नरेंद्र मोदींनी एअर स्ट्राइकच्या दिवशी अदानी-अंबानींना विमानतळांची कंत्राटं वाटली - राहुल गांधी

जेव्हा आपले एअरफोर्सचे पायलट पाकिस्तानमध्ये कारवाई करून आले त्याचदिवशी (26 फेब्रुवारी) गौतम अदानींना 5 विमानतळांच्या देखभालीचं काँट्रॅक्ट मिळालं, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

गुजरातमध्ये गांधीनगर येथे काँग्रेसची सभेत राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आम्ही त्वरित कर्जमाफी केली. पण भाजपनं तसं केलं नाही.

सरकारनं 15 श्रीमंत व्यक्तीचे 3.5 लाख कोटी रुपये माफ केले पण त्यांनी देशातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं नाही. आम्हाला गुजरातमध्ये कर्जमाफी करायची होती पण तिथं सत्तेत न आल्यामुळे आम्ही ती करू शकलो नाहीत याची खंत राहुल यांनी व्यक्त केली.

आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो. काँग्रेस पार्टीच शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू शकते असं ते यावेळी म्हणाले.

दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ अशी घोषणा मोदींनी केली होती. पण ते आपलं वचन पूर्ण करू शकले नाही. आज देशातला तरुण नोकरीसाठी वणवण भटकत आहे.

आता चौकीदार म्हटल्यावर पुढचं काही म्हणावं लागत नाही...

मुझे पंतप्रधान मत बनाओ, चौकीदार बनाओ अशी घोषणा की मोदींनी केली होती. याची आठवण राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये प्रचारसभेत करून दिले.

राहुल गांधी यांनी चौकीदार म्हणताच लोकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. तेव्हा राहुल गांधी म्हणाले चौकीदार कहता हूं तर लोगही बोल देते है. चौकीदारही चोर है ऐसा कहते है.

मी चौकीदार म्हणताच लोक म्हणतात की चौकीदारही चोर है, असं राहुल म्हणाले.

GSTमध्ये सुधारणा

Goods and sales Tax किंवा GST ची गब्बर सिंग टॅक्स म्हणून राहुल गांधींनी हेटाळणी केली. या टॅक्समुळे एक करप्रणाली येऊन व्यापारांना दिलासा मिळेल असं वचन मोदींनी दिलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र त्यांना त्रासच सहन करावा लागत आहे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर आम्ही GSTमध्ये आम्ही बदल घडवून आणू. असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं.

भारताची विभागणी करण्याचा डाव

पंतप्रधान मोदी हे भारताची दोन विभागात भारताची विभागणी करत आहेत. एक भारत आहे सूट-बुटातला भारत आणि दुसरा भारत आहे सामान्यांचा भारत. पहिल्या गटातल्या लोकांना सर्वकाही मिळत आहे. आणि दुसऱ्या गटात आहेत शेतकरी, श्रमिक आणि शोषित वर्ग त्यांना नोटबंदीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. असं राहुल गांधी म्हणाले.

प्रियंका गांधी काय म्हणाल्या?

प्रियंका गांधी यांनी आज वर्किंग कमिटीच्या बैठकीनंतर अवघी 5 ते 7 मिनिटांचं छोटं भाषण केलं. त्या म्हणाल्या की, "माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो मी आपल्या प्रेमपूर्वक स्वागतासाठी आभारी आहे. मी पहिल्यांदाच गुजरातमध्ये आले आहे. पहिल्यांदाच साबरमती आश्रमात गेले, जिथून गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू केलं. त्या झाडाखाली बसून भजन ऐकताना माझ्या मनात काय भावना आल्या हे सांगू शकत नाही. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते."

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रियंका पुढे म्हणाल्या की, "तुमची जागरूकताच सगळ्यात मोठी देशभक्ती आहे. आपलं मत हेच आपलं हत्यार आहे. मत हे एकमेव हत्यार आहे जे तुम्हाला मजबूत करेल. त्यामुळे तुम्हाला खोलात जाऊन विचार करावा लागेल. या निवडणुकीत तुम्ही तुमचं भविष्य निवडणार आहात."

नरेंद्र मोदींना हे प्रश्न विचारा - प्रियंका

यावेळी बोलताना प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकार आणि मोदींवरही निशाणा साधला. जे मोठमोठ्या घोषणा करतात, बाता मारतात त्यांना विचारा की, "तुम्ही वर्षाला 2 कोटी रोजगार देणार होतात त्याचं काय झालं? तुम्ही 15 लाख रूपये बँक अकाऊंटमध्ये टाकणार होतात त्याचं काय झालं? महिलांच्या सुरक्षेचं काय झालं?"

हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुमची जागरूकताच या मुद्द्यांना पुढे आणू शकते. यावेळी तुम्हाला विचार करून निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही जागरूक राहा. त्यातच तुमची देशभक्ती प्रकट होईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)