लोकसभा 2019: नागपूर - मेट्रोच्या काळात ट्रॅक बदलत्या 'संत्रानगरी'ची स्वतःला शोधण्याची धडपड

    • Author, जयदीप हर्डीकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी नागपूरहून

नागपूर. कधी मे महिन्याच्या रखरखत्या उन्हाळ्यात झाडाखाली विसावलेल्या माणसासारखं तर कधी सिग्नल हिरवा होताच पळत सुटलेल्या गाडीसारखं हे शहर.

कधी छोट्या-छोट्या जत्रेत रमणाऱ्या गावासारखं तर कधी गगनचुंबी इमले उभे होताना पाहत असलेलं हे शहर.

एकीकडे दर शनिवारी लोहापुलाजवळ गर्दी करणाऱ्या लोकांचं नगर तर दुसरीकडे 'सॅटर्डे, सॅटर्डे'च्या तालावर नाचणाऱ्या, 'उबर कूल' आणि कॉर्पोरेट होऊ पाहणाऱ्या तरुणाईचं हे शहर.

नागपूरला नेहमीच स्वतःची किंमत प्रत्यक्ष मोलापेक्षा जास्तच वाटलेली. तसं पाहायला गेलं तर इथे ना साहित्याचं माहेरघर आहे ना इथे कधी कुठलं रामायण-महाभारत घडल्याच्या इतिहासात नोंदी.

पण तरीही नागपूरकरांना या संत्रानगरीचा अभिमान आहे. त्यासाठी काही ना काही कारण लोक शोधून काढतच असतात. कुणी म्हणे आशियातलं सर्वांत मोठं सरकारी रुग्णालय नागपुरात आहे, तर कुणी सांगतं की इथे खंडातली सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत आहे, जरी त्यातल्या एकाही कंपनीचं नाव लोकांना धड सांगता येणार नाही.

गेल्या काही वर्षांत लोकांच्या या स्वाभिमानाला एक नवं निमित्त मिळालं होतं - देशातला पहिला कार्गो हब नागपुरात सुरू होणार म्हणे. पण तो प्रकल्प अजूनही मृगजळासारखाच दिसतोय. असो.

नागपूरचा इतिहास

साधारण 325 वर्षांपूर्वी बख्त बुलंद राजाने नागपूरला त्याच्या गोंड राज्याची राजधानी केली. त्यानंतर भोसलेंनी नागपूरवर ताबा मिळवला आणि तिथून या नगरीचा पूर्व-पश्चिम विस्तार झाला. याच दरम्यान नागपूरला त्याचं नाव देणाऱ्या नाग नदीच्या तीरावर अनेक मोठे हौद आणि तलाव बांधले गेले. ही नदी (जी नागपूरकरांना नागनाला म्हणून जास्त ठाऊक आहे) आजही शहरातून आपली वाट काढत 100 किमी गावाबाहेर जाऊन वैनगंगेत विलीन होते.

शहर तेव्हापासूनच कदाचित इतकं व्यवस्थित पद्धतीने विस्तारलं गेलंय - मोजकेच बुरूज-किल्ले, काही प्राचीन मंदिरं आणि त्यांच्या भोवती खणलेले हौद, आणि अशी हिरवळ जी इथला कुख्यात उन्हाळा थोडा सुसह्य करते.

ब्रिटिशांनासुद्धा ही नगरी अशी भावली की त्यांनी हिचा रेटून विकास केला. या मध्य प्रांत आणि वऱ्हाड (Central Provinces and Berar) क्षेत्रातून दोन महत्त्वाच्या वस्तू इंग्लंडला निर्यात केल्या जायच्या - कापूस आणि सागवन. हा व्यवसाय सुरळीत चालावा म्हणून ब्रिटिश राजने नागपूरचा उत्तर आणि दक्षिणेत विस्तार केला, आणि इतर कुठल्याही प्रांतापेक्षा हे शहर आधीच रेल्वेने जोडलं गेलं.

त्यामुळे इथे उद्योग सुरू झाले आणि लोकांची वर्दळ वाढू लागली. मग त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी रेल्वेचं जाळं पसरवलं गेलं, इथं शाळा-कॉलेजांची स्थापना केली गेली.

ब्रिटिशांनी मग शहराच्या उत्तेरत एका ख्रिश्चन सेमिनरीची निर्मिती केली. त्याबरोबरच कायदा सुव्यवस्थेची गरज पाहता हायकोर्ट स्थापन करण्यात आलं. नंतर इथून सबंध प्रांताचा राज्यकारभार चालवण्यासाठी प्रशासकीय नगरीच इथे वसवली गेली, जिला आज सिव्हिल लाइन्स म्हणून ओळखलं जातं.

