You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा निवडणूक 2019 : प्रियंका गांधी काँग्रेससाठी पडद्यामागून असं करत आहेत मायक्रोमॅनेजमेंट
- Author, अपर्णा द्विवेदी
- Role, वरिष्ठ पत्रकार
काँग्रेसनं उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची नावं जाहीर आहेत. ही यादी जाहीर केली तेव्हा कार्यकर्त्यांपासून पत्रकार, सगळेच त्यामध्ये नवनियुक्त काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींचं नाव शोधत होते.
तब्येत ठीक नसल्यानं सोनिया गांधी रायबरेली मतदार संघातून लढवणार नाहीत आणि त्यांच्या जागी प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, असं सांगितलं जातं होतं. पण प्रत्यक्षात असं चित्र मात्र उतरलं नाही.
अमेठीतून राहुल गांधी तर रायबरेलीतून सोनिया गांधी निवडणूक लढवणार आहेत. त्याशिवाय काँग्रेसचे जुने आणि दिग्गज नेते त्यांच्या ठरलेल्या जागांवरून निवडणूक लढवणार आहेत.
2014च्या मोदी लाटेत काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये फक्त दोनच जागा राखता आल्या होत्या - रायबरेली आणि अमेठी.
प्रियंका काँग्रेसची मजबुरी?
जानेवारीमध्ये जेव्हा प्रियंका गांधी यांची सक्रिय राजकारणात प्रवेशाची घोषणा झाली, तेव्हा त्या विरोधी पक्षांसाठी मोठं आव्हान ठरतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण जाणकारांच्या मते, प्रियंका गांधी यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश ही काँग्रेसची गरज होती.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी हातमिळवणी केल्यामुळे काँग्रेससमोर एक पेच उभा राहिला होता. उत्तर प्रदेशात या दोन मोठ्या पक्षांनी देशातल्या सर्वांत जुन्या पक्षाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात केवळ भाजपच नव्हे तर त्यांचे जुने मित्रपक्षही काँग्रेसच्या विरोधात आहेत.
काँग्रेसनं उत्तर प्रदेशातील सर्व म्हणजे 80 जागा लढवण्याची घोषणा केली आहे. तर समान विचारधारा असणाऱ्या पक्षांसाठी काँग्रेसचे दरवाजे उघडे राहतील, असंही सांगितलं आहे.
दरम्यान, प्रियंका यांच्या आगमनानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवी उर्मी दिसून येत आहे. खासकरून प्रियंका यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशात, ज्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. इथे त्यांचा थेट सामना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी होणार आहे.
तसंच काँग्रेसला हलक्यात घेऊ नका, असा सावधगिरीची भूमिका सपा आणि बसपानेही घेतली आहे.
प्रियंका यांचा उत्तर प्रदेश दौरा
काँग्रेस कार्यालयात रुजू झाल्यापासून प्रियंका गांधी यांनी जोमात काम सुरू केलं आहे. त्यांच्या 4 दिवसांचा उत्तर प्रदेश दौरा मीडियात चर्चेत राहिला. या दौऱ्यात त्यांनी लखनौमध्ये चार दिवस-पाच रात्री घालवल्या, जवळजवळ 4,000 कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
शेवटच्या दिवशी त्या मीडियाशी बोलणार होत्या, पण 14 फेब्रुवारीला दुपारी पुलवामामध्ये CRPF जवानांवर आत्मघातकी हल्ला झाला आणि त्यांनी मीडियासमोर येऊन "ही वेळ राजकारणावर बोलायची नाहीये", असं सांगून पत्रकार परिषद आटोपली.
त्यानंतर मात्र प्रियंका मीडियापासून दूर गेल्या आहेत.
सुरुवातीपासूनच प्रियंका काँग्रेस कार्यकत्यांमध्ये चांगल्याच लोकप्रिय होत्या. काँग्रेसचे इतर नेते कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याऐवजी त्यांना आदेश देण्याचंच काम करतात. याउलट प्रियंका गाधी कार्यकर्त्यांसोबत उठतात-बसतात, त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकतात. कार्यकत्यांशी चर्चा करून ते राजकीय वारे जाणून घेतात, त्यांचं मनोबल वाढवतात.
