पुलवामा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांच्या कुटुंबियांचे मोदी सरकारला सवाल

    • Author, समीरात्मज मिश्रा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पुलवामाची घटना ही एक चूक होती, हे सरकारनं मान्य केलंय. पण ही चूक नक्की होती कोणाची? याची चौकशी का केली जात नाहीये? आमच्यामते ही चूक नाही, तर खूप मोठा कट आहे. सरकारनं या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश द्यायला हवेत. नाहीतर काहीच होणार नाही. सर्वजण हा हल्ला विसरतील. सीमेवर जवान असेच प्राण गमावत राहतील."

14 फेब्रुवारीला CRPF जवानांच्या ताफ्यावर कट्टरपंथीयांनी केलेल्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या अजित कुमार यांच्या पत्नी संतापानं बोलत होत्या. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं.

काश्मीरमधील त्राल भागातल्या पिंगलिना गावात सोमवारी सुरक्षा दल आणि कट्टरवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन कट्टरवादी मारले गेले. मारल्या गेलेल्या कट्टरवाद्यांमध्ये पुलवामा हल्ल्याचा कट रचणारा मुदस्सिर अहमद खानही असल्याचं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं.

पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या एअर स्ट्राइकची चर्चा सगळीकडे सुरू आहे. पुलवामामध्ये मारल्या गेलेल्या जवानांबद्दल कोणाला काही खंतच नाहीये, असं वाटतंय. अजित कुमार यांच्या पत्नीला याच गोष्टीचं दुःख आहे.

उन्नावमधल्या लोकनगर भागात राहणारे अजित कुमार आझाद हे CRPFच्या बटालियन 115 मध्ये तैनात होते. 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्याच्या एक दिवस आधीच अजित कुमार आपल्या कुटुंबियांशी बोलले होते. बटालियन सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात येत आहे, असं त्यांनी आपल्या कुटुंबाला सांगितलं होतं.

एअर स्ट्राइकच्या घटनेचं राजकारण का केलं जात आहे, असा प्रश्न अजित कुमार यांची आई राजवती देवी विचारतात.

"तुम्ही जंगलात कुठेतरी जाऊन बाँब फोडून येता. कोणी ते पाहिलं नाही किंवा त्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्याचा एवढा प्रचार केला जात आहे. त्याच्याआधी एवढे जवान मारले गेले आणि नंतरही मारले जात आहेत, त्याबद्दल कोणी काहीच बोलत नाहीये. आम्ही रोज टीव्हीवर पाहतो, की एअर स्ट्राइकचा फोटो लावून नेते मंडळी भाषण देत आहेत, आपल्या बहादुरीचे किस्से सांगत आहेत. तिथे किती लोक मारले, हे सांगत आहेत. जर लोक मेले आहेत, तर तिथं काही ना काही तर नक्की मिळालं असतं ना," असं राजवती देवी काकुळतीने बोलत होत्या.

अजित कुमार यांच्या आई जेव्हा हे बोलत होत्या, तेव्हाच त्यांची पत्नी मीना गौतम यांनीही अतिशय त्वेषानं म्हटलं, "कोणीही मेलेलं नाहीये. ज्यांनी प्राण गमावले त्यांचे मृतदेह घरी आले आहेत. तिथे किती लोक मेले हे कोणी पाहिलंय? सर्व देखावा आहे."

'पुलवामातील हलगर्जीपणा लोकांसमोर येऊ दे'

अजित कुमार यांच्या कुटुंबात त्यांचे चार भाऊ, माता-पिता, पत्नी आणि दोन मुली आहेत. अजित कुमार यांची पत्नी मीना देवी यांना उत्तर प्रदेश सरकारनं सहायक लिपीकाची नोकरी दिली आहे.