या प्रांताच्या विभागीय आयुक्तांचं मुख्यालय इथे झालं आणि 1860च्या दशकात ब्रिटिशांची पहिली प्रादेशिक राजधानी म्हणून नागपूरचं नाव झालं. नागपूर महापालिकेची पायाभरणीसुद्धा याच काळात झाली.

स्वातंत्र्यानंतर राजधानीचा दर्जा गेला

या विकासाला गती देण्याचं काम केलं ते रेल्वेने. बंगाल-नागपूर रेल्वेमार्ग आणि बाँबे-नागपूर रेल्वेमार्ग यांचं जंक्शन म्हणून नागपूर उत्तम ठिकाणी होतं. उत्तर-दक्षिण रेल्वेमार्ग तर बरेच नंतर आले, पण या पूर्व-पश्चिम मार्गाने शहराला वेगळी ओळख दिली.

त्यानंतर जेव्हा देशातले महामार्ग बांधले गेले, तेव्हा उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिमेचा संगम पुन्हा नागपुरात झाला. म्हणून नागपुरात 'झिरो माईल', ज्याला देशाचं केंद्रबिंदू मानलं जातं, ते अस्तित्वात आलं.

राजधानी नागपुरात ब्रिटिशांनी भव्य रेल्वे स्टेशन, आलिशान रिझर्व्ह बँकेची इमारत तयार केली. या दोन्ही वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत.

1960मध्ये स्वातंत्र्यानंतर राज्यांची भाषेनुसार रचना करण्यात आली. तेव्हा मराठीबहुल नागपूरला मध्य प्रांतातून काढून महाराष्ट्रात विलीन करण्यात आलं. अशा प्रकारे स्वातंत्र्यानंतर राजधानीचा दर्जा गमावणारं नागपूर एकमेव शहर ठरलं.

या नागपूरकरांच्या जखमेवर फुंकर मारायला म्हणून नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला.

टाटा, संघ आणि दीक्षाभूमी

टाटा उद्योगसमूहाचे सुरुवातीचे बरेच दिवस नागपुरात गेले. 1874 साली जमसेठजी टाटा यांनी पहिली अद्ययावत अशी 'एम्प्रेस मिल' इथे सुरू केली. नागपूरच्या औद्योगिक इतिहासात हा सुवर्णकाळ जवळजवळ शतकभर चालला. आजही शहरात अनेक ठिकाणी काही जुन्या वास्तू आहेत, ज्या तुम्हाला त्या सुवर्णकाळाची आठवण करून देतात.

याच आधुनिक काळात आणखी एक सामाजिक मंथन नागपुरात घडू लागलं होतं. भोसलेंच्या किल्ल्यांभोवतालच्या महाल परिसरात डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी काही स्वयंसेवकांना संघटित केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची ही उजव्या विचारसरणीची संघटना आज देशात सत्ताधीश असलेल्या भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते.

पण जितकं नागपूर संघ मुख्यालयासाठी नावाजलेलं आहे, तितकीच महती इथल्या आंबेडकरी चळवळीची आहे. नागपूरच्याच दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता. जातीभेदाविरोधात केलेली ही सर्वांत शक्तिशाली आणि संपूर्णतः अहिंसक क्रांती मानली जाते.

'हाओ ना, नागपूर'

आता नागपूरच्या भाषेचं काय सांगाव. थोडी मराठी, थोडी मध्य प्रांतातली हिंदी आणि त्यात वऱ्हाडीचा तडका, अशी एक भलतीच बोली नागपूरकरांच्या तोंडी ऐकायला मिळते. यात ना पुण्याची शिष्टाई आहे ना कोकणातला गोडवा; हे एक वेगळंच प्रकरण आहे.

उदाहरणार्थ, एखाद्या नागपूरच्या व्यक्तीला 'तर्री पोहा खायला चलतो का रे?' असं विचारल्यावर तो मराठीतलं 'हो' आणि हिंदीतलं 'हा' मिळून 'हाओ' असं उत्तर देईल.

आणि काही शब्दांचा वेगळाच रंग इथे पाहायला मिळतो. 'एक नंबर', 'माहोल', 'जाऊ दे ना बावा', 'गरम देऊन रायला का रे', हे असेच काही शब्द, जे उच्चारताना न काढलेल्या भावनाही 110 टक्के व्यक्त होतात. यामुळे कधी कधी लोकांची मनं दुखावण्याची दाट शक्यता असते, पण नागपूरचे लोक 'सीधी सडक बेधडक' असतात. "वाईट वाटून घेऊ नका, आम्ही दाराला पाट्या टांगून मेसेज देणारे नाहीत," असं ते अभिमानानं सांगतील.

