शेतकऱ्यांच्या लाँग मार्चबद्दलच्या 10 गोष्टी : कसा झाला, का झाला?

किसान सभेच्या पुढाकारानं शेतकऱ्यांचा लाँग मार्च काढण्यात आला होता. या लाँग मार्चमध्ये नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातले आदिवासी आणि अल्पभूधारक शेतकरी सहभागी झाले होते. बहुतांश मोर्चेकरी हे आदिवासीबहुल भागातले होते.

शेतकऱ्यांच्या लाँग मार्चबद्दलच्या 10 गोष्टी :

1. नाशिक इथून 6 मार्च रोजी या मार्चला सुरुवात झाली. मजल दरमजल करत हा मोर्चा सात दिवसांनी दिनांक 11 मार्चला रात्री मुंबईत पोचला आणि 12 मार्चला पहाटे आझाद मैदानावर धडकला.

2. मार्चच्या सुरुवातीलाच नाशिक इथून 20 ते 25 हजार शेतकरी सहभागी झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. सुरुवातीच्या नियोजनाप्रमाणं 12 तारखेला शेतकऱ्यांनी विधानसभेला घेराव घालण्याचा निर्धार व्यक्त केला होता.

3. वनजमिनी आणि शेतीशी संबधित विविध मागण्यांसाठी हा मार्च होता. शनिवारी (ता.10) हा मार्च मुंबईच्या वेशीवर भिवंडी इथं पोहचला. मार्चमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती.

4. लाँग मार्चमध्ये आदिवासी समाजातील लोककलाकारही सहभागी झाले होते. आदिवासी समाजाचे पारंपरिक पावरी हे वाद्य वाजवत ते दर दिवसाची सुरुवात करायचे. त्यानंतर सुरू व्हायचा दिवसभराचा पायी प्रवास. अगदी शिस्तबद्धरीत्या हा प्रवास सुरू असायचा.

5. मुंबईच्या जवळजवळ जसा मार्च येऊ लागला, तसं त्याविषयीची चर्चा व्हायला लागली. एकापाठोपाठ सर्वच राजकीय पक्षांनी अगदी सत्तेत सहभागी असलेल्या शिवेसनेसह सर्वांनी या मार्चला पाठिंबा दिला.

6. रविवारी सांयकाळी घाटकोपरच्या सोमय्या मैदानात मोर्चेकरी शेतकरी पोहोचले. सोमवारी दहावीची परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ होऊ नये याकरिता पुन्हा रात्रीच उर्वरित अंतर कापण्याचा निर्णय घेण्यात आला.

7. पहाटे दोन वाजता शेतकऱ्यांनी दक्षिण मुंबईच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेही शेतकऱ्यांच्या भेटीसाठी तिथं पोहचले. सकाळी सहा वाजता मार्च आझाद मैदानावर पोहचला.

8. सोमवारी विधिमंडळ अधिवेशन सुरू झाल्यावर राजकीय पक्षांनी हा मुद्दा उपस्थित केला. दुपारी एक वाजता शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली.

9. 4 वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीतून सकारात्मक तोडगा निघाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सरकारचे प्रतिनिधी आणि शिष्टमंडळातील सदस्यांनी आझाद मैदानावर मोर्चेकऱ्यांसमोर मागण्या आणि त्यावर सरकारचे मिळालेलं लेखी आश्वासनं वाचून दाखविली.

10. या मार्चविषयी आणि मागण्यांवर मिळालेल्या आश्वासनांविषयी इथं वाचा - आंदोलन ते आश्वासन : शेतकऱ्यांच्या लाँग मार्चचे मुंबईतले 24 तास

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)