बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा मोठा स्टार नाही - आमिर खान #5मोठ्याबातम्या

आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच मोठ्या बातम्या:

1) बाळासाहेबांपेक्षा मोठा स्टार नाही - आमिर खान

मुंबई आणि महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार नाही, असं अभिनेता आमिर खानने म्हटलं आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील 'ठाकरे' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने विचारले असता, "महाराष्ट्रात सगळ्यांनाच बाळासाहेबांचा चित्रपट पाहायचा आहे. त्यामुळे कोणताही निर्माता स्पर्धा करणार नाही," अशी प्रतिक्रिया आमिरने दिल्याची बातमी लोकमतने दिली आहे.

येत्या 25 जानेवारीला 'ठाकरे' या चित्रपट प्रदर्शित होत आहे. 25 जानेवारीला अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही, अशा आशयाचे पोस्ट शिवसेनेशी संबंधित लोकांकडून केले जात असल्याचं ही बातमी सांगते. "अन्य चित्रपट प्रदर्शित झाल्यास शिवसेना स्टाईल उत्तर देण्याचीही भाषा केली जात आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मात्र ही शिवसेनेची भूमिका नसल्याचे स्पष्ट केलं आहे," असंही या बातमीत म्हटलं आहे.

2) महामार्गालगतची दारू दुकानं पुन्हा सुरू होणार

राज्य शासनाने निकष शिथील केल्याने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतची बंद पडलेली सुमारे तीन हजार दारू दुकानं आणि परमिट रूम्स पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकसत्ताच्या बातमीनुसार, लोकसंख्येचा सध्याच्या निकष दारू परवानाधारकांना अडचणीचा ठरत असल्यानेच त्यात बदल करण्यात आला आहे. नव्या निकषानुसार पाच हजारांऐवजी तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये दारूची दुकानं सुरू करता येतील.

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतची दारू दुकानं बंद करण्याचा आदेश 16 डिसेंबर 2015 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2017 पासून सुरू झाली होती. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 8 हजार विविध दारू दुकानं किंवा परमिट रूम्स बंद पडली होती.

सर्वोच्च न्यायालयाने जुलै 2017मध्ये आदेशात बदल केला होता आणि काही अटींवर महामार्गालगतची मद्यविक्री करणारी दुकानं पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली होती.

उच्च न्यायालयाचा आदेश आणि अन्य राज्यांमधील लोकसंख्येचे निकष लक्षात घेता ग्रामपंचायती हद्दीतील लोकसंख्येच्या निकषात बदल करण्यात आल्याचं राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी यांनी 'लोकसत्ता'शी बोलताना सांगितले.

3) राज्यात सर्वाधिक सायबर गुन्हे

देशभरातील सर्वाधिक सायबर गुन्हे महाराष्ट्रात घडत आहेत, मात्र अटक झालेल्या आरोपींना शिक्षा होण्याचं प्रमाण मात्र शून्य टक्‍के असल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय गुन्हे अहवालानुसार ही आकडेवारी समोर आल्याची सकाळची बातमी आहे.

2015 मध्ये सायबर गुन्ह्यात 40 टक्के आरोपींना शिक्षा झाली होती. मात्र त्यानंतर शिक्षा होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. 2018 मध्ये हे प्रमाण शून्य टक्‍क्‍यांवर आलं आहे.

उद्योग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या राज्यात आणि मुंबईत सायबर गुन्हे वाढत आहेत. मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची नोंद होऊन आरोपी मुद्देमालासह पकडले जात असले तरी या गुन्ह्यात अटक आरोपींना आरोप सिद्ध होऊन शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असल्याचं समोर आलं आहे.

2015 मध्ये सायबर गुन्ह्यात एकूण अटक आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण 40.47 टक्के होते. तेच प्रमाण घटत 2016 मध्ये 23.53 टक्के, 2017 मध्ये 16.67 टक्के, तर जानेवारी 2018 पासून आतापर्यंत आरोप सिद्ध होण्याचं प्रमाण शून्य टक्‍क्‍यांवर आलं आहे.

4) भय्यू महाराजांची आत्महत्या नाही तर हत्या झाली - रामदास आठवले

"भय्यू महाराजांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाली असण्याची शक्यता आहे," असा खळबळजनक दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. या प्रकरणाची CBI चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही आठवलेंनी केल्याची बातमी News 18 लोकमतनं दिली आहे.

"मी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही याबात पत्र लिहिलं आहे. या प्रकरणाची CBI चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठवावं, असं आवाहन मी त्यांना केलं आहे," असंही रामदास आठवले म्हणाले.

पन्नास वर्षांच्या भय्यू महाराजांनी 12 जून 2018 ला आपल्या निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. हे आत्महत्येचं प्रकरण आहे, असं समजून पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर प्रकरण बंद करण्याची तयारी केली होती. मात्र त्यांचा ड्रायव्हर कैलास पाटील उर्फ भाऊ याला निवेश बडजात्या या वकिलांकडे पाच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली.

5) आरक्षणाने फक्त मानसिक समाधान: मुख्यमंत्री

आरक्षणामुळे केवळ मानसिक समाधान मिळतं. आरक्षणाचा नोकरी मिळवण्यात काहीही फायदा होत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात म्हणाल्याची बातमी TV9 मराठीनं दिली आहे.

शुक्रवारी (4 जानेवारी) नागपुरात जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित 'शोध मराठी मनाचा' या संमनेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली.

"आरक्षणाचा नोकरी मिळवण्यात काहीही फायदा होत नाही. शिक्षण खासगी झालंय. त्यामुळे बऱ्याच खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाचा फायदा मिळत नाही. एकंदरीत आरक्षणामुळे फक्त मानसिक समाधान मिळतं. खऱ्या अर्थे समाजाला पुढे न्यावं लागेल. स्वतः संधी निर्माण करावी लागेल, तेव्हाच आरक्षणाचं महत्त्व कमी होईल," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गेल्याच महिन्यात राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण देण्याची तरतूद केली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)