You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवसेना-भाजप युतीची चर्चा: महाराष्ट्रात कोण मोठा भाऊ, कोण छोटा भाऊ?
- Author, तुषार कुलकर्णी आणि मोहसीन मुल्ला
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसं महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या युतीचं काय होणार? याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याने युतीसमोरही एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र गेल्या 4 वर्षातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्या, कार्यकर्त्यांमधील संघर्ष, मानापमान आणि इगो यामुळे निवडणुकीआधीचं मनोमिलन ही सोपी गोष्ट राहिलेली नाही.
अर्थात याला शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या धारदार वक्तव्यांचीही किनार आहे.
"महाराष्ट्रात शिवसेना हाच मोठा भाऊ राहील आणि दिल्लीचे तख्त हाच मोठा भाऊ गदागदा हलवणार,' असं वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
यानंतर काहीच तासात मुख्यमंत्र्यांनीही शिवसेनेला चोख उत्तर दिलंय. ते म्हणाले "ज्यांना हिंदुत्ववाद हवा आहे त्यांना सोबत घेऊन आणि ज्यांना नको आहे त्यांच्याशिवाय भाजप निवडणुका लढवेल."
अर्थात अशा तिखट वादात दुसऱ्या बाजूने चर्चेचे दरवाजे खुले असल्याचं सुचवणारीही वक्तव्य होत आहेत. संजय राऊत आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी "शेवटपर्यंत आम्ही युतीसाठी प्रयत्न करु आणि युती होईल यासाठी आपण आशावादी आहोत" असं म्हटलंय.
शिवसेनेनं 23 जानेवारी 2018 ला झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढवण्याचा निर्धार केला होता. मात्र तीच शिवसेना आता योग्य आदर राखला तर आपण एकत्र लढू इथवर आली आहे. त्यामुळेच शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार का? हा प्रश्न विचारला जात आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यापैकी 41 जागा या शिवसेना आणि भाजपकडे आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात 24 जागा लढल्या आणि 23 जिंकल्या तर शिवसेनेनी 20 जागा जिंकल्या आणि 18 जागा जिंकल्या. एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मिळाली.
शिवसेना भाजप एकत्र येतील का?
"महाराष्ट्रातून एनडीएचे एकूण 42 उमेदवार लोकसभेत गेले. त्यामुळे मोदींच्या खुर्चीला बळकटी मिळाली. पण गेल्या चार वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने जशी वागणूक शिवसेनेला दिली आहे ते पाहता ही युती कठीण दिसत आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी दिलं.
"युतीसाठी एकमेकांमध्ये विश्वास असणं अत्यावश्यक आहे. शिवसेनेला मात्र त्यांच्यावर विश्वास नाही आणि भाजपचंही काही अंशी तसंच आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपने लोकसभेत 24 जागा लढवल्या आणि शिवसेनेने कमी लढवल्या पण जेव्हा विधानसभेची वेळ आली तेव्हा त्यांची बोलणी फिस्कटली. त्यामुळे शिवसेनेला स्वबळावरच लढावं लागलं. यावेळी असं होऊ शकतं की काय? अशी भीती शिवसैनिकांच्या मनात आहे."
"भाजपबरोबर युती व्हावी अशी शिवसेना खासदारांची इच्छा आहे पण शिवसैनिकांची इच्छा मात्र स्वबळावर लढण्याची आहे. भाजपनं आपल्याला नीट वागवलं नाही, योग्य आदर राखला नाही आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व संपावं यासाठी भाजप प्रयत्नशील राहिला, असं सामान्य शिवसैनिकेला वाटतं. या कारणामुळे सामान्य शिवसैनिकाला शिवसेनेने स्वबळावर लढावं असं वाटतं," असं मत उन्हाळे यांनी व्यक्त केलं.
भाजपची गरज?
युती होणं ही भाजपची गरज आहे असं मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी इंडियन एक्सप्रेससाठी लिहिलेल्या लेखात व्यक्त केलं आहे. ते लिहितात, "उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले आहेत. 2014मध्ये भाजपकडे 80 पैकी 73 जागा होत्या. त्यापैकी 3 जागा पोटनिवडणुकीत भाजपच्या हातून गेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपला अशा एका राज्याची आवश्यकता आहे जिथं भाजपला अधिकाधिक जागा मिळतील. त्या दृष्टीने भाजप शिवसेना-भाजप युतीकडे पाहत आहे."