आणि हो, हे नागपूरकरांच्या बोलण्यातच नाही तर आचरणातही पाहायला मिळेल. तुम्हाला एखाद्या नागपूरकराने भेटायला 10ची वेळ दिली असेल तर तो 10ला त्याच्या घरून निघणार आणि 10 मिनिटातच ठरलेल्या ठिकाणी पोहोचणार. कारण नागपूर आजही इतर महानगरांच्या तुलनेत मोकळं-ढाकळं शहर आहे, जिथे तुम्ही 10 मिनिटात कुठेही पोहोचू शकता.

आमच्या मनगटावरच्या घड्याळालाही तशीच सवय झालीय. ते म्हणतात ना, मुंबईचा माणूस सेकंद काट्यावर धावतो, पुण्याचा मिनिटाच्या काट्याला, पण नागपूर माणून पेंडुलम आहे. त्याला कुठलीही घाई नाही.

21व्या शतकातलं नागपूर

असं हे नागपूर, जिथे आजही लोकांचा एक पाय त्या निवांत गावात आहे तर दुसरा पाय शहरी विकासाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या मेट्रोमध्ये, एका महत्त्वाच्या उंबरठ्यावर आहे. आणि हा दोन विश्वांमधला संघर्ष फक्त भौतिकच नाही तर सामाजिक, वैचारिक आणि राजकीयसुद्धा बनला आहे.

नेहमीच महत्त्वाकांक्षी स्वप्नं पाहणाऱ्या या शहराची खरी ओळख काय, हा प्रश्न जितक्या लोकांना विचाराल, तितकी वेगवेगळी उत्तरं सापडतील.

एकेकाळी नागपूर देशातलं सर्वांत हिरवेगार शहर म्हणून ओळखलं जायचं. शहरातल्या मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी लावलेली झाडं, व्यवस्थित ठेवलेली उद्यानं, यामुळे या शहराची फुफ्फुसं खरंच चांगली काम करत होती.

पण महानगर होण्याच्या नादात शहर विकासकांनी नियोजनाचे तीनतेरा वाजवले. हिरवळ कमी होत आहे आणि लोकांसारखं शहरही आता 'गरम' होत चाललंय.

आता एक नवं स्वप्न साकार झालंय - 9000 कोटी रुपयांची माझी मेट्रो शहराच्या मध्यातून धावू लागली आहे. शहरातल्या रस्त्यांवर अडचण वाढलीये आणि काही काही ठिकाणी तर ट्रॅक इमारतींच्या इतक्या जवळून जातो की त्यांच्या बाल्कनीत उभी असलेली व्यक्ती मेट्रोमधल्या एका प्रवाशाच्या शर्टाची बटणं मोजू शकेल.

रेटून पूर्ण केल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा लोकांना फायदा होणार की ही फक्त शोभेची वस्तू बनून राहील, यावर आत्ताच सांगता येणार नाही. पण ही मेट्रो नक्कीच शहरातल्या सामाजिक विषमतेचं प्रतीक बनू शकते.

गडकरी विरुद्ध पटोले

नागपुरात सध्या जिकडे पाहाल तिकडे सिमेंट रोडचंच काम सुरू आहे. नितीन गडकरी 1995च्या युती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, तेव्हापासून त्यांना काँक्रीटचे रस्तेबांधणीचा नाद लागलाय. म्हणून गडकरींची लोकप्रियताही या रस्त्यांप्रमाणेच गेल्या अनेक वर्षांपासून शहरात सतत तयार होत आहे.

2014 साली नागपूरचा गड गडकरींनी लोकसभेसाठी लढवला आणि जिंकवूनही आणला. काँग्रेसचे तेव्हाचे मावळते खासदार विलास मुत्तेमवार यांना गडकरींनी देशभरात आलेल्या मोदी लाटेत असं सीमेपार केलं की ते आता राजकीय मैदानात फारसे खेळताना दिसत नाहीत.

यंदा त्यांच्यासमोर काँग्रेसच्या नाना पटोलेंचं आव्हान आहे, जे गेल्या लोकसभेच्या वेळी भाजपच्या तिकिटावर भंडारा-गोंदियामधून जिंकले होते. नागपूर काँग्रेसमधली गटबाजी पाहता पक्षश्रेष्ठींनी पटोलेंना तिकीट दिलं. आता त्यांच्यावर इम्पोर्टेड नेता म्हणून आरोपही होत असतील तरी कोण काय करणार? तसंही आता या स्थलांतरितांच्या शहरात इम्पोर्टेड कोण नाहीये?

नागपूर काँग्रेसमधले मतभेद उघड असले तरी दिग्गजांना निवडणुकीत पटकण्याचा नागपूरकरांचा इतिहास आहे. पण शहरात भाजपची पक्षबांधणी मजबूत आहे, शिवाय नागपूर महानगर पालिकेत दोन तृतियांश जागा भाजपच्या आहेत आणि शहरातले सर्व सहा आमदारही त्यांचेच आहेत.

आणि हो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही नागपूरचेच, हे विसरायला नको.

