You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मासिक पाळीत कधी 'मेन्स्ट्रुअल कप' वापरून पाहिलाय? #पाळीविषयीबोलूया
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
पाळीतलं आरोग्य म्हणजे सॅनिटरी नॅपकिन, पाळीविषयी बोलायचं म्हणजे सॅनिटरी नॅपकिनच्या वापराविषयी बोलायचं असं काहीसं समीकरण रूढ होऊ पाहतंय. बाजारात मिळणारे सॅनिटरी पॅड्स वगळता दुसरे काही पर्याय उपलब्ध आहेत का आणि त्यांची चर्चा होणं का गरजेचं आहे याचा आढावा...
प्रसंग एक: साल 2008 - ती अत्यंत घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेत आपल्या मैत्रिणीला बोलावते. गंभीर चेहेऱ्याने त्या दोघींचं काहीतरी बोलणं होतं. पहिली मैत्रीण अगदी रडकुंडीला आलेली. तर दुसरी तिला धीर देतेय.
आतापर्यंत बाकींच्याची लक्षात ही गोष्ट आलेली. जवळपास कुजबुज सुरू झाली आहे. दुसरी मैत्रीण घाईघाईने आपल्या जागेवर जाते. पर्समधून काहीतरी काढते, जवळच्या हातरुमालात गुंडाळते आणि पहिल्या मैत्रिणीला देते.
पहिली मैत्रिण अक्षरशः धावत प्रसाधानगृह गाठते. तेव्हाही तिच्या चेहेऱ्यावर मेल्याहून मेल्यासारखे भाव असतात. असणारच, भर ऑफिसमध्ये तिची पाळी सुरू झालेली असते ना!
#पाळीविषयीबोलूया या बीबीसी मराठीच्या विशेष लेखमालिकेतला हा लेख आहे. पाळीविषयीचे समज-गैरसमज यावर चर्चा घडवणं, पाळीदरम्यानच्या आरोग्य समस्यांचा वेध घेणं, हा या लेखमालेचा उद्देश आहे.
प्रसंग दोन :साल 2018 "आज माझा काम करायचा मूड नाहीये कारण माझी पाळी सुरू आहे", ती आपल्या पुरुष सहकाऱ्याला (जो तिचा बॉस असतो अर्थात) सांगते.
हे ऐकून तिचा दुसरा पुरुष सहकारी दर महिन्याला पाळी येणं जसं कटकटीचं काम आहे तसंच दररोज दाढी करणं (!) ही वैतागवाणं आहे असं काहीसं पुटपुटतो. पुढचे पाच मिनिटं मग त्याला कोणी बोलूच देत नाही.
एव्हाना इतर सहकारीही चर्चेत सहभागी होतात. मग पुरुषांना पाळी येऊ शकते का याची शास्त्रीय कारणं शोधली जातात. इतर प्राण्यांना पाळी येते का? किती महिन्यातून एकदा, माणूस आणि प्राणी यांच्यातला फरक आणि अनादि अनंत मुद्दे मांडले जातात.
साधारण 10 वर्षांच्या फरकाने महिलांच्या कार्यालयांमध्ये घडलेले हे प्रसंग. दोन मैत्रिणींमधली अपराधी भावनेनं केलेली कुजबूज ते पुरुष-महिला अशा सगळ्या सहकाऱ्यांमध्ये झालेली खुली चर्चा. विषय अर्थात पाळी.
पाळीविषयी मोकळेपणानं गप्पा होणं हा आश्वस्त करणारा बदल आहे. पण मग त्याच्याही पुढे जाऊन अजून एका महत्त्वाच्या विषयावर खुलेपणाने चर्चा का होऊ नये? पाळी म्हणजे सॅनिटरी नॅपकिन असं काहीसं समीकरण रूढ होऊ घातलंय.
सरकार स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन द्यायच्या घोषणा करतंय. सेलिब्रिटी हातात पॅड घेऊन फोटो काढत आहेत आणि गल्लोगल्ली स्वस्तात पॅड बनवणारे छोटे उद्योग उभे राहात आहेत.
