भाजपच्या वरूड कृषी परिषदेत महिला नाचली की पुरुष? दंडार नृत्य वादाच्या भोवऱ्यात

    • Author, नीतेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी अमरावतीहून

8 ते 11 फेब्रुवारीदरम्यान अमरावती जिल्ह्यातील वरूडमध्ये राष्ट्रीय कृषी विकास परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. कृषी परिषदेद्वारे कृषी संस्कृती दर्शन आणि नवतंत्रज्ञानाविषयी माहिती शेतकऱ्यांना मिळणार, हे याचं उद्दिष्ट. पण परिषद बातम्यांमध्ये आली भलत्याच कारणांमुळे.

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार रामदास तडस तसंच अभिनेते मकरंद अनासपुरे, भारत गणेशपुरे यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. स्थानिक भाजप आमदार अनिल बोंडे या परिषदेचे आयोजक होते.

उद्घाटनाच्या दिवशी सायंकाळी 6 वाजता रामपाल महाराज यांचा ग्राम कृषी सप्तखंजिरी प्रबोधनाचा कार्यक्रमही झाला. मात्र 9 फेब्रुवारीला दंडार लोककला उत्सवामध्ये नृत्य सादर करण्यात आलं. या नृत्याचे व्हीडिओ 'अश्लील सादरीकरण' अशा मजकुरासह सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हीडिओमध्ये एका स्त्रीसह सेवानिवृत्त नायब तहसीलदार ठेका धरताना दिसून येत आहे.

ही खरंच शेतकऱ्यांसाठीची परिषद होती की काही बिभत्स प्रदर्शन आयोजकांनी मांडलं होतं, अशी टीका नेटिझन्सकडून होत आहे. यात माजी खासदार नाना पाटोले यांचाही समावेश आहे.

"शेतकरी परिषदेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम अपेक्षित आहेत. तुम्ही सांस्कृतिक परिषद म्हटली होती, मग दंडार लोककलेच्या नावाखाली आयोजकांनी कृषी परिषदेत मुली नाचवल्या. शेतकऱ्यांच्या नावाने डान्स कशाला करता?" अशी टीका पटोले यांनी बीबीसीशी बोलताना आयोजकांवर केली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरही चौफेर टीका होत असताना आयोजक आमदार अनिल बोंडे यांनी 'या दंडार नृत्याकडे कलेच्या दृष्टीने बघावं,' असं म्हटलं आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना अनिल बोंडे म्हणाले, "दंडार ही लोककला आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी या लोककलेचं आयोजन करण्यात येतं. दंडार कलेच्या सादरीकरणात पुरुष स्त्रीच्या वेशात नृत्य करतात. त्यात गौळण, लावणी असे प्रकार आहेत. शेतकऱ्यांची दैनंदिन तणावातून मुक्तता व्हावी, विरंगुळा व्हावा, मनोरंजन व्हावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते."

पण पटोले यांनी यावरही आक्षेप घेतला आहे.

"दंडार गोंधळ आमच्याच भागातील आहे. त्यांनी आम्हाला दंडार शिकवू नये. भंडारा जिल्ह्यात दंडार नावाच्या लोककलेत स्त्रीच्या वेशात पुरुष कला सादर करतात. वरूडच्या परिषदेत स्त्री आणि पुरुष दोघेही होते. बोडे सांगतात की, तो पुरुष होता. आमच्या निरीक्षणात ती बाई वाटत होती," असं ते म्हणाले.

शिवाय, "कृषी परिषदेत शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यांना काय बियाणं देता येतं, पीकपद्धती, बाजारपेठ कशी असावी, शेतमालाला भाव कसा मिळाला पाहिजे, कमी पैशात शेती कशी करावी, या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. कर्जमाफीच्या नावानं शेतकऱ्यांना भाजपमुळेच नैराश्य आलं आहे. शेतमालाला दीडपट भाव दिला नाही," अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

कोण होते सादरकर्ते?

वरूडमध्ये ज्यांनी सादरीकरण केलं ते दंडार लोककला पथक लोकशाहीर माणिक देशमुख यांचं आहे. या क्षेत्रात ते 57 वर्षांपासून आहेत आणि दंडार, पोवाडा सारखे पाच हजाराहून अधिक प्रबोधनात्मक कार्यक्रम त्यांनी केले आहेत.

माणिक देशमुख यांचं 10 जणांचं पथक आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यात ते कार्यक्रम करतात. कार्यक्रमांची संख्या ग्रामीण भागात जास्त असते. एका शोमागे त्यांना 10 ते 12 हजार मिळतात.

शासनामार्फत आयोजत सांस्कृतिक महोत्सव शहरी भागात होतो. मुंबई आणि दिल्लीच्या मंत्रालयात त्यांचे कार्यक्रम होतात आणि या सगळ्यातून येण्या-जाण्याचा खर्च आणि कलावंतांना 500 रुपये मिळतात, अशी माहिती त्यांनी दिली.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले "दंडार लोककला पुरातन काळापासून सुरू आहे. शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या काळापासून ही लोककला सुरू आहे. वडिलोपार्जित परंपरा आम्ही जोपासतोय. पण मुलं उच्चशिक्षित असल्याने पुढे ही परंपरा चालवणार कुणीच राहणार नाही, पण आम्ही प्रयत्न करणार."