पुढे ते लिहितात, "गेल्या लोकसभेत शिवसेनेला 20 टक्के मतं मिळाली होती तर भाजपला 27 टक्के मतं मिळाली होती. जर शिवसेना भाजप युती झाली नाही तर शिवसेनेचं नुकसान होईल पण भाजपचं देखील नुकसान होईल."
"गेली साडे चार वर्षं शिवसेनेने सातत्याने भाजपवर टीका केली. पण भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. सेना-भाजप युती हे मॅरेज ऑफ इनकविनिअन्सचं उदाहरण आहे. जिथं दोन्ही पक्षांना हे माहीत आहे की एकत्र राहणं हे त्रासदायक आहे पण वेगळं राहणं हे त्याहून अधिक त्रासदायक ठरू शकतं," असं कुबेर सांगतात.
हिंदुत्वावरून एकत्र येतील का?
उद्धव ठाकरे यांनी अयोध्येमध्ये पत्रकार परिषद घेतली. राम मंदिराच्या मुद्द्यावरून आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं ते म्हणाले होते. तर नुकत्याच झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र या असं सुचवलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना जोडणारा हिंदुत्व हा दुवा ठरू शकतो का? असं विचारलं असता ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सांगतात, "दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नाही. तर दोन्ही पक्षांमध्ये जो अविश्वास निर्माण झाला आणि त्यातून जो पॉलिटकल स्ट्रेस तयार झाला त्यातून संघर्ष होत आहे. शिवसेनेकडे 18 खासदार होते पण चांगलं मंत्रिपद मिळालं नाही."
"शिवसेनेला भाजपनं उप-मुख्यमंत्रिपद देणं अपेक्षित होतं ते दिलं नाही. यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. त्याबद्दल भाजप काही बोलायला तयार नाही. जर युती झाली तर ती जागा वाटपातला तिढा सुटल्याने होईल, आणि नाही झाली तरी त्याला जागा वाटपच जबाबदार असेल. बाकी हिंदुत्व, राम मंदिर, दोन दशकांची जुनी युती वगैरे या वरवर बोलायच्या गोष्टी आहेत," असं केसरी यांना वाटतं.
"राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र झाल्यामुळे त्यांची शक्ती वाढली आहे. जर सेना-भाजप एकत्र आले नाही तर दोन्ही पक्षांना निवडणुकीत मोठं नुकसान सोसावं लागेल. भाजपला एकटे लढलो तरी जिंकून येऊ हा आत्मविश्वास नाहीए, त्यामुळे भाजप युती व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे.
"शिवसेनेने सामनाच्या माध्यमातून भाजपवर वेळोवेळी निशाणा साधला आहे. पण त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही, राज्यातही अद्याप ते सत्तेत आहेत. कोलकाता येथे महागठबंधनची सभा झाली. त्या सभेला ठाकरे यांना निमंत्रण होतं पण ते गेले नाहीत. म्हणजेच शिवसेनेने युतीविरोधातली भूमिका घेतली नाही," असं ते सांगतात.
शिवसेनेच्या खासदारांना काय वाटतं?
शिवसेनेतील बऱ्याच खासदारांची भूमिका ही युती करण्याची आहे, अशी माहिती शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने दिली. "जर शिवसेना आणि भाजप यांची युती झाली नाही तर शेवटी त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला होणार हे उघड आहे. त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांनी युती करून निवडणूक लढवण्याची भूमिका मांडली आहे." पण गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींच्या जागा वाटपाचं सूत्र एकत्र ठरलं पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे आणि ती योग्य आहे, असंही या नेत्याने सांगितलं.
सध्या भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या पालघर आणि भिवंडी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर शिवसेनेने दावा केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या कोणतीही अधिकृत चर्चा सुरू झालेली नाही, पण विधानसभेतही निम्म्या जागांवर शिवसेना दावा करेल, अशी सूत्रांची माहिती आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)