You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राम मंदिर : बाळासाहेब ठाकरे राम मंदिराच्या जागी मंगल पांडेंचं स्मारक करा का म्हणाले होते?
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
राम मंदिराचं आज (5 ऑगस्ट) भूमिपूजन होत आहे. याप्रसंगी महाराष्ट्रात शिवसेना आणि शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांना धन्यवाद देत आहेत. मात्र, याच बाळासाहेब ठाकरेंनी राम मंदिराच्या जागी मंगल पांडेंच स्मारक व्हावं अशी भूमिका घेतली होती.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे वक्तव्य त्यांनी 2004मध्ये बीबीसी हिंदीशी बोलताना केलं होतं.
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सध्याचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या बांधणीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी राम जन्मभूमि तिर्थक्षेत्र ट्रस्टकडे RTGS द्वारे जमा केल्याची माहीती शिवसेनेच्या फेसबुक पेजवर देण्यात आली आहे.
मात्र, सध्या बाळासाहेब ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना कार्यकर्ते धन्यवाद देत असले तरी राम मंदिराच्या जागेबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी वेगळं विधान बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं होतं.
राम मंदिराच्या जागेचं भूमिपूजन आज (5 ऑगस्ट) झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या बाबतीत बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं हे विधान आम्ही वाचकांसाठी पुन्हा देत आहोत.
बीबीसी हिंदीचे रेहान फझल यांनी बाळासाहेब ठाकरे यांची 2004 मध्ये मुलाखत घेतली होती. त्यावेळी मंगल पांडेबद्दल बाळासाहेब स्वतः त्यांना म्हणाले होते. हा प्रसंगच रेहान फझल यांनी त्यांच्या या लेखात पुढे मांडला आहे.
राम मंदिराच्या जागी मंगल पांडेचं स्मारक हवं
मला 2004 साली बाळासाहेब ठाकरेंना भेटण्याची संधी मिळाली होती. त्यांची मुलाखत घेण्यासाठी मी 'मातोश्री'वर गेलो होतो. ते एका खोलीत सिंहानासारख्या खुर्चीवर बसले होते.
जेव्हा आपण मुलाखत घेतो, तेव्हा साधारण एकांतात भेटतो. पण मी गेलो तेव्हा खोलीत काही लोक होते. ही गोष्ट मला थोडीशी खटकली होती.
आपण या सर्वांसमोरच बोलणार का, असं मी त्यांना दबकत-दबकतच विचारलं. त्यावर बाळासाहेबांनी सांगितलं, की त्यांना कोणतीही गोष्ट एकांतात करायला आवडत नाही. मी सर्वांसमोर मोकळेपणानं बोलणं पसंत करतो.
त्यांनी भगवे कपडे घातले होते. त्यांच्या गळ्यात आणि मनगटावर रुद्राक्षांच्या माळा होत्या आणि खोलीतही त्यांनी काळा चष्मा घातलेला होता. त्यांचा बेदरकारपणा आणि नजरेला नजर देऊन बोलण्याच्या लकबीनं माझं लक्ष खेचून घेतलं होतं.
मुलाखतीच्या दरम्यान त्यांना असं विचारलं, की तुमच्या मते बाबरी मशीदीबद्दल विचारलं.
बाळासाहेबांनी जे उत्तर दिलं ते अनपेक्षित आणि पक्षाच्या भूमिकेपासून हटकून होतं. त्यांनी म्हटलं, "खरं तर भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याचे नायक मंगल पांडे यांचं स्मारक तिथं बनवायला हवं."
त्यांचं हे उत्तर ऐकल्यानंतर पूर्ण खोलीत शांतता पसरली. ते काय बोलताहेत यावर लोकांचा क्षणभर विश्वासच बसला नाही. मला स्वतःलाही ही गोष्ट पचनी पडली नाही. मी पुन्हा त्यांना हाच प्रश्न विचारला. त्यांच्या या वक्तव्याची खूप चर्चा झाली. पीटीआयनंही त्यावेळी नेमका तोच मुद्दा उचलला आणि देशातल्या जवळपास सर्व वर्तमानपत्रांची हेडलाईनही हीच होती.
'ठाकरे दुःख करत नाहीत'
हा प्रसंग 1995 सालातला आहे. मुंबईमधल्या जातीय दंगलींवर मणिरत्नमने 'बॉम्बे' चित्रपट बनवला होता. या चित्रपटातल्या एका प्रसंगात शिवसैनिक मुसलमानांना मारताना तसंच त्यांना लुटताना दाखवलं होतं.
