You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवसेना-भाजप युती : दोन्ही निवडणुकांसाठी एकत्र जागा वाटपाची शक्यता #5मोठ्याबातम्या
आज वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:
1. युतीत दोन्ही निवडणुकांचे जागावाटप एकाच वेळी होणार
लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक राज्यात एकत्रितपणे होणार नाही. पण दोन्ही निवडणुकरांच्या युतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला एकाच वेळी जाहीर करण्याचा निर्णय शिवसेना आणि भाजपाने एकमताने घेतला आहे अशी बातमी लोकमतने दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेत 25 जागा भाजपने आणि 23 जागा शिवसेनेने लढाव्यात असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला. पण शिवसेनेने आणखी एक जागा मागत 24-24 चा फॉर्म्युला असावा असं सांगितलं. यावर पुढच्या चार पाच दिवसांत निर्णय होणार असल्याचंही या बातमीत पुढे म्हटलं आहे.
2. शेतकरी पुन्हा काढणार किसान लाँग मार्च
राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी दिल्याची बातमी सकाळने दिली आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्वासने न पाळता जबाबदारीतून पळ काढत आहे, परिणामी पाणी, चाराटंचाई, वाढते कर्ज यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. कर्जमाफीतील अटी जाचक असून त्या रद्द कराव्यात, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.
3. सुरक्षा दलांची वायुसज्जता
पुलवामात झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाईची मागणी होत आहे. सरकारकडून याबाबतीत कुठल्याही ठोस हालचाली झालेल्या नाही मात्र मात्र युद्धाचा निर्णय झाल्यास नौदल आणि हवाई दल सध्या सज्ज आहे. स्फोटके, क्षेपणास्त्र यांनी सुसज्ज असलेल्या नौदलाच्या युद्धनौका अरबी समुद्रात तळ ठोकून आहेत. तर, हवाई दलाने पोखरणच्या वाळवंटात 'वायुशक्ती' या नावाने अहोरात्र युद्धसराव सुरू केला असल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.
समुद्री संरक्षणाबाबत नौदलाद्वारे सध्या भूदल व हवाई दलाच्या सहकार्याने 'ट्रोपेक्स' या संयुक्त कसरती देशाच्या समुद्रात सुरू आहेत. या कसरतींसाठी नौदलाच्या सर्व प्रमुख युद्धनौका शस्त्रसामग्रीने सज्ज झाल्या आहेत. त्यांचा समुद्रात कसून सराव सुरू आहे.
4. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने झाकलं इम्रान खानचं पोस्टर
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवत मुंबईतील CCI अर्थात क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने इम्रान खानचे पोस्टर झाकले आहे. "आम्हाला इम्रान खानच्या क्रिकेटमधल्या कारकिर्दीबाबत आदर आहे. मात्र सध्या इम्रान खान पाकिस्तानचा पंतप्रधान आहे. आमचे जवान सीमेवर शहीद झाले असताना आम्ही त्याचे पोस्टर गौरव म्हणून ठेवू शकत नाही. त्यामुळे आम्ही हे पोस्टर झाकण्याचा निर्णय घेतला आहे," असं सीसीआयने स्पष्ट केलं. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
पुलवामा या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात भारताचे चाळीस जवानांनी प्राण गमावले. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होतो आहे. जैश ए मोहम्मद या कट्टरपंथी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होतो आहे.
5. भूपेन हजारिका यांच्या मुलाचे घुमजाव; स्वीकारणार भारतरत्न
भारत सरकारकडून भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान स्वीकारण्यासाठी आमंत्रण आलं असून आपल्या वडिलांसाठी हा पुरस्कार स्वीकारणं हा खूप मोठा सन्मान असेल असं वक्तव्य भूपेन हजारिका यांचा मुलगा तेज हजारिका यांनी केलं आहे. द हिंदूने ही बातमी दिली आहे.
एकसंध भारतासाठी माझ्या वडिलांसाठी अखंड प्रयत्न केले असून त्याचा योग्य सन्मान सरकारने केला आहे असंही ते पुढे म्हणाले. नागरिकत्व कायद्यातील बदलाचा निषेध म्हणून तेज यांनी पूर्वी हा पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)