पाळीचा, स्पष्टच सांगायचं तर पाळीत वापरलेल्या पॅडचा पर्यावरणावर, कचरा वेचकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
मग पाळीत वापरायला बाजारात मिळणारे पॅड्स वगळता दुसरे काहीच पर्याय नाहीत का? नक्कीच आहेत.
सॅनिटरी नॅपकिनला 5 प्रमुख पर्याय
1. मेन्स्ट्रुअल कप
हा कप सिलिकॉन किंवा लेटेक्स रबरापासून बनवलेला असतो. सॅनिटरी नॅपकिन पाळीतला रक्तप्रवाह शोषून घेतात, पण हा कप मात्र पाळीचा रक्तप्रवाह जमा करतो. त्यामुळे कप धुवून त्याचा पुनर्वापरही सहज शक्य असतो.
पाळीच्या वेळी हा कप अशाप्रकारे योनीमध्ये बसवावा लागतो की त्यात पाळीचा रक्तप्रवाह जमा होईल.
सीमा परदेशी-खंडाळे यांना सॅनिटरी नॅपकिन्सचा कचरा ही एक भयानक समस्या वाटते. त्या सॅनिटरी पॅड वापरण्याऐवजी इतर एको-फ्रेंडली पर्याय वापरण्यासाठी जनजागृती करतात.
"हे कप वापरायला अगदी सोपे आहेत आणि अनेक वर्षं वापरता येतात," सीमा माहिती देतात.
अनेक वर्षं सॅनिटरी पॅड वापरल्यानंतर भुसावळच्या रेश्मा पंडित आता कप वापरतात. "मी आता दुसरं काही वापरायचा विचार करूच शकत नाही. पॅड वापरल्यामुळे येणारे रॅश, डाग लागण्याची भीती, यातलं काही आता नाही," असं व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या रेश्मा सांगतात.
जितक्या महिलांनी मेन्स्ट्रुअल कप वापरले आहेत, बहुतेक जणींना ते अतिशय सोईस्कर वाटतात.
2. टॅम्पॉन
पाश्चात्य देशांमध्ये प्रचलित असलेला हा प्रकार भारतात फारसा वारपला जात नाही. सॅनिटरी नॅपकिन्ससारखाच काहीसा हा प्रकार. पण पॅडस योनीच्या बाहेर राहून पाळीचा रक्तस्राव शोषतात तर टॅम्पॉन योनीच्या आत घालावे लागतात.
याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याची शोषणक्षमता सर्वाधिक असते. काही टॅम्पॉन तर रात्रभर वापरले तरी चालतात. दुसरं म्हणजे टॅम्पॉन घट्ट जीन्सच्या आतसुद्धा सोयिस्करपणे वापरता येतात. जास्तवेळ वापरूनही याची पॅडप्रमाणे दुर्गंधी येत नाही. फिल्डवर काम करणाऱ्या महिला, खेळाडू यांच्यासाठी हे सोईस्कर ठरतात.
3. कापडी नॅपकिन्स
आजकाल कापडाचे छान सॅनिटरी नॅपकिन आले आहेत. ते शिवलेले असतात, वापरायलाही सोपे असतात.
नमिता भावे या भारत सरकारच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत जिल्हा प्रेरक म्हणून काम करतात. पाळी संदर्भात लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणं हा त्यांच्या कामाचा भाग आहे.
कापडी पॅडचा वापर वाढला पाहिजे, असं त्यांना वाटतं. या पॅडचा अजून एक फायदा म्हणजे ते धुवून पुन्हा वापरता येतात.
