Surf Excelच्या जाहिरातीत होळी आणि हिंदू मुस्लिमांबद्दल काय आहे वाद

होळी रंगांचा उत्सव आहे. या रंगानं आपण नाराजी, द्वेष आणि भेदभावाला विसरून एकमेकांना प्रेमानं रंग लावतो.

काही दिवसातच होळीचा सण साजरा केला जाणार आहे. बाजारात सध्या विविध रंग दिसत आहेत.

एकीकडं होळीची तयारी होत आहेत तर दुसरीकडं याच मुद्द्यावरून कपडे साफ करणारी पावडरची कंपनी Surf Excel चर्चेत आली आहे.

तसं पाहिलं तर होळीमध्ये कपडे रंगल्यानंतर या वाँशिंग पावडरची आठवण आली असती. पण यावेळेस मात्र हे उत्पादन आणखी एका कारणासाठी चर्चेत आलं आहे.

सोशल मीडियावर #BoycottSurfExcel हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होत आहे.

यामागं या कंपनीनं प्रसिद्ध केलेली जाहीरात आहे.

काय आहे ही जाहिरात?

ही फक्त एका मिनिटाची जाहिरात आहे. यामध्ये एक छोटी मुलगी तिच्या सायकलीवरून जात असते. तेव्हा तिच्यावर काही मुलं रंगाच्या पाण्यानं भरलेले फुगे फेकतात.

ती मुलगी आनंदानं ते फुगे अंगावर घेते. जेव्हा त्या मुलांचे सगळे फुगे संपतात तेव्हा ती सायकल घेऊन एका घराबाहेर घेऊन जाते. मग ती मुलगी एका छोट्या मुलाला म्हणते, "आता बाहेर ये, सगळं संपलं आहे."

तो छोटा मुलगा पांढरा कुर्ता पायजामा घालून बाहेर येतो आणि मुलीच्या सायकलीवर बसून मशिदीकडे जातो. मशिदीत जाण्या आधी तो म्हणतो की नमाज पडून येतो.

त्यावर छोटी मुलगी म्हणते, "आल्यावर रंग पडणार आहे." तेव्हा तो हसत हसत हो अशी मान हलवतो. तिथंच ही जाहिरात संपते.

ही जाहिरात 90 लाखाहून अधिकवेळा पाहिली गेली आहे. या जाहिरातीसोबत #RangLayeSang असा हॅशटॅग लिहिला आहे.

या जाहिरातीवरून काय वाद आहे?

काही उजव्या विचारांच्या संघटनांनी या जाहिरातीला विरोध केला आहे.

ही जाहिरात होळीच्या सणाला वेगळ्या पद्धतीनं मांडत आहे, असा त्यांचा आरोप आहे.

ही जाहिरात हिंदू-मुस्लीम समुदायातली दरी दाखवत आहे असं काही लोक सोशल मीडियावर लिहित आहेत. तसंच होळीमुळं इतर धर्मातल्या लोकांना अडचणी येतात, असाही संदेश या जाहिरातीतून जात आहे.

सिनेमा निर्माते विवेक अग्निहोत्री लिहितात, "तसं तर मी कल्पकतेची बाजू धरणारा आहे. पण भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात असे कॉपीराइटर बंदी घालायला पाहिजे. गंगा-यमुना तहजीब मधील यमुनेला वेगळं करण्याचा हा प्रयत्न आहे."

बाबा रामदेव लिहितात, "आम्ही कोणत्याही धर्माच्याविरोधात नाही. पण जे काही चाललं आहे त्यावर गंभीरपणे विचार करायला पाहिजे. ज्या परदेशी सर्फने आपण कपडे धुतो त्याच्याच धुलाईचे दिवस आले आहेत?"

या जाहिरातीची तक्रार करत आकाश गौतम लिहितात की हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीनं जाहीर माफी मागायला पाहिजे.

संदीप देव लिहितात, "समाजात दुरावा निर्माण करणारे आणि सणात हिंदू-मुसलमान करणारे #HUL च्या #BoycottSurfExcel च्या सगळ्या उत्पादनांवर बहिष्कार टाका."

शेखर चाहल यांनी Surf Excel चे पाकीट जाळतानाचा व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. मोहरम आणि बकरी ईदच्या खुनी रंगांपेक्षा आमच्या होळीचा रंग चांगला आहे. आमच्या प्रत्येक सणात हिंदू-मुस्लीम का घुसवत आहात? या पोस्टनंतर ट्विटरने त्यांचं खात बंद(suspend) केल्याचं दिसतं.

पण सगळ्याच स्तरातून या जाहिरातीचा विरोध होत नाहीए. जाहिरातीला पाठिंबा देणारेही लोक आहेत.

वासन बाला ट्विटरवर लिहितात की ते ही जाहिरात तयार करणाऱ्या टीमचे सदस्य आहेत. एवढी चांगली जाहिरात निर्माण केल्याबद्दल त्यांना अभिमान आहे.

Alt News चे सहसंस्थापक प्रतिक सिन्हा लिहितात, "निवडणुकांच्या तारखा जाहीर होणाऱ्या दिवशी Surf Excelच्या जाहिरातीवर हिंदुत्ववाद्यांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे. यावरून गेल्या 5 वर्षांत देशात काय वातावरण असेल याचा अंदाज लागतो."

डाव्या विचारांच्या नेत्या कविता कृष्णन ट्वीट करून लिहितात की Surf Excelच्या जाहिरातीत हिंदू आणि मुस्लीम मैत्री दाखवली आहे.

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती लिहितात, "माझ्याकडं एक चांगला उपाय आहे. भक्तांना Surf Excel ने चांगलं धुवायला पाहिजे. कारण त्याच्या धुलाईने डाग मिटतात," अशी खोचक टीका केली आहे.

दरम्यान हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)