You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुलवामा : जवानांच्या मृत्यूचं राजकारण म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्यासारखं - शिवसेना
पुलवामा जिल्ह्यातील कट्टरवाद्यांच्या हल्ल्यात गेल्या 4 दिवसात 44 जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे देशभरात संताप आणि आक्रोश पाहायला मिळतोय. अर्थात त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांच्या मृत्युचं राजकारण करू नका असं आवाहन केलं. मात्र काल आसाममध्ये बोलताना अमित शाह यांनी काश्मिरातील हल्ल्याचा बदला घेतला जाईल असं सांगतानाच केंद्रात काँग्रेसचं नव्हे तर भाजपचं सरकार आहे, असं म्हणत राजकारण सुरू केलं. ज्याचा शिवसेनेनं सामनातून समाचार घेतला आहे.
त्यामुळे आता काश्मिरात सुरू असलेल्या लष्करी कारवाईचं आणि लोकांच्या भावनांचं राजकारण सुरू झालं आहे.
अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
काल आसामच्या रॅलीत बोलताना अमित शाह म्हणाले की, "सध्या केंद्रातील भाजपा सरकार आधीच्या काँग्रेसप्रणित सरकारपेक्षा खंबीर असून सुरक्षेच्या प्रश्नावर कुठल्याही तडजोडी केल्या जाणार नाहीत, त्यामुळे सीआरपीएफच्या 40 जवानांचे बलिदान वाया जाणार नाही"
अमित शाह यांच्या याच वक्तव्यावर शिवसेनेनं आपलं मुखपत्र असलेल्या सामनामधून जोरदार टीका केली आहे.
गुलाबपाकळ्या का झडल्या?
काश्मीरमध्ये हल्ला झाल्यानंतर जवानांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भाजपाला मत द्या असं म्हणणं म्हणजे 40 मृत जवानांच्या मढ्यावरचं लोणी खाण्यासारखं आहे अशा भाषेत सामनामधून शिवसेनेने टीका केली आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे, "काश्मीरातील जवानांच्या हत्येचा बदला घ्यायचा असेल तर पुन्हा भाजपला मते द्या, कमळासमोरचे बटण दाबा'' असा प्रचार सुरू करणे म्हणजे 40 मृत जवानांच्या मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे आहे.
साडेचार वर्षांत काश्मीरातील गुलाबाचे ताटवे का कोमेजले, आशेच्या गुलाबपाकळ्या का झडून पडल्या याचे उत्तर द्या! ''
या अग्रलेखावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे प्रवक्ते राम कदम म्हणाले, " देशभरातले 130 कोटी लोक सध्या दुःखात आहेत. आपल्या घरातला एक माणूस गेल्यासारखं त्यांना वाटत आहे. आम्ही याचं कोणतंही राजकारण न करता पाकिस्तानच्या घरात घुसरून बदला घेणार आहोत."
काश्मीरातील तरुणांना मोदी जवळचे का वाटत नाहीत?
सामनामधून केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केलं आहे.
या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल म्हणणाऱ्या पंतप्रधानांच्या कृतीची सर्वजण वाट पाहात आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करणे म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवणे असं नाही असं मत सामनानं मांडलं आहे.
काँग्रेसच्या राजवटीमध्ये झालेल्या घटनानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असलेल्या नरेंद्र मोदी यांची भाषणं लोक सोशल मीडियावर टाकून त्यांच्याच भूमिकेचे स्मरण करून देत आहेत याकडे सरकारचे लक्ष या अग्रलेखात वेधले आहे.
सामन्यातील अग्रलेखात म्हटले आहे, "काश्मीरातील तरुणांना, मेहबुबा मुफ्तीच्या पक्षाला अफझल गुरू, बुरहाण वाणीसारखे लोक स्वातंत्र्यसैनिक व जवळचे वाटतात, तितके आमचे पंतप्रधान मोदी का वाटत नाहीत? पंतप्रधान मोदी जेव्हा काश्मीरवासीयांना आपले वाटतील तेव्हा शांततेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे गेलेले असेल.
काश्मीर प्रश्नाचे राजकारण देशात करायचे, पण काश्मीरात उद्ध्वस्त झालेल्या गुलाबावर पाय ठेवून पुढे जायचे हे आता तरी थांबावे."
भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सामनाच्या अग्रलेखावर तिरकस प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "मी सध्या सामना वाचत नाही पण लवकरच वाचायला सुरूवात करेन अशी आशा आहे."
'सत्तेपुढं सत्य गौण ठरतं'
दरम्यान शिवसेना आणि भाजपामध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धावर काँग्रेसनं खोचक टीका केलीय.
शिवसेनेनं भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य बनवल्यानंतर शिवसेनेनं गेल्या साडेचार वर्षांमध्ये सतत दुटप्पी भूमिका घेतली आहे अशी टीका काँग्रेसने केली.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत बीबीसीशी बोलताना म्हणाले, "आपल्या मित्रपक्षाबाबत शिवसेनेचं जर इतकं वाईट मत आहे तर सेनेला सत्ता का सोडवत नाही? सेना आणि भाजपा दोघेही या पापाचे भागीदार आहेत. सत्तेपुढे सत्य गौण ठरतं हे यातून दिसून येतं"
केंद्रात आता भाजपाचं सरकार असल्यामुळं जवानांचं बलिदान वाया जाणार नाही अस आसाममध्ये म्हणणाऱ्या अमित शाह यांच्यावरही सावंत यांनी टीका केली.
ते म्हणाले, "या प्रकारची भाषणं त्यांनी यापूर्वीही केली आहेत. सत्ता आल्यावरही एकही हल्ला होणार नाही असंही ते म्हणायचे.
मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये 18 हल्ले झाले आहेत. त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या जवानांची संख्या यूपीएच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या जवानांपेक्षा अधिक आहे."
'लोण्याचा वाटा तुम्हीही घेताच की'
काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेना भाजपावर टीका केली आहे. पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक बीबीसीकडे बोलताना म्हणाले, " हल्ला झाल्यावर सर्व राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम रद्द केले मात्र भाजपा आणि पंतप्रधानांनी आपले कार्यक्रम रद्द केले नाहीत."
शिवसेना आणि भाजपा यांनी युतीची चर्चा हल्ल्याच्या दिवशीही केली होती याची आठवण करून देत मलिक म्हणतात, "हल्ल्याच्या दिवशी रात्री शिवसेना पक्षप्रमुख भाजपाच्या नेत्यांबरोबर युतीची चर्चा करत होते. म्हणजे सत्तेच्या लोण्याचा वाटा शिवसेना गेली पाच वर्षे घेत आहेच की.
बोलायचं एक आणि करायचं एक ही शिवसेनेची वृत्ती पुन्हा एकदा उघड झाली आहे."
त्यामुळे आता जशा निवडणुका जवळ येतील तसा वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)