सिम स्वॅप म्हणजे काय, यापासून स्वतःचा बचाव कसा कराल?

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

सिम स्वॅपमुळे मुंबईमधल्या एका व्यापाऱ्याचं एका रात्रीत 1.86 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सिम स्वॅप प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीचं मोबाइल सिम कार्ड ब्लॉक करण्याची विनंती केली जाते.

सिम कार्ड ब्लॉक झाल्यावर नव्या सिमवर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) मिळवून त्याच्या खात्यावरून पैसे दुसऱ्या खात्यांवर वळवणे किंवा इतर प्रकारचे आर्थिक व्यवहार केले जातात.

आजकाल बहुतांश व्यवहार ऑनलाइन आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून केले जातात. तसंच सर्वांची बहुतांश माहिती समाजमाध्यमांवर उपलब्ध असते. या परिस्थितीचा फायदा घेऊन सिम स्वॅपिंगसारखे प्रकार घडतात. मुंबईच्या या व्यापाऱ्याच्या खात्यातून 28 वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे वळवल्याचं लक्षात आलं. केवळ एका रात्रीमध्ये हा प्रकार घडला आहे.

सिम स्वॅप कसं होतं?

सिम स्वॅप नक्की कसं घडतं आणि त्यापासून कसं रक्षण करायचं याबाबत सायबर सुरक्षातज्ज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी बीबीसीला माहिती दिली.

ते सांगतात,

साधारणतः 2011 पासून या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सिम स्वॅप एकटीदुकटी व्यक्ती करत नाही, त्यामध्ये अनेक लोकांचा समावेश असतो. ऑर्गनाइज्ड रॅकेटद्वारेच ते चालवले जातं. 2018 या वर्षभरात भारतात सुमारे 200 कोटी रुपये अशाप्रकारे पळवले गेले असल्याचं सायबर अँड लॉ फाऊंडेशनच्या अंतर्गत संशोधनामध्ये समोर आलं आहे.

1) आजवर समोर आलेल्या घटनांमध्ये बळी पडलेले लोक सुशिक्षितच होते मात्र योग्य काळजी न घेतल्यामुळे ते या गुन्ह्याला बळी पडले होते. विविध माध्यमं, सोशल मीडिया अशा विविध मार्गांचा वापर तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येतो. अनोळखी क्रमांकांवरून फोन करूनही तुमची माहिती घेतली जाते.

2) काही फिशिंग लिंक्स पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगितलं जातं आणि तुमची खासगी तसंच आर्थिक माहिती गोळा केली जाते. काहीवेळेस फसवणूक करणाऱ्या एजन्सीज बँकांचा डेटाबेसही विकत घेतात. एकदा तुमची माहिती मिळाली की खोटं ओळखपत्र तयार करून सिम ब्लॉक करण्याची विनंती मोबाइल कंपन्यांना केली जाते. व्हायरस किंवा मालवेअरचा उपयोग करूनही तुमची माहिती गोळा केली जाते.

3) मोबाइल कंपन्यांनी नवे सिम दिल्यावर त्यावर ओटीपी मिळवून आर्थिक व्यवहार केले जातात. नवे सिमकार्ड त्यांच्याकडे असल्यामुळे ओटीपी त्या फसवणूक करणाऱ्या लोकांकडेच जातो आणि ते पुढील व्यवहार करतात. तुमच्या खात्यातील पैसे अनेक लोकांच्या खात्यांवर वळवले जातात.

तुमच्या खात्यावर कोणी रक्कम वळवणार असेल तर...

एखाद्या व्यक्तीने तुमच्या खात्यावर रक्कम टाकतो असे सांगितलं तर ही वेळ सुद्धा थोडा विचार करण्याची आहे, असं प्रशांत माळी सांगतात.

"तुम्हाला त्यातले 10 टक्के पैसे देतो, तुम्हाला एकूण रकमेतील 10 हजार देतो, असं सांगण्यात येतं. थोड्या वेळानं तुमच्या खात्यात पैसे येतील असे फोन तुम्हाला येण्याची शक्यता आहे. असे पैसे एखाद्याला सिम स्वॅपद्वारे फसवून त्याच्या खात्यातले पळवलेले असू शकतात.

त्यामुळे तुम्हाला गुन्ह्याची कल्पना नसली तरी तुमच्या खात्याचा त्यात समावेश झाल्यामुळे तुम्ही त्यात अडकू शकता. म्हणूनच विनाकारण, अनोळखी व्यक्ती तुमच्या खात्यात पैसे वळवण्याची इच्छा दाखवत असेल तर त्याला बळी पडू नका."

सिम स्वॅपचा धोका टाळण्यासाठी काय कराल?

सिम स्वॅपला लांब ठेवण्यासाठी अॅड. प्रशांत माळी सांगतात, "प्रत्येक बँक अकाऊंटला इमेल अलर्ट लावण्याची गरज आहे. तसंच अचानक सिम बंद झालं तर बँकेला त्याचा अकाऊंटशी संबंध तोडण्यास सांगितलं पाहिजे.

सिम स्वॅपिंगचे प्रकार साधारणपणे शुक्रवारी, शनिवारी किंवा सलग सुट्यांच्यावेळी घडतात तेव्हा सुटी असल्यामुळे बळी पडलेल्या लोकांना मोबाइल गॅलरी तसंच बँकांशी संपर्क करण्यात अडथळा येतो. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये सिम बंद पडल्यास वेगाने पावलं उचलण्याची गरज आहे."

महत्त्वाची कागदपत्रे कोणाला देत आहात...

महाराष्ट्र सायबर विभागाचे एसपी बाळसिंह राजपूत यांनी बीबीसी मराठीला ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या लोकांच्या नेहमी होणाऱ्या चुकांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "कोणत्याही व्यक्तीला आपल्या क्रेडिट कार्डसंबंधी, आधार कार्डाशी संबंधी माहिती देऊ नये. जर तुम्ही ऑनलाइन व्यवहार करत असाल तर योग्य वेबसाईटवरुनच ते करत आहात का याची तपासणी करा. तसेच कोणत्याही व्यक्तीला ओटीपी, सीव्हीव्ही नंबर देऊ नये."

ते पुढे म्हणाले, "महत्त्वाची कागदपत्रे आपण कोणाला देत आहोत याकडेही लक्ष दिले पाहिजे. जर कागदपत्रांच्या छायांकित प्रती देत असाल तर त्यावर ती प्रत का देत आहात याचा उल्लेथ त्यावर करावा आणि ही प्रत त्याच कारणासाठी वापरली जावी असे नमूद करा. यामुळे त्याचा गैरवापर टळेल. तसेच छायांकित प्रती देताना समोरच्या व्यक्तीस किंवा संस्थेस त्याची गरज खरंच आहे का याचाही विचार केला पाहिजे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)