चित्रपटाच्या शेवटी मात्र बाळासाहेबांशी साधर्म्य दाखवणारं पात्र दंगलीमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल दुःख प्रकट करतं. त्यांच्यासोबतच एक मुस्लीम नेताही दंगलींबद्दल खंत व्यक्त करताना दाखवला आहे. बाळासाहेबांनी या चित्रपटाला विरोध केला होता. मुंबईमध्ये 'बॉम्बे' प्रदर्शित होऊ देणार नाही, असं ठाकरेंनी म्हटलं होतं.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
या चित्रपटाचे वितरक अमिताभ बच्चन होते. बाळासाहेबांसोबत त्यांचा चांगला स्नेह होता. त्यामुळं ते ठाकरेंना भेटायला गेले.
शिवसैनिकांना दंगल करताना दाखवल्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं का? असं अमिताभ यांनी ठाकरेंना विचारलं. त्यांनी उत्तर दिलं, "अजिबात नाही. ठाकरेच्या पात्रानं दुःख व्यक्त करणं मला आवडलं नाही. मी कधीच कोणत्याही गोष्टीवर दुःख व्यक्त करत नाही."
उपहास आणि बोचरी टीका
चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असा एकही विषय नव्हता ज्यावर बाळासाहेब ठाकरेंनी आपली मतं मांडली नाहीत. राजकारण, कला, क्रीडा किंवा इतर कोणताही विषय असो बाळासाहेबांनी कायम त्यावर टिप्पणी केली. त्यांच्या शब्दांत एकतर उपहास असायचा किंवा विरोधकांवर बोचरी टीका.
त्यांच्याकडे अनेक गंमतीदार किस्सेही असायचे. पत्रकार वीर संघवी सांगतात, "बाळासाहेब एक किस्सा आवर्जून सांगायचे. एकदा रजनी पटेल यांच्या पार्टीत महाराष्ट्राच्या तत्कालिन कायदा मंत्र्यांनी प्रमाणाबाहेर मद्यपान केलं होतं. त्यामुळं ठाकरेंनी त्यांना गाडीतून घरी सोडण्याची तयारी दाखवली. मात्र तोपर्यंत मंत्रीमहोदयांचा स्वतःवरचा ताबा पूर्णपणे सुटला होता. त्यांनी गाडीतच मूत्रविसर्जन केलं."
गाडीमधून तो वास जाण्यासाठी खूप दिवस लागले, असं ठाकरे सांगायचे. काही दिवसांनी त्यांना तेच मंत्री ओबेरॉय हॉटेलमधल्या एका पार्टीत नशेमध्ये दिसले. यावेळी मात्र आपण त्यांना लिफ्ट देणं टाळल्याचं ठाकरे सांगत.
ठाकरे आडनावाची गोष्ट
ठाकरे हे मूळचे मध्य प्रदेशमधल्या मराठी भाषक कायस्थ परिवारातले होते.
'हिंदू ह्रदय सम्राट-हाऊ द शिवसेना चेंज्ड मुंबई फॉरएव्हर' पुस्तकाच्या लेखिका सुजाता आनंदन सांगतात, की व्हॅनिटी फेअर पुस्तकाचे लेखक विल्यम मॅकपीस ठेकरे यांचं लिखाण बाळासाहेबांचे वडील केशव ठाकरे यांना खूप आवडायचं. त्यांच्या नावापासून प्रेरणा घेत त्यांनी आपलं आडनाव ठैकरे असं बदललं. त्याचा अपभ्रंश ठाकरे असा झाला आणि नंतर तेच नाव प्रचलित झालं.
ठाकरे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात ही फ्री प्रेस जर्नलमधून व्यंगचित्रकार म्हणून केली. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण हेदेखील त्यावेळी त्यांच्यासोबतच काम करत होते.
'वसंत सेना' म्हणून टीका
त्यावेळी सत्तेवर असलेल्या काँग्रेसचा वरदहस्त असल्यामुळेच शिवसेनेची एवढी वाढ झाली असंही म्हटलं जायचं. मुंबईतलं कम्युनिस्ट आंदोलन मोडून काढण्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेची मदत घेतली होती. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलहातही शिवसेनेचा वापर करून घेतल गेला.
