You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आम्ही जेवतो भारतात, झोपतो म्यानमारमध्ये'
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
तुम्हाला कोणी असं सांगितलं की गाव एक आहे, पण त्याचे देश दोन आहेत. घर एकच आहे, पण त्याची बैठकीची खोली आणि स्वयंपाकघराचा एक भाग एका देशात आहे आणि दुसरा भाग दुसऱ्या देशात.
गावकऱ्यांचं नागरिकत्व एकाच देशाचं आहे, मात्र शाळा दोन देशांच्या आहेत आणि गावातली मुलं कोणत्याही देशाच्या शाळेचं शिक्षण घेऊ शकतात. असं गाव भारतात आहे. यावर विश्वास बसेल का?
आमचाही बसला नव्हता, जोवर आम्ही लोंगवामध्ये पोहोचलो नव्हतो. नागालॅण्डच्या निवडणूका दिमापूर, कोहिमासोबत इतर भागांतून कव्हर केल्यानंतर जेव्हा आम्ही भारत-म्यानमार सीमेवरच्या या लोंगवा गावाकडे चाललो होतो, तोपर्यंत त्याच्या या ऐकलेल्या वर्णनानं अचंबित होतो. अगदी टोकाच्या मॉन जिल्ह्यातल्या या गावापर्यंत दिमापूरहून पोहोचायलाच 9 तास लागतात.
ईशान्येकडच्या या हिमालयाचं रूप पाहात, आसामच्या सीमेवरच्या चहाच्या मळ्यांना अधून मधून स्पर्श करत कोन्याक नागांच्या या राज्यापर्यंत प्रवास करतानाच दुर्गमतेची कल्पना येत होती. कदाचित या दुर्गमतेमुळेच टिकलेल्या नागा संस्कृतीनं तुलनेनं इथे अलिकडेच आलेल्या या देशांच्या सीमारेषा पुसून टाकल्या असाव्यात.
नागालॅण्ड हा जरी एकसंध नागा जमातीचा प्रदेश वाटत असला तरीही तो नागांच्याच अनेक उपजातींमध्ये विभागला गेला आहे. उदाहरणार्थ, राजधानी कोहिमा आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश हा अंगामी नागांचा आहे, जे एकूण नागांच्या लोकसंख्येमध्ये सर्वाधिक आहेत आणि म्हणून राजकारणात त्यांचं वर्चस्व अधिक आहे. तसा म्यानमार आणि अरूणाचलच्या सीमेलगत असलेल्या नागालॅण्डच्या मॉन जिल्ह्यासह आजूबाजूचा प्रदेश हा कोन्याक नागांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.
नागा 'हेडहंटर्स'
मुळात सारेच नागा हे योद्धा वृत्तीचे, पण या कोन्याक नागांचा इतिहास काही औरच. हे 'हेडहंटर्स' होते. म्हणजे एकेकाळी, टोळी स्वरूपात रहात असताना, पलिकडच्या दुसऱ्या राज्यातल्या खेड्यांवर ते हल्ला करायचे, युद्धं व्हायची आणि त्यात मारल्या गेलेल्या शत्रूंचं शिर कापून घेऊन यायचे. ही मानवी शिरं मोठ्या दिमाखात ते आपल्या घरांच्या दर्शनी भागावर लावून ठेवायचे.
अर्थात, नागालॅण्ड भारतात समाविष्ट झाल्यावर या 'हेडहंटिंग'वर सरकारनं कायमस्वरूपी बंदी घातली. अशा या 'हेडहंटंर्स' कोन्याक नागांच्या सामाज्याचं केंद्रस्थान होतं लोंगवा गाव, जे आता दोन देशांचं यजमानपद भूषवतंय.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त वळणावळणांचा आणि पर्वतरांगांचा रस्ता आम्हाला आंतरराष्ट्रीय सीमारेषेपर्यंत घेऊन जातो. कोन्याक नागांच्या प्रदेशात प्रवेश करताक्षणीच त्यांचं वेगळेपण जाणवायला लागतं.
