पुलवामा हल्ला : फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली

पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या प्रशासनाने 5 फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. 14 फेब्रुवारीला झालेल्या या हल्ल्यात CRPFचे 40 जवान मारले गेले. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए महंमद या कट्टरपंथी संघटनेने घेतली आहे.

जम्मू काश्मीरच्या प्रशासनाने मिरवाईज उमर फारूख, अब्दुल गनी बट, बिलाल लोन, हाशिम कुरेशी आणि शबीर शहा यांचा सुरक्षा काढून घेतलेल्या नेत्यांच्या यादीत समावेश आहे. या आदेशात सैयद अली शहा गिलानी यांचा समावेश नाही.

पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की सरकार कोणत्याही फुटीरतावादी नेत्याला सुरक्षा पुरवणार नाही. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृह सचिव राजीव गउबा आणि इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक राजीव जैन उपस्थित होते.

या बैठकीत जम्मू काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

राजनाथ सिंह यांनी दिले होते संकेत

शुक्रवारी श्रीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान आणि आयएसआयचा निधी ज्यांना मिळतो त्यांना दिल्या जाणाऱ्या सरकारी सुरक्षेवर पुन्हा विचार केला जाईल. जम्म काश्मीरमधील काहींचा संबंध कट्टरपंथी संघटनांशी आहे, असं ते म्हणाले होते.

त्यानंतर जम्मू काश्मीरच्या गृह सचिवांनी राज्यातील फुटीरतावादी नेत्यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. फुटीरतावाद्यांना दिली गेलेली सुरक्षा पोलिसांनी दिली असल्याचं दिसून आलं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)