4. पिरीयड पॅंटी
पॅँटीच्या आत पाळीचा रक्तस्राव शोषण्यासाठी पॅड, टॅम्पून किंवा कप वापरण्यापेक्षा पॅन्टीच रक्तस्राव शोषणारी असेल तर? अमेरिकेतल्या काही कंपन्यांनी अशा पँटी बाजारात आणल्या आहेत. त्यांची शोषक्षमता टॅम्पॉन एवढीच, किंबहुना जास्त आहे असा त्यांचा दावा आहे. पाळी दरम्यान फक्त ही पँटी घालायची आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज पडणार नाही या कंपन्यांचं म्हणणं आहे.
भारतात या पँटी ऑनलाईन उपलब्ध आहेत. काही भारतीय कंपन्यांनीही अशा प्रकारच्या अंडरवेअरचं उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे.
5. पीरियड स्पंज
सॅनिटरी पॅडला नवनवीन पर्याय शोधण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असले तरी काही जणांनी मात्र जुन्या उपायांकडे आपला मोर्चा वळवला आहे. पीरियड स्पंज किंवा सागरी स्पंज हा त्यातलाच एक प्रकार.
समुद्रात सापडणाऱ्या या नैसर्गिक स्पंजचं आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. या स्पंजचा वापर टॅम्पॉनसारखाच करता येतो. आणि हे पुन्हा वापरण्यासारखे असतात.
नैसर्गिक असल्यामुळे याचा पर्यावरणाला काही धोका नाही. पण आरोग्यासाठी हे पीरियड स्पंज वापरणं योग्य आहे की नाही याविषयी तज्ज्ञांमध्ये वाद आहेत.
हे पर्याय वापरण्यातल्या अडचणी काय?
1. किंमत
वर उल्लेख केलेला प्रत्येक पर्याय बाजारात मिळणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनपेक्षाही महाग आहे. मेन्स्ट्रुअल कपची किंमत कमीत कमी 500 रुपयांपासून सुरू होते. रक्तस्रावाचा प्रवाह, प्रमाण, स्त्रीचं वय, योनीचा आकार यावरून कोणता कप वापरता येईल हे ठरतं आणि त्यानुसार किंमत वाढत जाते.
कापडी पॅडचंही तसंच आहे. पण कप किंवा कापडी पॅडच्या किंमती सर्वांच्या आवाक्यातल्या नाहीत. "मी परवाच काही कापडी पॅड मागवले. मला एक पॅड दोनशे रुपयाला पडलं. नेहमीच्या पॅडपेक्षा कितीतरी जास्त महाग," नमिता माहिती देतात.
टॅम्पॉन, पिरीयड पँटी किंवा स्पंजच्या किमतीही आवाक्यातल्या नाहीत.
2. देखभाल
कापडी पॅड, पीरिअड अंडरवेअर किंवा स्पंज या गोष्टी पुन्हा वापरता येण्यासारख्या असल्या तरी त्यांची देखभाल करणं जिकिरीचं काम असतं.
"या सगळ्या गोष्टींचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा जेव्हा ते स्वच्छ धुवून, जंतुनाशक लिक्विडमध्ये भिजवून, पुन्हा धुवून उन्हात कोरडे वाळवले जातील. नाहीतर उलट त्रासच व्हायचा," नमिता पुढे माहिती देतात.
3. जुन्या समजुती
मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन किंवा स्पंज वापरताना ते योनीमध्ये आत सरकवून घालावे लागतात. हे भारतीय मानसिकतेत बसणारं नाही. बायका बिचकतात हे खरं. अगदी लग्न झालेल्या बायकांच्या अंगावरही मेन्स्ट्रुअल कप म्हटलं की काटा येतो," सीमा म्हणतात.
मासिक पाळीबद्दल चर्चा म्हणजे सॅनिटरी नॅपकिनबद्दल चर्चा असा समज रूढ झाला आहे. पर्यावरणवादी ओरडून ओरडून सांगत आहेत की, सॅनिटरी पॅडचा वाढता वापर पर्यावरणाला धोकादायक आहे.
सॅनिटरी पॅडला पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक पर्यायाचे फायदे-तोटे आहेत. यातला कुठला पर्याय निवडायचा हे सर्वस्वी महिलांच्या हातात आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)