नजरेत न मावणाऱ्या पर्वतरांगांकडे पाहत राहिलं तर प्रदर्शनात मांडावी अशी प्रत्येक टापूवर ठेवलेली नागांची बांबूंच्या भितींची आणि मातीनं लिंपलेली घरं दिसायला लागतात. पहाडांवर विखुरलेली ही एकेकटी घरं पहायला मोठी गंमत वाटते. असं वाटतं की हे सगळे एकमेकांशी भांडून वेगळेवेगळे राहताहेत आणि यांचं एक असं गाव नाहीच आहे. पण नंतर समजतं की इथं डोंगरावर ते फक्त शेतीच करतात आणि ही त्यांची 'फार्म हाऊसेस' आहेत!
मॉन या जिल्ह्याच्या गावापासून 40 किलोमीटरवर मग एका रांगेच्या अगदी शिखरावर लोंगवा दिसायला लागतं.
महालाचा एक भाग भारतात तर एक म्यानमारमध्ये
अगदी निटनेटक्या, सारवलेल्या स्वच्छ बाबूंच्या घरांमधून वळणावळणाचा रस्ता चढाईवर एका मोठ्या मैदानाशी जाऊन पोहोचतो आणि तुमच्या समोर येतो एक मोठा लाकडी महाल उतरत्या छपराचा.
इतर छोट्या घरांपेक्षा त्याचं वेगळेपण आणि भव्यता लगेच डोळ्यात भरते. हाच आहे लोंगवाच्या मुख्य राजाचा, 'आंग'चा राजमहाल, ज्याला भारत आणि म्यानमारची आंतरराष्ट्रीय सीमारेषा विभागते. याच महालाचा एक भाग भारतात आहे आणि एक म्यानमारमध्ये.
हे वैशिष्ट्य केवळ या एका घराचंच नाही तर सगळ्या लोंगवाचंच आहे. जवळपास पाच हजार वस्तीच्या या गावातली 742 घरं ही भारतात आहेत आणि 224 घरं म्यानमारमध्ये आहेत.
"साधारण 15-16व्या शतकात आमचं राज्य स्थापन झालं होतं. हा महाल तर 100 वर्षांहून अधिक जुना आहे. आंतरराष्ट्रीय सीमा तर अगदी अलिकडे, 1971 मध्ये आली," इथले राजा अमोऊ तैवांग आम्हाला सांगतात. ते मुख्य राजाचे काका आहेत.
राजघराण्यातल्या सर्व पुरुषांना राजा म्हणजेच 'आंग' मानलं जातं. इथल्या या कोन्याक नागांच्या संस्थानाचा मौखिक इतिहास 16शतकापर्यंत मागे जाऊन सांगतो की जेव्हा अरूणाचलच्या एका खेड्यातून या राजघराण्याचे पूर्वज इथं आले आणि त्यांनी लोंगवाची स्थापना केली.
या राजघराण्याची 'नानवांग' आणि 'तैवांग' अशी दोन कुळं झाली. कालौघात मुख्य राजाचं पद 'तैवांग' कुळाकडे आलं, जे आजंही कायम आहे आणि याच कुळाचं राजघराणं या महालात आजही राहतं.
'टू नेशन व्हिलेज'
नागालॅण्ड जेव्हा भारताच्या स्वातंत्र्यानंतर बऱ्याच काळानं चर्चा होऊन विशेष दर्जा मिळाल्यावर 1960मध्ये भारतात आला. त्यानंतरही अनेक वर्षं म्यानमारसोबत आंतरराष्ट्रीय सीमारेषा अंतिम झाली नव्हती. ती झाली 1971मध्ये आणि जेव्हा ती आखली गेली तेव्हा लोंगवाचं आयुष्यच बदलून गेलं. ती रेषा त्यांच्या राजाच्या घराला आणि सगळ्या गावालाच विभागून गेली. प्रश्न पडला, की करायचं काय? नेमकं कुणीकडे जायचं. पण लोंगवाचा प्रश्न नागालॅण्डसारखा चिघळला नाही.