"दंडारला विदर्भाचे खडी गंमत म्हणतात, वरूड जरूड मध्ये दंडार तर पश्चिम महाराष्ट्रात तमाशा म्हणतात. आम्ही हुंडाबळी, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या, प्रौढशिक्षण, जलस्वराज्य, आजच्या काळाला किंवा तरुणाला गृहीत धरता जनजागृती करण्यात येते. सोबतच लावणीचं सादरीकरण देखील करण्यात येतं.

"पूर्वी आम्ही पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती करायचो. पण पोवाड्यांमध्ये लोकांना रस उरलेला नाही. त्यामुळे प्रेक्षकांना आकर्षित करण्याकरिता नवीन गाण्यांची साथ घ्यावी लागते," ते पुढे सांगतात.

माणिक देशमुख या पथकाचे गाणे लिहितात आणि गायन करतात. डान्स करणारे वेगळे असतात, असं त्यांनी सांगितंल. सेन्सॉर बोर्डाकडून 80 गाणी देण्यात आली आहेत. ही गाणी अनेकांचा अभ्यासाचा विषय आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

"कलेच्या माध्यमातून लोकांची जनजागृती होते. हजारो लोक समोर बसून हसतात रडतात आणि मनापासून बघतात. त्यामुळे यासारखी दुसरी लोककला होऊच शकत नाही."

त्यांच्या सोबतीला असतात नागपूरच्या हिवरीनगरचे रहिवासी व्यंकटेश गजभिये. याच पथकात ते स्त्रीच्या वेशात 12 तास गाणी आणि नृत्य सादर करतात. ते सांगतात "पथकात मी स्त्रीच्या वेशभूषेत गायन करतो. मराठीत गाणी, लावणी, पोवाडे, सवाल-जवाब असे कार्यक्रम रंगत असतात. एकदा सकाळी स्टेजवर उभा झालो की रात्रीच उतरावं लागतं. वरुडात चार ते दहा वाजेपर्यंय कार्यक्रम चालला. संचातील 10 पैकी तीन जणांनी मुलीच्या वेशात डान्स केला. पथकातील काही टाळ्या वाजवतात, काही जण मंजिरा, तुणतुणा, नाल वाजवतात तर काही गायक असतात."

वरूडच्या कृषी परिषदेत दंडार नृत्य सादर करणारा 28 वर्षाचा पंकज वरंबे मूळ भंडारा जिल्ह्यातील पवनी या गावचा रहिवाशी आहे. पंकजचा डान्सचा व्हीडिओ चांगलाच वायरल झालाय.

शेतकरी कुटुंबातील असलेल्या पंकजची आर्थिकस्थिती बेताची असून त्याच्या कुटुंबाची जवळपास एकरभर शेती आहे. दंडार ही लोककला सादर करणं त्यानं वयाच्या 15व्या वर्षी सुरू केलं. गेली 10 ते 12 वर्षं तो या क्षेत्रात आहे.

एक लोककला म्हणूनच पंकजसुद्धा या कलेकडे पाहतो. तो म्हणतो, "लोकांचं मनोरंजन, प्रबोधन व्हावं या दृष्टिकोनातून दंडारकडे वळलो. प्रबोधनाची स्क्रिप्ट ठरलेली असते, डायरेक्टर जसं सांगेल तशी अदाकारी आम्ही करतो. डान्स सोबतच रडण्याचाही सीन असतोच, चेहऱ्यावर तसे हावभाव पण गरजेचे असतात."

"बाईची वेशभूषा त्यातलाच एक प्रकार असतो. पोवाडे आणि प्रबोधनाच्या मध्ये एखादी लावणी सादर करावी लागते. त्यामुळं रसिकांना शेवटपर्यंत जागेवरच बसून ठेवण्याची जबाबदारी असते. नुसतंच प्रबोधन ऐकण्याच्या मूडमध्ये प्रेक्षक नसतात."

नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यात जास्त कार्यक्रम चालतात, असं तो सांगतो.

पंकज म्हणतो, "शेतकरी तणावात असतात, तेव्हा त्यांचा विरंगुळा होतो, यात शंका नाही. नापिकीमुळे आधीच शेतकरी कर्जबाजारी आहे, त्यातच आता दुष्काळी परिस्थिती आहे. अशात त्यांनाही विरंगुळा हवा आहेच."

"लावणी आणि खरीगंमत ही विदर्भाची लोककला आहे. आणि प्रेक्षकांची लावणीची मागणी असते ती सादर करावी लागते. संपूर्ण कार्यक्रमात मी मुलगा आहे म्हणून कुणीच ओळखत नाही. सत्कारासाठी जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हाच लोकांना माहिती पडतं की मी मुलगा आहे."

पण आपल्या कलेला दाद देण्याऐवजी त्यावर टीका होते, याचं पंकजला दुःख आहे.

"आता 'द कपिल शर्मा शो'मधले कलाकार स्त्रीच्या वेशात येतात तेव्हा लोक हसतात. कपिल महिलांना पाडून बोलतो, तेव्हा कुणाला तक्रार नसते. पण आमच्या सादरीकरणावर अनेकजण वाईट टिप्पणी करतात, तेव्हा वाईट वाटतं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)