सुजाता आनंदन सांगतात, "त्याकाळी विनोदानं शिवसेनेला वसंत सेना म्हटलं जायचं. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांच्याशी असलेल्या सख्यामुळं सेनेला हे टोपण नाव मिळालं होतं."
"2007 साली झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं आपला सहकारी पक्ष भाजपच्या उमेदवाराऐवजी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना समर्थन दिलं होतं. त्यानंतर 2012 मध्येही काँग्रेसनं समर्थन मागितलं नसतानाही शिवसेनेनं प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला होता. हे केवळ तत्कालिन राजकारण नव्हतं," असंही सुजाता आनंदन यांनी सांगितलं.
आणीबाणीचं समर्थन
बाळासाहेब ठाकरेंनी सर्व विरोधकांना डावलून इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचं समर्थन केलं होतं. 1978 मध्ये जनता सरकारनं जेव्हा इंदिरा गांधींना अटक केली, तेव्हा त्याविरोधात शिवसेनेनं बंदही पुकारला होता.
महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आणीबाणीच्या समर्थनासाठी त्यांना भाग पाडलं होतं, असं सुजाता आनंदन यांनी म्हटलं.
आनंदन सांगतात, "चव्हाण यांनी निरोप पाठवून ठाकरेंसमोर दोनच पर्याय ठेवले होते. एक म्हणजे अन्य विरोधकांप्रमाणे अटकेसाठी तयार राहणं किंवा आपल्या ठेवणीतले कपडे घालून दूरदर्शनच्या स्टुडिओत जायचं आणि आणीबाणीचं समर्थन करायचं."
"हा निर्णय घेण्यासाठी त्यांना अर्ध्या तासाचा वेळ दिला होता. सरकार या प्रश्नावर गंभीर आहे याची ठाकरेंना जाणीव होती. कारण शंकरराव चव्हाणांनी निरोप पाठवतानाच पोलिसांचा एक ताफाही ठाकरेंच्या घरी पाठवला होता. आपल्या सहकाऱ्यांसोबत विचार-विमर्श केल्यानंतर ठाकरे अवघ्या पंधरा मिनिटांत दूरदर्शन स्टुडिओत जाण्यासाठी बाहेर आले."
बाळासाहेब ठाकरेंचा मुंबईमधल्या दाक्षिणात्य लोकांनाही विरोध होता. त्यांनी दक्षिण भारतीयांविरोधात 'पुंगी बजाओ और लुंगी हटाओ' अभियानच चालवलं होतं.
"तामीळ भाषकांची खिल्ली उडवताना ठाकरे त्यांना 'यंडुगुंडू' म्हणून संबोधायचे. मार्मिक साप्ताहिकाच्या प्रत्येक अंकात ते मुंबईत नोकरी करणाऱ्या दक्षिण भारतीयांची नावं छापायचे. त्यांच्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याचा त्यांचा आक्षेप होता," असं सुजाता आनंदन यांनी सांगितलं.
जावेद मियांदाद यांना दिलेली मेजवानी
एकीकडे बाळासाहेब ठाकरे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांच्या खूप विरोधात होते. तर दुसरीकडे पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियाँदादला आपल्या घरी मेजवानी देण्यात त्यांना काहीच गैर वाटलं नाही.
सुजाता आनंदन सांगतात, "जावेद मियाँदादच नाही, तर त्यांनी इमरान खानलाही जेवणाचं आमंत्रण दिलं असतं. त्यांची ठोस अशी कोणतीही विचारसरणी नव्हती. 1971 च्या नगरपालिका निवडणुकांत त्यांनी मुसलमानांनी वंदे मातरम न गायल्याचा मुद्दा मांडला होता. मात्र त्या निवडणुकीत सेनेला बहुमत मिळालं नाही."
"स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना दोन-तीन मतांची गरज होती. त्यांनी त्यासाठी इंडियनन युनियन मुस्लीम लीगचे अध्यक्ष बनातवाला यांचं समर्थन घेतलं.
दहा दिवसांपूर्वी ते मुसलमान आणि मुस्लीम लीगवर टीका करत होते. पण त्यांचं समर्थन घेताना बाळासाहेबांनी कोणताही संकोच बाळगला नाही.
त्यांचं पाकिस्तानसोबतचं धोरणंही असंच होतं. पाकिस्तानी सरकारला त्यांचा विरोध होता. मात्र वैयक्तिक पातळीवर पाकिस्तानी व्यक्तिंना भेटायला त्यांना कोणतीही अडचण नव्हती."
