क्षमतेनं काम करणार नाहीत अशी शक्यता आहे. त्यामुळे उदयनराजे जरी निवडून आले तरी त्यांचे मताधिक्य कमी होईल असं चित्र निर्माण झालं आहे."

शरद पवार काय करणार?

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. 2014 मध्ये खुद्द पवारांच्या पुणे जिल्ह्यात पक्षाला फारसं यश आलं नाही. पण साताऱ्यात मात्र राष्ट्रवादीचं वर्चस्व कायम राहिलं. उदयनराजेंचं वलय आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व यामुळे लोकसभेची जागा सहजपणे जिंकता आली.

अर्थात 2014च्या निवडणुकीतही उदयनराजे यांच्या उमेदवारीला पक्षातून विरोध होता. त्यावेळी भाकरी फिरवावी लागेल असं म्हणत उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत पवारांनी संभ्रम निर्माण केला होता. मात्र नंतर त्यांनाच उमेदवारी देऊन ती जागा निवडून आली होती. काही दिवसांपूर्वी पवार यांनी तव्यापर्यंत पोहचलोच नाही, असं सांगत सध्या तरी या वादावर मौन बाळगल्याचं चित्र आहे.

सातारा जिल्ह्यातल्या या तापलेल्या राजकारणावर बोलताना पत्रकार मोहन मस्कर पाटील म्हणतात की, "राष्ट्रवादी काँग्रेस साताऱ्याच्या जागेबाबत कोणतीही जोखीम पत्करणार नाही. एकीकडे आमदारांनी उदयनराजे यांना केलेला विरोध हा जरी खरा असला तरी शरद पवार या वादावर कसा तोडगा काढणार हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे."

काय आहे साताऱ्याच्या राजेंचा वाद?

उदयनराजेंच्या विरोधात उघडपणे बोलत आहेत ते शिवेंद्रराजे. या दोन कुटुंबांमध्ये गेल्या पिढीपासून संघर्ष सुरु आहे. उदयनराजेंचे वडील प्रतापसिंहराजे आणि शिवेंद्रराजेंचे वडील अभयसिंहराजे हे दोघे सख्खे भाऊ.

अभयसिंहराजे आणि उदयनराजेंच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्यातला मालमत्तेचा वाद कोर्टात पोहचला आणि तिथून संघर्ष वाढत गेला. राजकारणात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक रिंगणात ते एकमेकांसमोर उभे ठाकले. हाच संघर्ष पुढच्या पिढीतही कायम राहिला.

मध्यंतरी दोघांमध्ये दिलजमाई झाली, पण सातारा शहराच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा वाद विकोपाला गेला. गणपती विसर्जन मिरवणुकीवरून तर दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. विसर्जन कुठे करायचे आणि डॉल्बी वाजणार का यावरून हा वाद झाला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)