लोकसभा निवडणूक 2019 : नरेंद्र मोदींचं आव्हान सोनिया गांधी परतवतील?

    • Author, रशीद किडवई
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

2004मध्ये काँग्रेसला सत्तेवर आणण्यामध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा वाटा होता. सोनियांनी काँग्रेसमध्ये नवीन उत्साह भरत एनडीएला सत्तेतून पायउतार होण्यास भाग पाडलं.

पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या पुलवामा हल्ला त्यानंतर भारताने केलेलं एअर स्ट्राइकमुळे यामुळे पारडं भाजपच्या बाजूने झुकलं असलं तरी राजकीय विश्लेषकांच्या मते एनडीएला 2019 मध्ये पूर्ण बहुमत मिळणं कठीण आहे. अर्थात, याचा अर्थ काँग्रेसची परिस्थिती सुधारलीये असा नाही. मात्र तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल, टीडीपी, आरजेडीसारखे प्रादेशिक पक्ष त्यांच्यात्यांच्या राज्यांत भाजपच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

विरोधी पक्षाच्या आघाडीसमोर एक मोठी समस्या आहे. त्यांच्याकडे नेतृत्वाचा कोणताही 'चेहरा' नाहीये. आम आदमी पक्षाला आपल्यासोबत घेण्यात काँग्रेसला अपयश आलं आहे.

काँग्रेसला नरेंद्र मोदी सरकारला सत्तेतून घालवायचं आहे. मात्र जागा वाटपाबाबत अजूनही काँग्रेसमध्ये कोणतीही हालचाल नाहीये. आघाडीसाठी काँग्रेसला आपल्या वाटणीच्या जागांचा त्याग करायची वेळ आली, तर त्याबद्दल राहुल गांधी आणि अहमद पटेल यांची समजूत केवळ सोनिया गांधीचं घालू शकतात.

दुसरीकडे एअर स्ट्राइकनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेण्यात यश मिळवलं आहे. त्यांनी अनुप्रिया पटेल यांची नाराजी दूर केली. दुसरीकडे काँग्रेसला दिल्लीमध्ये 'आप' आणि उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपासोबत आघाडी करण्यात अपयश आलंय. आघाडीची बोलणी करण्यासाठी प्रियंका गांधी किंवा ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यापैकी कोणीतरी पुढाकार घेईल, अशी अपेक्षा सपा-बसपाला आहे.

'मला काट्यांनाही हाताळता येतं'

अशा परिस्थितीत सोनिया गांधी या निवडणुकीत पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात, असे संकेत मिळत आहेत.

राहुल गांधी आणि त्यांची टीम आपल्या सहकाऱ्यांना बांधून ठेवण्यात अपयशी ठरत असल्याचं दिसत आहे. आई म्हणून राहुल गांधींच्या क्षमता आणि मर्यादांची जाणीव सोनिया गांधींना आहे. मात्र त्यातून मार्ग काढण्यासाठी आपला राजकीय अनुभव पणाला लावायला त्या सध्या तरी तयार नाहीत.

प्रियंका गांधींच्या राजकारणातील प्रवेशानंतर सोनिया गांधी यंदा लोकसभा निवडणूक लढणार नाहीत, असे अंदाजही व्यक्त केले जात होते. मात्र गांधी परिवारासाठी राजकारण सोडणं इतकं सोपं नक्कीच नाही.

पती फिरोझ गांधींच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधींना आपल्या वडिलांचं घर सोडून परदेशात स्थायिक व्हायचं होतं. मात्र परिस्थितीनं त्यांना सक्रिय राजकारणात यायला भाग पाडलं. वडिलांच्या मृत्यूपासून ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत इंदिरा गांधी राजकारणातच होत्या.

इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधी राजकारणात आले. आपल्या पतीनं राजकारणात यावं, अशी सोनिया गांधींची अजिबातच इच्छा नव्हती.

राजीव गांधींच्या मृत्यूनंतर 1998मध्ये नरसिंहा राव आणि सीताराम केसरी यांच्या कार्यकाळात एक पक्ष म्हणून काँग्रेस खिळखिळी झाली होती. याच काळात सोनिया गांधींनी काँग्रेसची सूत्रं हातात घेतली. 'परदेशी सून' ते प्रभावशाली राजकीय नेतृत्व असा सोनिया गांधींचा प्रवास झाला. सोनिया यांनी आघाडीचं राजकारण आणि सहकारी पक्षांची गरज समजून घेतली आणि काँग्रेसला पुनरुज्जीवित केलं.

सोनिया काँग्रेसचं नेतृत्व करत होत्या त्याकाळातला हा प्रसंग आहे. सोनिया गांधींनी मुलायम सिंह यादव आणि इतर नेत्यांना जेवायला बोलावलं होतं. सोनिया गांधी 'हिल्सा' मासा खात होत्या. तेव्हा त्यांना मुलायम सिंह यादव म्हणाले, "हिल्सा मासा आहे. याचा काटा लागू शकतो." त्यांना उत्तर देताना सोनिया गांधींनी म्हटलं, की मला काट्यांनाही हाताळता येतं.

सहकाऱ्यांना सांभाळून घेण्याची कला

लोकांना सांभाळून घेण्याची कला सोनिया गांधींना अवगत आहे. त्यांनीच डीएमकेला यूपीएचा घटक पक्ष बनवलं. डीएमकेमध्ये पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले अनेक नेते होते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कट्टरपंथी संघटना एलटीटीईला सहानुभूती असल्याचा आरोपही डीएमकेवर वारंवार केला जायचा.