ठाकरे-पवार मैत्री
बाळासाहेब ठाकरे राजकीय मतं आणि वैयक्तिक संबंध यासाठी दुहेरी मापदंड कसे लावायचे याचं उदाहरण म्हणून त्यांच्या आणि शरद पवारांच्या मैत्रीकडेही पाहता येईल.
बाळासाहेब सभांमध्ये शरद पवारांची 'मैद्याचं पोतं' अशी खिल्ली उडवायचे. मात्र शरद पवारांशी त्यांचे कौटुंबिक संबंध होते. पवार, त्यांच्या पत्नी आणि मुलगी सुप्रिया सुळे यांना ते भोजनासाठी आमंत्रितही करायचे.
शरद पवार यांनी आपलं आत्मचरित्र 'लोक माझे सांगाति'मध्ये लिहिलं आहे, "तुमची एकदा का बाळासाहेबांशी मैत्री झाली की आयुष्यभर ते संबंध जपायचे. 2006 मध्ये माझी मुलगी सुप्रिया राज्यसभेची निवडणूक लढवणार अशी घोषणा केल्यानंतर त्यांनी मला फोन केला. ते म्हणाले, की शरदराव, आपली सुप्रिया निवडणूक लढवणार असल्याचं मी ऐकलं. तुम्ही मला याबद्दल काहीच सांगितलं नाही. ही बातमी मला दुसऱ्यांकडून का मिळाली?"
"मी त्यांना म्हटलं, की शिवसेना-भाजप युतीनं आधीच तिच्याविरुद्ध आपला उमेदवार घोषित केला होता. मी विचार केला आता तुम्हाला कशाला त्रास द्यायचा. बाळासाहेब म्हणाले, 'मी तिला अगदी लहान असल्यापासून पाहिलंय. ती माझी मुलगीच आहे. माझा कोणताही उमेदवार सुप्रियाच्या विरुद्ध लढणार नाही.' मी त्यांना विचारलं, 'तुम्ही भाजपच काय करणार? त्यांच्यासोबत तुमची युती आहे.' बाळासाहेबांनी विचारही न करता उत्तर दिलं, की कमळाबाईची चिंता करू नका. मी जे सांगेन तेच ते करतील."
शँपेनची मागणी
बाळासाहेब ठाकरे सिगार आणि बिअरचे शौकिन होते. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करायलाही ते संकोच करायचे नाहीत. 1995 मध्ये महाराष्ट्रात युतीचं सरकार आल्यानंतर एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. तेव्हा या पार्टीत शँपेन नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
सुजाता आनंदन सांगतात, "ही पार्टी मुंबईतील बिल्डर निरंजन हिरानंदानीचे वडील डॉक्टर एल. एच. हिरानंदानी यांनी दिली होती. जेव्हा ठाकरे तिथं पोहोचले, तेव्हा वेटर्स सॉफ्ट ड्रिंक आणि ज्यूस सर्व्ह करत होते.
ठाकरेंनी आपल्या भाषणात म्हटलं, की डॉक्टर हिरानंदानी खूप मोठे ईएनटी डॉक्टर आहेत. 'ई'चा अर्थ असतो इयर म्हणजेच कान. माझ्या कानांना इथं मधुर संगीत ऐकू येतंय. 'एन'चा अर्थ असतो नोज अर्थात नाक. माझ्या नाकालाही स्वादिष्ट पक्वन्नांचा वास येत आहे. 'टी'चा अर्थ थ्रोट म्हणेच घसा. माझा घसा ओला करण्यासाठी काहीतरी द्या."
"डॉक्टरांना त्यांचा आशय समजला. त्यांनी म्हटलं, की इथे मुख्यमंत्रीही आहेत त्यांच्या उपस्थितीत मद्यपान कसं करायचं? हे ऐकल्यानंतर बाळासाहेब खोलीमध्ये उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री मनोहर जोशींना म्हणाले, 'काय रे मन्या? तू पितोस की नाही?' हे ऐकल्यावर जोशींचा चेहरा पडला. त्यानंतर डॉक्टर हिरानंदानींना ते म्हणाले, की आम्ही नुकतंच सरकार बनवलं आहे. किमान शँपेन तर हवीच ना!" त्यानंतर ज्यूस पार्टीचं रुपांतर शँपेन पार्टीत झालं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)