You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कशी साकारली?
आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा आज वाढदिवस.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच आला होता. या सिनेमात बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीनने साकारली होती. तर बाळासाहेबांच्या पत्नीच्या अर्थात मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत अमृता राव होती.
पण नवाजनं बाळासाहेबांची व्यक्तिरेखा नेमकी कशी साकारली आहे, याबद्दल तमाम सिनेप्रेमींना उत्सुकता आहे.
याबाबत बीबीसीचे प्रतिनिधी समीर हाश्मी यांनी घेतलेल्या मुलाखतीत नवाजने सांगितलं की "ही भूमिका स्वीकारताना मनात कुठलीच शंका नव्हती. हा चित्रपट फक्त दोन तासांचा असेल, मी तर 52 वर्षांचा चित्रपट पाहिला आहे."
पुढं नवाज म्हणतो "मी एक अभिनेता आहे आणि मला सगळ्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात. मग ती गणेश गायतोंडे असो, वा मंटो असो किंवा ठाकरे असो.. ज्या प्रेरणेनं आणि श्रद्धेनं मी मंटोची भूमिका केली. तेवढीच मेहनत मी ठाकरेंसाठीही केली आहे."
शिवसेनेचे खासदार आणि निर्माते संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. तर अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहेत.
NDTVने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाच्या सिक्वलचाही विचार सुरू असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं.
"बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास एका चित्रपटात दाखवू शकत नाही. त्यामुळे या बायोपिकच्या सिक्वलचाही विचार केला असून त्याच्यावरही काम सुरू केलं आहे," असं ते म्हणाले होते.
दरम्यान, सिनेमाचा ट्रेलर लाँच होताच अनेकांनी याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
ट्रेंड एनलिस्ट तरण आदर्श यांनी 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त असल्याचं म्हटलं आहे.
अभिजीत मजुमदार यांनी नवाज यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
तर ट्रेलर लाँच होताच, त्यावर मीम्स देखील यायला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, या चित्रपटातील काही संवाद आणि दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. त्यावर अंजली यांनी ट्विट करत, यात फार कट्स नसावेत अशी आशा व्यक्त केली आहे. तसंच त्यांनी नवाजच्या कामाचं देखील यात कौतुक केलं आहे.
तर विशाल यांना हा ट्रेलर अजिबात आवडलेला दिसत नाही आहे. ते लिहितात, "बाळासाहेबांची खरी ओळख त्यांचा आवाज आहे. या ट्रेलरमध्ये आपल्याला नवाज दिसतोय, बाळासाहेब नाही. बाळासाहेबांच्या चाहत्यांना हे आवडणार नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)