याचं कारण एक म्हणजे इथल्या लोकांची भावना अजूनही ही आहे ते त्यांच्या जुन्या संस्थानातच राहत आहेत आणि दुसरं म्हणजे भारत असो वा म्यानमार, दोन्ही देशांनी सीमारेषा उभारली तरीही लोंगवावर कब्जा करण्याचे मनसुबे केले नाहीत. दोघांनीही या गावाला एक स्वातंत्र्य दिलं आणि म्हणूनच ते 'टू नेशन व्हिलेज' झालं.
लोंगवातल्या लोकांना भारत आणि म्यानमार दोन्ही देशांमध्ये मुक्त प्रवेश आहे. ते दोन्हीकडे व्यापार करतात. रोटी-बेटी व्यवहार सीमारेषा ओलांडून होतात आणि दोन्ही बाजूंच्या मुली दुस-या बाजूच्या सुना होतात. कित्येक जण दुसऱ्या बाजूला दिवसभर नोकरी करतात आणि संध्याकाळी लोंगवा मध्ये परत येतात.
गावातल्या बाजारात चक्कर मारा, तुम्हाला भारतीय वस्तूंसोबत बर्माच्याही अनेक गोष्टी मिळतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही देशांची सरकारं या गावासाठी काही ना काही करत असतात.
हे स्थानिक भारताचे नागरिक आहेत, त्यांच्याकडे आधार कार्ड आहेत, ते इथे मतदान करतात. म्यानमारही त्यांना आपलंच म्हणतं!
उदाहरणार्थ, इथल्या शाळा. नागालॅण्ड सरकारतर्फे इथे दोन शाळा तर पहिल्यापासूनच आहेत, पण आता काही वर्षांपासून म्यानमार सरकारनंही इथं एक बर्मीज भाषेतली शाळा सुरू केली आहे. इथे म्यानमारमधून येऊन शिक्षक शिकवतात.
भारतीय लष्कराचा तळ तर इथेच आहेच आणि त्यांची कडक गस्तही या सीमेवर असते, पण त्यासोबतच म्यानमारच्या लष्करातले जवानही इथे या भागात असतात. पण इतर कोणत्याही दोन देशांच्या सीमेवर लष्कराच्या गस्तीत अनुभवायला मिळतो तो तणाव इथे अजिबात दिसत नाही.
'ही शांतता कायम राहो'
इथल्या स्थानिकांना सीमारेषेची माहिती नक्की आहे पण जाणीव खिजगणतीतही नाही.
अखाऊ तैवांगसू ही तरूणी सांगते की, "मी चित्रपटांमध्ये युद्धं पाहते. इतरत्र सीमारेषेवर राहणाऱ्या गावकऱ्यांचं आयुष्य किती कठीण असतं. ते पलिकडच्यांचा द्वेष करतात. भविष्यात आमच्याकडेही असं काही घडेल या कल्पनेची मला भीती वाटते. आता तरी सगळं ठीक आहे. आम्ही कायम प्रार्थना करतो की आतासारखी शांतता कायम इथे राहो."
काही वर्षांपूर्वी जेव्हा स्वतंत्र नागालॅण्डची सशस्त्र चळवळ सुरु होती तेव्हा या प्रदेशावर सतत हिंसेचं सावट असायचं. पण 2000साली शस्त्रसंधी झाली आणि त्यानंतर शांतता आली. आता लोंगवाचं हे सीमारेषेनं दुभंगण्याचं वैशिष्ट्य आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही आकृष्ट करतं. कोणीही इथं येऊ शकतं, या कोन्याक नागांचा राजमहाल पाहू शकतं आणि सीमारेषा संस्कृतीला कशी दुभंगू शकत नाही हे पाहून विस्मयचकित होऊन लोंगवाची गोष्ट सगळ्यांना सांगण्यासाठी परत जाऊ शकतं.
तुम्हालाही स्वत: अनुभवून ही गोष्ट सांगायला आवडेल नक्की.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)