You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराणमधल्या मुली डान्स करतानाचे व्हीडिओ पोस्ट करताहेत कारण...
इराणमध्ये अनेक तरुणी सोशल मीडियावर आपला डान्स करतानाचा व्हीडिओ शेअर करत आहेत. एका तरुणीला झालेल्या अटकेच्या निषेधार्थ ही मोहिम सुरू करण्यात आली आहे.
मीदा होजाब्री नावाच्या एका टीनएजरने आपल्या इराणी आणि पाश्चिमात्य संगीतावर डान्स करतानाचे अनेक व्हीडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेत. विशेष म्हणजे इन्स्टाग्रावर हजारोंच्या संख्येने लोक तिला फॉलो केलं जातंय.
हे व्हीडिओ आपणच पब्लिश केल्याचं मीदा होजाब्रीनं शुक्रवारी कबुल केलं आणि तिची ही कबुली सरकारी टीव्ही चॅनलने प्रसारित केली.
या तरुणीच्या अटकेनंतर सोशल मीडियावर लोकांनी तिचं समर्थन करायला सुरू केलं आहे.
होजाब्रीच्या समर्थनार्थ अनेक जणी आता आपापले डान्सिंग व्हीडिओ शेअर करत आहेत. '#dancing_isn't_a_crime' सारखे हॅशटॅग वापरत आहे.
इराणमध्ये काही अपवाद वगळता, महिलांच्या कपड्यांबाबत आणि पुरुषांसोबत नाचण्यावर अनेक कडक नियम आहेत.
हाजोब्रीच्या डान्स व्हीडिओमध्ये तिने ना हिजाब घातलाय ना स्कार्फ घातलेला दिसत आहे.
होजाब्री सारख्या अनेक डान्स कलाकरांना नुकतीच अटक करण्यात आली होती.
ब्लॉगर हुसेन रोनाघी यांनी यांदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. "जगातल्या कुणालाही असं सांगितलं की, 17 - 18 वर्षांच्या मुली नाचल्यामुळे, खुश राहिल्यामुळे किंवा सुंदर दिसल्यामुळे समाजात अश्लीलता पसरते आणि म्हणून आम्ही त्यांना अटक करतोय तर तुमचंच हसू होणार आहे. बलात्कार करणारे आणि अन्य आरोपी मोकाट फिरत असताना कुणाला डान्स करते म्हणून अटक होत असेल तर हे अविश्वसनीय आहे."
या मुद्द्यावर एका ट्विटर यूजर लिहितात, "अधिकाऱ्यांनी मला बघावं म्हणूनच मी नाचते आहे. होजाब्रीसारख्या तरुणींना अटक करून ते आमच्याकडून आमचं सुख आणि आशा हिरावून घेऊ शकत नाही."
इराणमध्ये डान्स करणाऱ्यांना अटक करण्याची ही काही पहिली वेळ नाही.
याआधी मशाद इथल्या एका मॉलमध्ये महिला आणि पुरुषांनी एकत्र नृत्य सादर केल्याच्या व्हीडिओमुळे एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती.
तर 2014ला सहा इराणी नागरिकांनी इंग्रजी गाण्यांवर डान्स करतानाचा व्हीडिओ शेअर केला, म्हणून त्यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि 91 चाबकाच्या फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)