You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा निवडणूक 2019 :'प्रियंका गांधींची गंगा यात्रा काँग्रेसची हिंदू विरोधी प्रतिमा बदलण्यासाठी'
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशावर पुन्हा पकड प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने काँग्रेसच्या सरचिटणीस आणि पूर्वी उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी याच उद्देशाने पूर्वांचलच्या दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्याची सुरुवात त्यांनी प्रयागराज इथून केली. गंगा नदीतून बोटीनं प्रवास करत त्या वाराणसीला येतील. लोकांशी बोलत आणि मंदिरांना भेटी देत त्यांचा हा प्रवास सुरू आहे. गंगेच्या तीरावर असलेल्या विविध गावांनाही त्या भेटी देत आहेत.
पहिल्या दिवशी त्यांनी हनुमान मंदिरात पूजा केली आणि संगमावर त्रिवेणी आरतीही केली. शिवाय अलाहबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.
प्रियंका यांच्या या यात्रेतून काँग्रेस काय साध्य करू इच्छित आहे, हे जाणून घेण्यासाठी बीबीसीचे पत्रकार संदीप सोनी यांनी ज्येष्ठ पत्रकार अंबिकानंद सहाय यांच्याशी चर्चा केली. त्यांनी केलेलं विश्लेषण असं.
काँग्रेसचे चार अधारस्तंभ
भारतीय संस्कृतीचे चार स्तंभ मानले जातात. ते म्हणजे गंगा, यमुना, रामायण आणि महाभारत. त्याच पद्धतीने काँग्रेसच्या सुवर्ण काळात काँग्रेसचे चार स्तंभ होते. समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांनी म्हटलं होतं की महिला, ब्राह्मण, मुस्लीम आणि दलित काँग्रेसचे चार खांब आणि व्होट बँक आहेत.
हे खांब इतके मजुबत होते की ते काँग्रेसची सत्ता हालू देत नव्हते. त्यामुळेच काँग्रेसला कुणी हरवू शकत नव्हतं. इंदिरा गांधी आणि नेहरू यांच्या काळात असं सांगितलं जात होत की काँग्रेसने टेबल आणि खुर्चीला जरी तिकीट दिलं तर तेही निवडून येतील. ही बाब लक्षात घ्यायला हवी की गंगा नदीचं राजकारण नवीन नाही आणि ही एक विचारपूर्वक केलेली खेळी आहे. काँग्रेसपासून मुस्लीम मतदार दुरावले आहेत. तसेच काँग्रेसला हिंदू विरोधी म्हटलं गेल्याने ही प्रतिमा बदलण्यासाठी सातत्यानं गंभीर प्रयत्न सुरू आहेत.
मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ गाईंसाठी काम करत आहेत, तसेच त्यांनी पुजाऱ्यांचं वेतन वाढवलं आहे. गुजरातमध्ये राहुल गांधी विविध मंदिरांना भेटी दिल्या होत्या. त्यातून फार काही साध्य न झाल्याने ते कैलाश पर्वतालाही जाऊन आले. आता प्रियंका गंगेच्या मार्गाने वाराणसीला जात आहेत. आपला जनाधार परत मिळवण्यासाठी कांग्रेस हे प्रयत्न करत आहे.
नरेंद्र मोदींविरोधात किती शक्तिशाली?
2014मध्ये नरेंद्र मोदींनी म्हटलं होत की 'मला गंगेनं बोलवलं आहे आणि म्हणून मी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहे.' याच्याशी तुलना करता प्रियंका गांधींची सुरुवात किती प्रभावी ठरू शकते.
'गंगा माता' हा भारतीयांच्या मनात वसलेला शब्द आहे. त्यावेळी नरेंद्र मोदींनी भावनिक आवाहन केलं होतं. ते गंगेची सेवा करतील आणि गंगेनच त्यांना बोलवलं आहे, या भावनेनं वाराणसीनं मोदींना स्वीकारलं.
प्रियंका गांधींच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी गंगा नदीचं आहे. त्यांच्या राजकीय सल्लागारांना असं वाटतं की यामुळे प्रियंका गांधींनाही राजकीय स्वीकार्हता मिळेल. पण या यात्रेतून मोठा चमत्कार होईल, असं आताच म्हणता येणार नाही.
मोदींनी जे आवाहन केलं होतं, त्याला शक्ती देण्यासाठी त्यांच्याकडे संघटन होतं. पण तसं कोणतही संघटन काँग्रेसकडे नाही, आणि असलं तरी ते कमकुवत आहे.
इतर पक्ष आणि काँग्रेसलाही हे माहिती आहे की काँग्रेसने जर सवर्ण मतं मोठ्या प्रमाणावर घेतली तर त्याचा फार मोठा फटका भाजपला बसणार आहे. पण ही मतविभागणी योग्य नाही झाली तर मात्र अडचणी येतील.
काँग्रेसची दूरदृष्टी
मध्य प्रदेशात काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी नर्मदा यात्रा केली. त्यातून काँग्रेसचं संघटन पुनरुज्जीवित होण्यास मदत झाली. प्रियंकांच्या प्रयत्नातून उत्तर प्रदेशात असं काही होऊ शकेल का?
मुळात ही एक राजकीय रणनीती आहे. आज मध्य प्रदेशात काँग्रेसला कुणी हिंदू विरोधी म्हणत नाही. हिंदू विरोधी प्रतिमेतून सुटका होण्यासाठी काँग्रेस हे प्रयत्न करत आहे. काँग्रेसला यातून लगेच काही फायदा होणार नाही, हे माहिती आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशात पूर्ण संपली होती. आता कष्टातून त्यांना पक्षाची बांधणी करायची आहे, जेणे करून 2022ची विधानसभा आणि 2024च्या लोकसभेत पक्ष बळकट स्थितीमध्ये येईल.
सध्या काँग्रेसचे उत्तर प्रदेशात 2 खासदार आहेत. फार प्रयत्न करून ही संख्या 7-8 झाली तरी तो मोठा विजय असेल. या पलीकडे काँग्रेस सध्या विचारही करत नाही.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)