सांगली: बालेकिल्ला काँग्रेसच लढवणार की राजू शेट्टींसाठी जागा सोडणार?

    • Author, स्वाती पाटील-राजगोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसला उमेदवार मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यालाच विरोध करण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते आंदोलन करण्याचीही शक्यता आहे.

पण सांगलीत काँग्रेसची वाताहत का झाली? एकेकाळचा बालेकिल्ला इतर पक्षांना सोडण्याची चर्चा करण्याची वेळ पक्षावर का आली याचाच घेतलेला हा आढावा.

सांगली लोकसभा मतदारसंघावर गेल्या 60 वर्षांपासून काँग्रेसची एकहाती सत्ता होती. यात 35 वर्षं माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचं सांगली लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व राहिलं आहे.

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला होता. आणि भाजपनं संजय पाटील यांच्या माध्यमातून हा गड काबीज केला.

खरंतर हा पराभव प्रतीक पाटील यांच्या एवढा जिव्हारी लागला की त्यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात फारसा संपर्क ठेवला नाही.

त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम, काँग्रेस नेते विशाल पाटील, काँग्रेस नेत्या आणि स्वर्गीय माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्या नावाची प्रदेश पातळीवर गेल्या एक महिन्यापासून चर्चा सुरू आहे.

प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस फारशी इच्छुक दिसत नाही. प्रतीक पाटील यांनी आपण निवडणूक लढवू मात्र आर्थिक क्षमता नसल्याने मदत मिळाल्यास निवडणूक लढवू असं पत्र काँग्रेस कमिटीला पाठवलं आहे.

सांगलीतील घराण्यांचा इतिहास

सांगली हा काँग्रेसचा कायमच बालेकिल्ला राहिलाय. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, पतंगराव कदम, राजारामबापू पाटील, मदन पाटील अशा तुल्यबळ नेत्यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सांगलीचं राजकारण देशपातळीवर गाजवलं.

सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते वसंतदादा पाटील हे स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांनी सहकार क्षेत्रात मोठी कामगिरी केली. सुरुवातीला ते थेट राजकारणात उतरले नाहीत मात्र सहकार चळवळीच्या माध्यमातून लोकांमध्ये त्यांचं जाळं निर्माण झालं होतं.

लोकांमध्ये असलेल्या विश्‍वासाच्या बळावर वसंतदादा राजकारणात उतरले त्यांच्यानंतर त्यांची पत्नी शालिनीताई पाटील पुत्र प्रकाशबापू पाटील हे देखील सक्रिय राजकारणात उतरले. तर वसंतदादा यांचे चुलत भाऊ विष्णू अण्णा पाटील, त्यांचा मुलगा मदन पाटील यांनी सांगलीवर बराच काळ वर्चस्व गाजवलं.

सध्याच्या पिढीत प्रतीक पाटील हे माजी केंद्रीय राज्यमंत्री होते. तर प्रकाशबापू यांचा दुसरा मुलगा म्हणजे वसंतरावांचे नातू विशाल हे देखील राजकारणात सक्रिय आहेत.

सांगलीत खरं तर मदन पाटील हे देखील मोठं वर्चस्व असलेलं नाव. मदन पाटील हे प्रकाशबापू पाटील यांचे चुलत भाऊ. प्रकाशबापू पाटील यांचा मुलगा विशाल यांनी मदन पाटील यांचा सहकार निवडणुकीत पराभव केला आणि तिथेच वादाची ठिणगी पडली.

मदन पाटील यांची मुलगी पतंगराव कदमांच्या घराण्यात सून आहे. त्यामुळे विश्वजीत कदम यांचा ओढा मदन पाटील यांना मदत करण्याकडे आहे आणि त्यामुळेच विशाल पाटील विरुद्ध विश्वजीत कदम असं एक युद्ध या ठिकाणी सुरू झालंय. कदम-पाटील घराण्यातला अंतर्गत विरोध हा सांगलीच्या राजकारणातला मोठा अडसर आहे.

"सध्याच्या घडीला भाजपमध्ये संजय काका पाटील यांच्या व्यतिरिक्त निवडून येईल असा उमेदवार नाही. खरंतर संजय काका पाटील यांच्यावर जिल्ह्यातले सर्वच आमदार नाराज आहेत. असं असतानाही संजय पाटील यांच्याकडे संख्याबळ असल्याने आणि संजय पाटील बंडखोरी करतील या भीतीने भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे," असं काटकर यांना वाटतं.

सांगलीच्या राजकारणात पाटील विरुद्ध कदम घराण्याचं पिढ्यानपिढ्यांचं भांडण आहे. तर दुसरीकडे शरद पवारांपासून वसंतदादा घराण्याचं कायम वैर राहिलेला आहे.