मात्र तरीही 2004 ते 2014 या काळात डीएमके यूपीएचा एक घटक होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही त्यांनी यूपीएसोबत जोडून घेतलं. आपल्या सहकाऱ्यांना सांभाळून घेण्याची त्यांची पद्धत अटलबिहारी वाजपेयी आणि पी. व्ही. नरसिंहा राव यांच्यापेक्षाही अधिक कौशल्यपूर्ण होती.

2007 साली सोनिया गांधींनी नेदरलँड्समधील एका विद्यापीठात 'लीव्हिंग पॉलिटिक्स : भारतानं मला काय शिकवलं' या विषयावर व्याख्यान दिलं होतं. या व्याख्यानात बोलताना त्यांनी सांगितलं, "अनेक घटनांनी मला शिकवलं, माझी राजकीय समज विकसित केली. मात्र दोन गोष्टी मी कायम लक्षात ठेवल्या आहेत. पहिली म्हणजे इंदिरा गांधींची प्रतिमा एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून बळकट करणारं 1971 मधील संकट. दुसरी म्हणजे भारताला पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा संकल्प. भारताला यशस्वी आणि प्रगत बनविण्यासाठी त्यांनी अनेक कठीण निर्णय घेतले."

"भारताला समजून घेण्याची माझी क्षमता वेगळ्या पद्धतीनं विकसित झाली. माझ्या सासूच्या मृत्यूनंतर आमची आयुष्यंच बदलून गेली. आणि असं होणं खूप स्वाभाविक आहे. तुमच्या खूप जवळची व्यक्ती तुम्हाला सोडून जाते, तेव्हा आयुष्य बदलून जातं."

"इंदिराजी आणि त्यांच्या वडिलांमधील पत्रव्यवहाराचं संपादन मी केलंय. आणि त्याच्यामधून मला खूप काही शिकायला मिळालं. त्या जेव्हा तरुण होत्या, तेव्हा नेहरूंना अनेकदा तुरुंगवास घडला होता. त्याच काळातील हा पत्रसंवाद आहे. बापलेकींमधील या संवादानेच मला भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडाची माहिती दिली," असंही सोनिया गांधींनी सांगितलं होतं.

राजकारणानं मला खूप काही शिकवलं

याच व्याख्यानात सोनिया गांधी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भरभरून बोलल्या. पंतप्रधानांची सून या नात्यानं आपल्याही आयुष्यात राजकारणातील अनेक चढउतार आले, असं सोनिया यांनी म्हटलं होतं.

"मागे वळून पाहिल्यावर मला जाणवतं, की माझा राजकीय प्रवास हा माझ्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक प्रसंगांपासूनच सुरू झाला होता. आपल्या वैचारिक निष्ठांना, तत्त्वांना महत्त्व देणाऱ्या व्यक्ती माझ्या आयुष्यात होत्या. त्यांच्यासाठी राजकारण आणि प्रशासनाशी संबंधित गोष्टी या दैनंदिन जीवनाचाच भाग होत्या," असं सोनिया यांनी उपस्थितांना सांगितलं.

"राजकारणाशी संबंधित कुटुंबात असण्याचे अनेक पैलू असतात, ज्यांचा परिणाम एका तरुण सुनेवरही होत असतो. सार्वजनिक आयुष्यात सहजता कशी जपायची, हे मी शिकले. लोकांना माझ्या वैयक्तिक आयुष्यात रस होता आणि मला त्याचा सामना करणं कठीण वाटायचं. माझ्या स्वातंत्र्याला आणि स्पष्टवक्तेपणाला मुरड घालायलाही मला शिकावं लागलं. कोणी तुमच्याबद्दल अपशब्द वापरले, तरीही शांत कसं रहायचं हेदेखील मला शिकावं लागलं," असं त्या म्हणाल्या होत्या.

सर्वांना जोडणाऱ्या नेत्या

2016ला जेव्हा सोनिया गांधी 70 वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हायचं होतं.

पण राजकीय पटलावर मोदींचं येणं आणि पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखाली NDAची सत्ता येण्याची शक्यता अशा वातावरणात 'पुन्हा एकदा सोनिया गांधी' हा आवाज कानावर येऊ लागला आहे.

यामध्ये दोन मुद्दे आहेत. त्यांना एक आई म्हणून राहुल गांधींना यशस्वी झालेलं पाहायचं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे सोनिया गांधी यांच्या नावामुळं डीएमके, आरजेडी, तृणमूल कांग्रेस, राष्ट्रावादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसप, डावे आणि इतर पक्ष एका व्यासपीठावर आणून महाआघाडी उभी करण्यात होणारी मदत.

ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव, एम. के. स्टॅलिन, तेजस्वी यादव आणि शरद पवार अशा नेत्यांतील अहंकाराचा संघर्ष हे एक मोठं सत्य आहे.

ज्या आदराने एकेकाळी जयप्रकाश नारायण, व्ही. पी. सिंह किंवा हरकिशन सुरजीत यांना पाहिलं जात होतं, तसा आदर सोनिया गांधींना मिळत नाही आणि त्या तितक्या स्वीकारार्ह नाहीत. पण सर्वांना एकत्र आणण्या इतकं सामर्थ्य त्यांच्यात नक्की आहे.

एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे नेते शक्तीचा वापर करणारे नाहीत तर स्वतःला एक शक्ती केंद्र म्हणून पाहातात. 2004 ते 2014 या काळात त्यांनी दाखवलं की त्या पंतप्रधानपदावर नसतानाही त्या सर्वशक्तिमान नेत्या होत्या.

जेव्हा मनमोहन सिंह पंतप्रधान बनले तेव्हा राहुल गांधी यांनी स्वतःला या पदापासून दूर ठेवलं. आणि या पदावर हक्क सांगण्यासाठी 49व्या वर्षी त्यांना कोणतीही घाई नाही. बहुदा हेच सोनिया गांधीच्या हाती महत्त्वाचं कार्ड आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)