सध्या तरी पटोले हे मतदारसंघातलं जातीय समीकरण सोडवून जनाधार मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे गडकरी यांनी 'विकासपुरुष' ही आपली प्रतिमा काळजीपूर्वक तयार केली आहे.

अशात नागपूरचा कौल कुणाला जातो, हे पाहणं रंजक ठरू शकतो. कारण विसरू नका, दिग्गजांना निवडणुकीत पटकण्याचा नागपूरकरांचा इतिहास आहे.

नागपूर: कल,आज और कल

प्रगतिपथावर दिसणारं नागपुरात आता पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाही, हे स्पष्ट आहे. मेट्रो आली, सिमेंटचे रस्ते आले आणि त्याबरोबरच रस्त्यांवरील गाड्या वाढल्या. जागेची अडचण काय असते, हे नागपूरकरांना आता कळू लागलंय.

गेल्या जवळजवळ शतकभरापासून या शहराने विविध प्रांतांमधून लोकांचं खुल्या मनाने स्वागत केलं आहे. इथे धार्मिक सलोखा, राजकीय तटस्थता तसंच धर्मनिरपेक्षता सारखे अनेक सामाजिक गुण अंतर्भूत होतेच. आणि भविष्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोनही.

नागपूर-बंगाल रेल्वेमुळे बंगाली शहरात आले तर मुंबई-नागपूर मार्गाने नागपूरला कापड उद्योगाचं केँद्रस्थान बनवलं. याच रेल्वेमध्ये काम करायला दक्षिणेतून लोक येऊन इथे स्थायिक झाले तर शेजारच्या प्रांतातील कोळशाच्या खाणींमध्ये काम करायला बिहारहून अनेक कामगारांनी नागपूर गाठलं.

पण आर्थिक उदारीकरणानंतर हे औद्योगिक विकासाचं चाक मंदावलं, काही वेळा तर बंदच पडलं आणि तुटलंसुद्धा.

एकेकाळचं निवृत्तांसाठीचे हे स्वर्ग आता रोजगाराअभावीच कोसळू लागलं. मिल बंद पडल्या आणि आजवर तेवढ्या प्रमाणात नोकऱ्या किंवा उद्योगधंदे नागपुरात आले नाहीत.

आज नागपुरात शोधायला गेलं तर मोजक्या सरकारी, निमसरकारी नोकऱ्या असतील. सरकारी नोकऱ्या कमी कमी होत गेल्याने आता नागपूर नव्या पर्यायांच्या शोधात आहे. म्हणायला गेलं तर नागपुरात IT पार्क आहे, काही तंत्रज्ञान कंपन्या आहेत.तसं सांगायला गेलं तर इथे थोडंथोडं सारंकाही आहे, मात्र विशाल आणि भक्कम असं काहीच नाही. म्हणूनच नागपूरचा तरुण आता पुण्यात, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरूमध्ये स्थलांतरित होतोय, स्थायिकही होतोय. असं नाही की नागपुरात लोक स्थलांतर करत नाहीयेत; ते येत आहेतच पण तुलनेने छोट्या शहरांमधून, शेजारच्या गावांमधून, प्रामुख्याने मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधल्या.

म्हणजे मूळ नागपूरचे बाहेर चाललेत आणि नागपूर नेहमीप्रमाणे बाहेरच्यांसाठी खुलं आहे. पण या बदलाचा समाजावर कसा परिणाम होतोय, याचा अंदाजही घेणं अवघड आहे.

एक काळ असा होता की शहरात मोजकी काही ठिकाणं होती, जिथे मित्र चहासाठी भेटायचे, एकत्र येऊन कॉफी प्यायचे, तासन तास गप्पा मारायचे. एकेकाळी तर नागपुरात 5-6 इंडियन कॉफी हाऊस होती.

आम्हीच कित्येक वेळेला असा निवांत वेळ घालवलाय, चहा-कॉफी घेत, सिगारेटवर सिगारेट ओढत कहाण्या ऐकवल्या आहेत, राजकीय चर्चा केल्या आहेत. आणि अधूनमधून आपापली नित्यनेमाची कामंही उरकली आहेत.

पण गेला तो काळ. आता त्या कॉफी शॉप्सची जागा कॅफेसनी, महागड्या लाऊंजेस आणि बार्सनी घेतली आहे. शहरातली वर्दळ आणि जगण्यातली स्पीड अशी वाढलीये की तो निवांतपणा आता शहरात उरलेला नाही.

एकेकाळी नागपूरच्या माणसाला त्याची दारू आणि सावजी मटण किंवा चिकन, एवढंच हवं होतं. पण आज भवताली इतकी अनिश्चितता आहे, असं वाटतं अख्ख्या शहरात एक नवी पिढी येऊन राहू लागली आहे. या सगळ्यातच नागपूरला आता पुन्हा आपली खरी ओळख शोधावी लागणार आहे...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)