अजित कुमार यांच्या कुटुंबाला भरपाईही मिळाली आहे. मात्र यासंबंधी विचारल्यावर मीना देवींनी उत्तर दिलं, "आमचं सर्वस्व हिरावलं गेलंय. मुलींना डॉक्टर करण्याची त्यांची इच्छा होती. या भरपाईच्या जीवावर त्यांना डॉक्टर बनवता येईल? मात्र आता हा आमचा प्रश्न आहे. आम्हाला असं वाटतं की पुलवामामध्ये ज्या चुका झाल्या आहेत त्या लोकांसमोर याव्यात. म्हणजे त्या पुन्हा होणार नाही. पुन्हा विनाकारण जवान मारले जाऊ नयेत. शत्रूंशी लढताना आमचे पती गेले असते तर आम्हाला गर्व वाटला असता मात्र.."

CRPFच्या 115 बटालियनचे शिपाई अजित कुमार पाच भावांमध्ये सगळ्यांत मोठे होते. त्यांचे आणखी एक भाऊ लष्करात आहेत. त्यांचा आणखी एक भाऊ नुकताच पोलीस हवालदार झाला आहे.

त्यांचा आरोप आहे की त्यांचं ऐकलं जात नाहीये. याबाबतीत विभागीय अधिकाऱ्यांना आणि प्रसारमाध्यमांच्या समोरही सांगितलं आहे.

पुलवामाच्या घटनेकडे होतंय दुर्लक्ष

छोटे भाऊ रणजीत कुमार सांगतात, "इतक्या सुरक्षित जागेत इतकी स्फोटकं घेऊन कुणीतरी जात आहेत. हा कुणाचा दोष आहे? हा गुप्तचर विभागाचा दोष आहे की प्रशासनाचा? कुणाचाही दोष असला तरी आमचा आणि संपूर्ण देशाचा हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. या घटनेची चौकशी CBI किंवा तत्सम संस्थेकडे का सोपवली जात नाही?

रणजीत कुमार म्हणतात की बालाकोटच्या घटनेबाबत जाणूनबुजून अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे पुलवामाच्या घटनेकडे दुर्लक्ष होत आहे. लोकांनी विसरून जावं अशीच त्यांची इच्छा आहे.

ते सांगतात, "सगळ्यांत आश्चर्य या गोष्टीचं आहे की विरोधी पक्षाचे लोक आणि इतर लोक या प्रकरणी शांत का आहेत? आम्ही मागणी करत आहोत तरी कोणी ऐकत नाहीये."

भारतीय वायू दलाचे अधिकारी विंग कमांडर अभिनंदन यांच्या परत येण्याच्या घटनेबाबत आनंद जाहीर करत असताना अजित कुमार यांचे कुटुंबीय म्हणतात की पुलवामात चाळीस जवान मारलं जाणं आणि त्यानंतरही हे प्रकार सुरू राहणं हा आमचा सगळ्यांत मोठा पराभव आहे. यावर कोणीही चर्चा करत नाही.

रणजीत कुमार यांच्यामते, "आम्ही असं काही बोललं की लोक आमची टिंगल करत आहेत. आम्ही लष्करावर संशय घेत आहोत अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करत आहेत. प्रत्यक्षात तसं नाही. आम्ही सरकारकडे फक्त चौकशीची मागणी करत आहोत."

हल्ल्याचे पुरावे सार्वजनिक करावेत

फक्त अजित कुमार यांचेच कुटुंबीय चौकशीची मागणी करत आहे असं नाही. इतर जवानांचे कुटुंबीयसुद्धा अशाच प्रकारची मागणी करत आहेत.

शामली जिल्ह्यातील प्रदीप कुमार आमि मैनपुरीतील राम वकील सुद्धा या हल्ल्यात मारले गेले आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही या घटनेची चौकशी व्हायला हवी असं वाटत आहे.

राम वकील यांची पत्नी गीता देवी यांच्याशी आम्ही फोनवरून बातचीत केली. त्यांच्या मते त्यांना घटनेचा सूड घ्यायचा आहे. बालाकोट हल्ला हा त्यांच्या मते सूड नाही.

त्या म्हणतात, "सरकारने या हल्ल्याचे पुरावे सार्वजनिकरित्या द्यायला हवेत. इतकी कडक सुरक्षा असताना हा हल्ला कसा झाला याचीही चौकशी व्हायला हवी."

14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरच्या पुलवामात CRPF च्या 78 गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. हा ताफा श्रीनगरला जात होता. या हल्ल्यात CRPF च्या 40 जवानांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)