You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुलवामा : CRPF ताफ्यावरील हल्ला आणि प्रश्नांची मालिका
- Author, विनित खरे
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
पुलवामा येथे पूर्वनियोजित आत्मघाती हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ)चे जवळपास 40 जवान मृत्युमुखी पडले. सुरक्षा दलाच्या गाडीवर आत्मघातकी हल्लेखोराने दारुगोळ्यासह हल्ला करण्याची भारतातील ही पहिलीच वेळ आहे.
आत्मघाती हल्ल्यानंतर जवानांवर गोळीबार केल्याचेही सांगण्यात येते. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
मात्र ही घटना घडली कशी, कोठे उणीव राहिली याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
एबीपी न्यूजशी बोलताना जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले, "इतकी विस्फोटके भरलेली गाडी फिरत राहिली आणि त्याची माहिती मिळाली नाही. याचा आम्हाला अत्यंत खेद वाटतो."
सीआरपीएफ प्रमुख आर.आर. भटनागर यांनी एनआयला सांगितले, "जम्मूपासून श्रीनगरला जाणाऱ्या सीआरपीएफ दलामध्ये अडीच हजार जवान होते."
यावर मलिक म्हणाले, "अशा दलांच्या हालचालींसाठीचे नियम तोडले गेले आहेत. एकाचवेळी अडीच हजार लोकांना एकत्र जाता येत नाही. आयईडी स्फोटाचा जेथे धोका असतो तेथे गाड्या वेगाने जातात. मात्र येथे ताफा संथगतीने जात होता. त्यावर हल्ला झाला. आपली चूक झाली आहे."
जहालवाद्यांना आतून मदत झाल्याच्या शक्यतेवर मलिक म्हणाले, "फुटीर तर सर्वच ठिकाणी असतात."
बीबीसीने या हल्ल्याच्या विविध पैलूंवर सीआरपीएफ, बीएसएफ आणि सैन्यात काम करणाऱ्या तसेच निवृत्त अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
या नव्या प्रकारच्या हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात काम करण्याची पद्धती बदलली पाहिजे असं मत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
माजी सीआरपीएफ प्रमुख दिलीप त्रिवेदी यांच्या मते खोऱ्यामध्ये पूर्वी सुरक्षादलांवर आयडी स्फोटाने किंवा गोळीबाराने हल्ले होत असत. त्याचा सामना करण्यासाठी रोड ओपनिंग पार्टीज म्हणजे आरओपीचा वापर केला जात असे. त्यामध्ये बहुतांश जवान सीआरपीएफचेच असत. सुरक्षादलांचा वाहतुकीचा रस्ता सुरक्षित करणं हे त्यांचं काम असतं.
या पार्टी संरक्षण दलं ज्या मार्गावरून जातात ते रस्ते, त्याजवळचे पूल, रस्त्यागलतची दुकाने, गावं श्वानपथकं आणि स्फोटकं शोधायच्या उपकरणांनी सुरक्षित करतात.
तसेच कोठे नुकतेच खोदकाम करून बॉम्ब पेरण्यात आले आहेत का याचीही शहानिशा ते करत असतात.
सीमा सुरक्षा दलाचे माजी अतिरिक्त महानिदेशक पी. के. मिश्रा यांच्या मते, "या गटांचे काम केवळ रस्तेच नाही तर रस्त्यापासून काही अंतरापर्यंतच्या परिसराला सुरक्षित करण्याचं असतं. मात्र असं नेहमीच एका व्यग्र राजमार्गावर करणं सोपं काम नाही." अशा गटांमधील जवानांची संख्या हजारांमध्ये असते.
परंतु दिलीप त्रिवेदी यांच्या मते, "गाडीमध्ये दारुगोळा ठेवून स्वतःला उडवण्याची ही पहिलीच वेळ आहे." अशाप्रकारे हल्ला होईल, अशा विचार कधी केलाच गेला नव्हता. म्हणूनच जहालवाद्यांशी लढा देण्यासाठी नव्या मार्गांचा शोध घ्यावा लागेल.
गुप्तचरांच्या माहितीमध्ये उणीव
या घटनेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत चूक झाल्याचं दिलीप त्रिवेदी यांना वाटतं.
ते विचारतात, "इतक्या मोठ्या प्रमाणात दारुगोळा खोऱ्यात कसा आला, त्याला सुरक्षित ठेवलं गेलं, दारुगोळा गाडीत भरला गेला, त्यावर डिटोनटर लावले गेले, कशी ती गाडी सुरक्षा दलांच्या गाडीजवळ पोहोचली आणि कोणालाच त्याचा काहीही पत्ता लागला नाही."
माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांच्यामते, "या हल्ल्यासाठी गाडी आणि हल्लेखोराला तयार करण्यासाठी अनेक दिवस लागले असतील, त्याबाबत आपल्याला काहीच कसं कळलं नाही." ही जबाबदारी स्थानिक गुप्तचर माहिती अधिकाऱ्यांची होती. ते ही माहिती गोळा करू शकले नाहीत.
अडीच हजार जवानांचा लांबलचक ताफा
जहालवाद्यांच्या दक्षिण काश्मीरमधून इतक्या मोठ्या ताफ्यानं जाणं कितपत योग्य होतं असा प्रश्न विचारला जात आहे.