छोटे पक्ष आणि नाराज नेत्यांवर प्रियंका यांची नजर
कार्यकर्त्यांशी चर्चा करत त्यासोबत वेगवेगळ्या पक्षातल्या नाराज नेत्यांनाही जोडायचा त्या प्रयत्न करत आहेत. यामध्ये पहिला क्रमांक लागतो तो महान दलाचे नेते केशव देव मौर्य यांचा. केशव मौर्य आधी बहुजन समाज पक्षात होते. त्यांचा लोकप्रियता कुशवाहा, निषाद, राजभर समाजात जास्त आहे. या समाजाची लोकसंख्या ही यादव लोकांनंतर सगळ्यांत जास्त आहे.
याच दरम्यान भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनाही त्यांनी काँग्रेससोबत जोडलं. दलित नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुले गेल्या एक वर्षापासून भाजपविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी भाजपला दलित विरोधी पक्ष असा आरोप केला आहे.
भाजप हे समाजात दुही निर्माण करत आहे, असं म्हणत त्यांनी डिसेंबर 2018मध्ये भाजपला रामराम ठोकला होता.
फुलेसोबत समाजवादी पक्षाचे नेते आणि फतेहपूरचे माजी खासदार राकेश सचान यांनाही त्यांना काँग्रेसकडं खेचलं आहे. या 2 नेत्यांना काँग्रेसकडं वळवणं हे मोठं यश मानलं जात आहे. संबंधित मतदार संघात नावलौकिक असणाऱ्या इतर पक्षातल्या नेत्यांना जोडण्यावर काँग्रेसचा भर राहणार आहे.
लोकसभा निवडणुकींसाठी प्रियंका यांनी प्रत्येक मतदारसंघात एका समन्वयकाची नेमणूक केली आहे. मैदानात उतरवण्याआधी त्यांना काँप्युटरचं ट्रेनिंग दिलं आहे. अमेठी, रायबरेलीप्रमाणे पक्षाचे हे समन्वयक आपापल्या मतदारसंघातील छोट्या-मोठ्या घटनांवर नजर ठेवून आहेत. असा प्रयोग काँग्रेसनं मध्य प्रदेशच्या विधानसभा केला होता. हे समन्वयक युथ काँग्रेस आणि NSUIचे कार्यकर्ते राहिलेले आहेत. त्यांचा रिपोर्ट सरळ प्रियंका गांधी यांना दिला जातो.
प्रियंका यांची प्रचार टीम
प्रियंका गांधी यांच्या प्रचार अभियानात रॉबिन शर्मा हे त्यांचे सल्लागार असणार आहेत. रॉबिन शर्मा हे प्रशांत किशोर यांच्या तत्कालीन Citizen for Accountable Governance (CAG) संस्थेचे सह-संस्थापक आहेत. तसंच Indian Political Action Committee (I-PAC) सोबत जोडले गेले आहेत.
2014 लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या 'चाय पे चर्चा', 2015 मध्ये बिहार निवडणुकीदरम्यान 'हर घर नितीश, हर मन नितीश' या नावानं सायकल यात्रा आणि 2017 युपी निवडणुकीत राहुल गांधी याची 'खाट सभा' अभियानामागे रॉबिन शर्मा यांची कल्पना होती.
प्रियंका आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मोठ्या सभा करण्यापेक्षा नुक्कड सभा, मोहल्ला सभा, चौपाल आणि रोड शो करण्यावर काँग्रेस जास्त भर देत आहे. मोठ्या सभा करण्याऐवजी छोटे कार्यक्रम करून काँग्रेसचे विचार ठामपणे मांडता येतील, असं पक्षाला वाटतं.
प्रियंकासुद्धा मोठ्या सभांऐवजी छोट्या बैठकी पसंत करतात. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त क्षेत्र कव्हर व्हावे, अशा प्रियंका यांचा रोड शो ठेवला जाणार आहे.
दरम्यान, 14 फेब्रुवारीनंतर देशाचं राजकारण खूप बदललं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने उत्तर देत पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई कारवाई केली. तेव्हापासून राजकीय वारे भाजपच्या दिशेने वाहत आहेत.
जाणकारांच्या मते कोणत्याही देशात सुरक्षेपेक्षा दुसरा मोठा मुद्दा असूच शकत नाही. याच कारणांमुळे रफाल, बेरोजगारी, शेती संकटासारखे मुद्दे अचानक मागे पडले आहेत.
दुसऱ्या बाजूला बालाकोट मुद्द्याची भाजपला झळही बसली आहे. यादरम्यान काँग्रेस कोणती रणनीती अमलात आणेल आणि प्रियंका त्यात का भूमिका बजावतील, हे येणारी वेळच सांगेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)