पुलवामा : कट्टरवाद्यांशी पुन्हा चकमक, 4 जवानांनी प्राण गमावले

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातल्या पिंगलेना भागात सोमवारी पहाटे झालेल्या गोळीबारात लष्कराचे चार जवान ठार झाले. या जवानांमध्ये एका मेजरचाही समावेश आहे. चकमकीत एक जवानही जखमी झाला आहे.

दोन्ही बाजूकडून होणारा गोळीबार थांबला असला तरी सेनेची या भागातील शोधमोहीम अजूनही सुरू आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कराच्या 55 राष्ट्रीय रायफल्स, CRPF आणि SGO यांनी पिंगलेना भागात संयुक्तपणे एक मोहीम हाती घेतली होती.

इथे कट्टरवादी लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. कारवाई सुरू झाल्यानंतर कट्टरवाद्यांकडूनही गोळीबार सुरू झाला. या गोळीबारातच लष्कराचे जवान ठार झाले.

मेजर डीएस ढोंढियाल, हेड कॉन्स्टेबल सावे राम, शिपाई अजय कुमार आणि हरी सिंह अशी ठार झालेल्या जवानांची नावं आहेत. शिपाई गुलजार मोहम्मद हे जखमी झाले आहेत. त्यांना लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.

या चकमकीत आपणही जखमी झालो, असा दावा एक नागरिक मुस्ताक अहमद यांनी केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)