You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
होळी : अर्जुन खोतकर म्हणतात, रावसाहेब दानवेंना मला विजयाचा रंग लावायचा आहे
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आज (21 मार्च) धुळवड. यानिमित्तानं आम्ही राज्यभरातल्या आणि वेगवेगळ्या पक्षांतल्या काही नेत्यांशी संपर्क साधला. धुळवडीनिमित्तानं कुणाला रंगवायला आवडेल, असा प्रश्न आम्ही या नेत्यांना विचारला. वाचा कोण काय म्हणतंय?
1. रावसाहेब दानवे - प्रदेशाध्यक्ष, भाजप
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना यंदा अर्जुन खोतकर यांना रंग लावायचं आहे. बीबीसीशी यावर बोलताना ते म्हणाले,
"होळी ही दोस्त आणि मित्रांमध्ये खेळायची असते. आपल्यापेक्षा मोठ्यांनाही आपण कलर लावू शकत नाही आणि लहाण्यांनाही लावू शकत नाही. मला माझ्या मित्रांना भगवा रंग लावायला आवडेल. माझे राजकारणात भरपूर मित्र आहेत. अर्जुन खोतकर आहेत, चंद्रकांत दादा पाटील आहेत, यांना भगव्यानं रंगवायला आवडेल."
अर्जुन खोतकर का, असं विचारल्यावर ते म्हणाले, "कारण खोतकर आमचे चांगले मित्र आहेत."
2. अर्जुन खोतकर - दुग्धविकास राज्यमंत्री
त्यावर अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मी परंपरागत होळी खेळतो आणि या दिवशी मी माझ्या मित्रांमध्ये असतो. हा दिवस फक्त मित्रांसाठी राखीव आहे, राजकारणासाठी नाही.
"रावसाहेब दानवे माझे चांगले मित्र आहेत. रंग लावण्यानं, न लावण्यानं आमच्या मैत्रीमध्ये काही फरक पडेल, असं वाटत नाही. योगायोगानं आमची उद्या भेट झाली तर मीसुद्धा त्यांना भगवा रंग लावेन, मी त्यांना त्यांच्या विजयाचा रंग लावेन."
3. डॉ. अमोल कोल्हे - राष्ट्रवादी काँग्रेस
नुकतेच शिवसेनेतून रष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले डॉ. अमोल कोल्हे यांना मात्र त्यांच्याच पक्षातल्या तरुण नेत्यांना रंग लावायचा आहे.
ते म्हणाले, "मला पार्थ पवार यांना होळीनिमित्त रंगवायला आवडेल. मला त्यांच्यावर गुलाल उधळायला आवडेल. कारण पार्थ तरुण राजकारणी आहेत, तरुणांनी राजकारणात यावं, असं मला कायम संयुक्तिक वाटतं. यानिमित्तानं एक नवीन पिढी राजकारणात येईल.
"त्यानंतर मला धनंजय मुंडेंना रंग लावायला आवडेल. त्यांनाही गुलाल लावायला आवडेल. त्यांचं वक्तृत्व उत्तम आहे आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व त्यांच्याकडे आहे."
4. दिशा पिंकी शेख - प्रवक्त्या, वंचित बहुजन आघाडी
नव्यानं राजकारणात दाखल झालेल्या कवियत्री दिशा पिंकी शेख यांन मात्र सप्तरंगांची उधळण करायची आहे.
त्या सांगतात, "मी गेल्या 10 वर्षांपासून होळीचा सण साजरा करत नाही आणि प्रकाश आंबेडकरांना प्रत्यक्ष जाऊन रंग लावावा, इतकी मोठी मी नाहीये. पण, मला एमआयएमचे नेते असदुद्दीन औवेसी यांना मल्टिकलर (सप्तरंग) लावायला आवडेल. जो जात, धर्म, लिंग निरपेक्ष असेल.
ओवेसी यांच्याकडे समाज मुस्लिमांचे नेते या एकाच दृष्टिकोनातून बघतो. त्यांची तशी प्रतिमा तयार करण्यात आली. पण या सप्तरंगांतून मला त्यांची ती प्रतिमा मोडकळीस आणायला आवडेल. खरंतर ओवेसी बॅरिस्टर आहेत आणि ते समाजातील प्रश्नांची उत्तरं संयतपणे मांडतात, म्हणून मला त्यांना रंग लावायला आवडेल."
5. सत्यजीत तांबे - प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांन मात्र त्यांच्या प्रतिस्पर्धी पुनम महाजन यांना रंग लावायचा आहे.
ते सागतात, "मला जर कुणाला कलर लावायचा असेल तर मी गुलाल लावणं पसंत करेन, काँग्रेसच्या विजयाचा गुलाल मी पूनम महाजनांना लावेन.
"पूनम या भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) अध्यक्षा आहेत आणि मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे. युवक आघाडीमध्ये त्या काम करतात आणि मी पण काम करतो. आमच्या पक्षाचा विजय होईल तेव्हा मी प्रतिस्पर्धी म्हणून त्यांना गुलाल लावेन."
6. डॉ. श्रीकांत शिंदे - खासदार, शिवसेना
शिवसेनेचे तरुण नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या वडिलांना म्हणजेच एकनाथ शिंदे यांना रंग लावायचा आहे. एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत.
श्रीकांत सांगतात, "आमचा शिवसेनेचा रंग भगवा आहे, त्यामुळे मला तो कलर माझ्या वडिलांना म्हणजेच एकनाथ शिंदेंना लावायला आवडेल.
दरवर्षी आम्ही रंगपंचमी मनसोक्त खेळत असतो, अगदी दिघे साहेबांच्या काळापासून. ती परंपरा कित्येक वर्षांपासून सुरू आहे. सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतात. ते वडील असले तरी आमचं नातं मित्रत्वाचं आहे, आमच्यात तशी बाँडिंग आहे. वडील आणि मुलाच्या नात्यात एकप्रकारचा गॅप असतो, तसा तो आमच्यात नाहीये. त्यामुळे मग मला त्यांना रंगवायला आवडेल."
7. प्रणिती शिंदे- आमदार, काँग्रेस
प्रणिती शिंदे यांना मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांना रंग लावायचा आहे.
त्या सांगतात, "सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि सगळे जण म्हणतात गुलाल आपलाच म्हणून. म्हणून मला गुलाल उधळायला आवडेल आणि यावेळी गुलाल आमचाच असेल."
कुणावर गुलाल टाकायला आवडेल, असं विचारल्यावर त्या म्हटल्या, "मी सध्या सोलापूरात आहे आणि मला माझ्या लोकांसोबत रंगपंचमी साजरी करायला आवडेल."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)