माजी लष्करप्रमुख मलिक यांच्या मते गाड्यांच्या एवढ्या लांब रांगेने जाणं सामान्य गोष्ट नाही. बर्फवृष्टीमुळे ड्युटीवरून श्रीनगरला जाणाऱ्या जवानांचे येणं-जाणं रोखलं होतं, त्यामुळे हा ताफा मोठा झाला होता.
काही महिन्यांपूर्वी पर्यंत सैनिकांचा ताफा जेव्हा जात असे तेव्हा नागरिकांच्या गाड्यांना जाण्याची परवानगी नसे. जनरल मलिक यांच्या मते राजकीय दबावानंतर नागरिकांनाही आपल्या गाड्या जवळून नेण्याची परवानगी मिळाली आणि या हल्ल्यामुळे ही स्थिती अधिकच नाजूक झाली आहे.
सीआरपीएफचे माजीप्रमुख दुर्गा प्रसाद म्हणतात, "जर हा ताफा तुकड्या-तुकड्यांमध्ये गेला तरीही दारुगोळ्याने भरलेल्या गाडीला तुम्ही कसे रोखू शकाल?"
त्यांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दारुगोळ्याने भरलेली ही गाडी राजमार्गाच्या जवळील रस्त्यावरून काही काळ ताफ्याबरोबर चालत राहिली आणि त्यानंतर एका रस्त्यावरून राजमार्गावर येऊन जवानांच्या वाहनांवर आदळली.
दुर्गाप्रसाद सांगतात, या गाडीला रोखणा्यचा एकमेव उपाय होता तो म्हणजे राजमार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरील वर्दळली सर्व जवान पुढे जाईपर्यंत रोखून ठेवणे.
मात्र असं करणं कितपत शक्य होतं?
सामान्य बसमधून जवानांचा प्रवास
जहालवाद्यांनी प्रभावित अशा दक्षिण काश्मीरमधून जाताना ताफ्यातील जवान साध्य बसमध्ये का बसले होते? त्यांना श्रीनगरला पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टर किंवा बुलेटप्रुफ गाड्यांचा वापर का केला नाही असे प्रश्न विचारले जात आहेत.
जनरल मलिक सांगतात, "मी निश्चित सांगू शकत नाही मात्र या बसमध्ये संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती असं मला सांगण्यात आलं आहे."
सीआरपीएफचे माजी प्रमुख दिलीप त्रिवेदी सांगतात, 80 च्या दशकापासून काश्मीरमध्ये साध्या बसमधून प्रवास करत आले आहेत. गेल्या 20-30 वर्षांमध्ये सर्व काही ठीकच होत आलं.
अधिकाऱ्यांच्या मते हजारो जवानांना एका जागेपासून दुसऱ्या जागेवर घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर व्यवहार्य नाही. आणि बुलेटप्रुफ गाड्यांचा उपयोग मोहिमांसाठी केला जातो.
ड्युटीवर जाणारे हे जवान निःशस्त्र होते अशी माहिती मिळाली आहे. जनरल मलिक यांच्या मते सुरक्षेच्याकारणामुळे मोठ्या संख्येने हत्यारे दिली जात नाहीत. फक्त अशा प्रत्येक बसमध्ये काही सशस्त्र जवान तैनात केलेले असतात.
असुरक्षित जम्मू - श्रीनगर मार्गावरून वाहतूक कितीपत योग्य?
ज्या जवानांनी जीव गमावला ते जम्मू - काश्मीर राज्यमार्ग क्रमांक 44वरून जात होते. हा राज्यमार्ग श्रीनगरला उर्वरित देशाशी जोडतो. या मार्गावरून लष्कर तसेच सामान्य नागरिकही प्रवास करतात. त्यामुळे या राज्यमार्गाला पूर्ण सुरक्षित ठेवता येत नाही.
CRPFचे माजी प्रमुख दुर्गा प्रसाद सांगतात, "सुरवातीला हा राज्यमार्ग काही रस्त्यांशी जोडलं होतं. स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून हा मार्ग इतर रस्त्यांना जोडण्यात आला."
राज्यमार्गाल सुरक्षित ठेवण्यासाठी ठराविक अंतरावर सुरक्षारक्षक ठेवावे लागतील आणि या राज्यमार्गावरील इतर वाहनांची संख्या नियंत्रित करता येईल. पण काही अधिकारी म्हणतात सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या इतकी जास्त नाही.
CRPFवर सारखे हल्ले का?
काश्मीर खोरं किंवा नक्शलप्रभावित परिसर CRPFच्या जवानांवर हल्ले वाढताना दिसत आहेत. त्यातून काही तज्ज्ञांनी CRPFच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करत आहेत.
जनरल व्ही. पी. मलिक म्हणतात, "जवानांचं प्रशिक्षण आणि तैनात करण्याची पद्धती याकडं ही लक्ष दिलं पाहिजे. 70 ते 80 टक्के प्रकरणात CRPFची नियुक्ती देशातील अत्यंत संवेदनशील भागात केली जाते, हे त्यांच्यावर हल्ले होण्याचं कारण आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)