तरुण भारतचे पत्रकार शिवराज काटकर सांगतात, "वसंतदादा पाटील आणि पतंगराव कदम ही सांगली जिल्ह्यातली मातब्बर घराणी. मात्र लोकसभा निवडणुकीत यांचे वारस काँगेसला वाऱ्यावर सोडण्यासाठी ताकद लावताना दिसत आहेत. त्याचं कारण आहे, या दोन्ही घराण्यातील पिढ्यानं पिढ्याचं वैर.

"विशाल पाटील आणि विश्वजीत कदम हे दोघेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे हक्काचा मतदारसंघ स्वाभीमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्याचा घाट स्थानिक पातळीवर सुरू आहे," असं त्यांनी सांगितलं.

"सांगलीतली तुल्यबळ असलेली घराणी लयाला का गेली त्याचं कारण आहे, इथला सहकार लयाला जाणं. दूध डेअरी, साखर कारखाना, जिल्हा बँक दिवाळखोरीत निघाल्यानं इथल्या काँग्रेस नेत्यांची पकड ढिली झाली आहे."

काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण

सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. यामागेही एक वेगळं राजकारण असल्याचं स्थानिक दैनिक जनप्रवासचे संपादक हनुमंत मोहिते यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

"या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर विश्वजीत कदम यांना वाटते ही जागा विशाल पाटील यांनी लढवावी. मात्र विशाल पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यास तितकेसे उत्सुक नाही आहेत. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे. खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकीकडे जयंत पाटील हे भाजपच्या अजित घोरपडे यांना स्वाभिमानी कडून सांगलीची जागा लढवावी यासाठी विचारणा करत आहेत.

तर दुसरीकडे विश्वजीत कदम हे गोपीचंद पडळकर यांना स्वाभिमानीच्या चिन्हावर सांगलीची जागा लढवावी यासाठी तयार करत आहेत. त्यामुळे राजू शेट्टी आणि जयंत पाटील हे पडद्यामागे राजकारण तर करतच आहेत. पण कॉंग्रेसचे विश्वजित कदम देखील या राजकारणात सहभागी झालेत," असं मत हनुमंत मोहिते यांनी सांगितलं.

प्रतीक पाटील यांचा विचार का नाही?

प्रतीक पाटील यांनी काँग्रेस कमिटीला पाठवलेल्या पत्राला कुठलंही उत्तर दिलेलं नाही. त्यामागेही एक राजकारण असल्याचं तरुण भारतचे पत्रकार शिवराज काटकर यांनी सांगितलं.

"काँग्रेसची सत्ता आली तर प्रतीक पाटील हे मंत्री पदाचे दावेदार असतील. खरंतर जेव्हा पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्री पदावरून उचलबांगडी झाली त्यावेळी ही प्रतीक पाटील हे मुख्यमंत्रिपदाच्या रेस मध्ये होते, त्यामुळे कुठेतरी प्रतीक पाटील हे काँग्रेसमध्ये नेत्यांना अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा राजकारणात भरारी देण्यासाठी कोणताही काँग्रेस नेता इच्छुक नसल्याचं वाटतंय.

काँग्रेसने जर ही जागा स्वाभिमानीला दिली तर मात्र काँग्रेस सांगली जिल्ह्याच्या राजकारणातून संपण्याची ही सुरुवात असेल," असं काटकर यांना वाटतं.

सांगली स्वाभिमानीला मिळणार ?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेसकडे वर्धा, बुलडाणा आणि सांगलीची मागणी केली होती. त्यापैकी बुलडाणा आणि वर्ध्यात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे राजू शेट्टी आता सांगलीसाठी आग्रही आहेत.

"सांगली आम्हाला सोडण्यासाठी आघाडी सकारात्मक असून लवकरच काँग्रेसकडून याची अधिकृत घोषणा होईल आणि त्यानंतर स्वाभिमानी उमेदवार जाहीर करेल," असं स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

पण स्थानिक पातळीवर मजबूत संघटन नसलेल्या सांगलीमध्ये स्वाभिमानी कोणत्या जोरावर निवडून येईल असं विचारलं असता ते म्हणाले "राज्यात होणाऱ्या आंदोलनांचा उठाव सांगलीत होतोच. शिवाय हा मतदारसंघ शेट्टी यांच्या हातकणंगले मतदारसंघाला जोडून आहे. मुख्य म्हणजे सांगली जिल्ह्यात कॉग्रेस राष्ट्रवादीचं जाळं आहे, त्याचा एकत्रित फायदा स्वाभिमानीला होईल."

आघाडीकडून कुणीही उमेदवार व्हायला तयार नाही त्यामळे निवडणूक आणि त्याचा निकाल हा फक्त आता औपचारिकता राहील आहे, असं मत या सर्व घडामोडींवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)