प्रियंका गांधींनी घेतली चंद्रशेखर आझादांची भेटः उत्तर प्रदेशमध्ये नव्या सत्तासमीकरणांची नांदी?

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली. ANI या वृत्तसंस्थेनं प्रियंका गांधी आणि चंद्रशेखर आझाद यांच्या भेटीचं वृत्त दिलं आहे.

प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर तसंच ज्योतिरादित्य सिंधिया हेदेखील होते.

चंद्रशेखर आझाद यांना मंगळवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अटक केली आहे. निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या संख्येपेक्षा अधिक मोटरसायकल घेऊन रॅली काढल्याबद्दल चंद्रशेखर आझाद यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

अटक केल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना मेरठ येथील आनंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रियंका गांधी यांनी रूग्णालयातच चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली.

या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ लावला जाऊ नये, असं या भेटीनंतर प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. प्रियंका गांधींनी केवळ तब्येतीची चौकशी करण्यासाठी आपली भेट घेतली, असं चंद्रशेखर आझाद यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं.

'मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढवणार'

"तुम्ही अहंकारी सरकारविरोधात लढत आहात. तुम्ही एकटे नाहीये. आम्ही तुमच्यासोबत आहोत," असंही आझाद यांनी सांगितलं. त्यांनी 'भाई' असं संबोधून आपली चौकशी केली, असं आझाद यांनी सांगितलं. काँग्रेससोबत जाणार का, याबद्दल त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. "आपण बहुजन समाजासाठी लढत आहोत. आणि आपला मूळ उद्देश हा हुकूमशहाला पराभूत करणं आहे," असं म्हणत आझाद यांनी पंतप्रधानांना कडवी झुंज देण्यासाठी आपण वाराणसीमधून निवडणूकही लढवणार असल्याचं सांगितलं.

मात्र, पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रियंका पहिली राजकीय भेट चंद्रशेखर आझाद यांची घेतली. त्यामुळं प्रियंका यांच्या आझाद भेटीमागचा हेतू काय असावा, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्क लावण्यात येत आहे.

सपा-बसपा युतीला पर्याय देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न?

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला बाजूला ठेवून समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षानं युती केली आहे. अशावेळी दलित मतदारांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी काँग्रेस चंद्रशेखर आझाद यांच्या भीम आर्मीच्या रुपानं नवीन सहकारी शोधत आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

"बसपा आणि सपानं जाटव तसंच यादव समाज वगळता इतरांकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यामुळे काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये या अन्य समाज घटकांना स्वतःच्या बाजूनं वळविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी चंद्रशेखर आझाद यांचं सहकार्य महत्त्वाचं ठरू शकतं," असं मत ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

"पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये व्यापक दलित मतदार आहेत. त्यांना मायावतींपासून दूर करून एक सक्षम पर्याय देण्यासाठी काँग्रेसला चंद्रशेखर आझाद यांची मदत होऊ शकते. दलितांमधील अनेक गट हे मायावतींवर नाराज आहेत. अशावेळी हा मतदार भाजपकडे जाऊ नये, म्हणून काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करेल. चंद्रशेखर आझाद हे बहुजन समाजातील एक तरूण, उभरतं नेतृत्व आहे. त्याचा काँग्रेसला निश्चितच फायदा होऊ शकतो," असंही रशीद किडवाई यांनी सांगितलं.

'बहुजन समाजाला एकत्र करणं हेच उद्दिष्ट'

काही दिवसांपूर्वी बीबीसी मराठीनं चंद्रशेखर आझाद यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी सपा-बसपा आघाडी तसंच प्रकाश आंबेडकरांनी एमआयएम सोबत केलेल्या बहुजन वंचित आघाडीबद्दल आझाद यांना त्यांची भूमिका विचारली होती. ते कोणासोबत जाणार, असा प्रश्नही आझाद यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी आझाद यांनी माझा कोणताही राजकीय हेतू नाही. मला विखुरलेल्या बहुजन समाजाला एकत्र करायचं आहे, असं स्पष्ट केलं होतं.

"बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला सशक्त बनविण्यासाठी प्रयत्न केले. काशीराम यांनी दलितांच्या सशक्तीकरणाचे प्रयत्न केले. मात्र काही कमतरता अजूनही आहेत. त्या दूर करून दलित समाजाला संघटित करण्याचं माझं उद्दिष्ट आहे,"

"निवडणुकीमध्ये बहुजनांच्या हिताबद्दल बोलणाऱ्या आमच्या विचारधारांशी साधर्म्य साधणाऱ्या पक्षासोबत जाऊ. त्यासाठी जनतेचा कौल घेऊ असं सांगून भाजप विरुद्ध एक बळकट आघाडी बनावी हीच आमची अपेक्षा आहे," असं आझाद यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)