पुलवामा: काश्मिरी विद्यार्थी दहशतीच्या छायेत का वावरत आहेत?

    • Author, नवीन नेगी
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात शोकाकूल वातावरण आहे. आणि त्याचवेळी देशाच्या विविध भागातून हल्ल्याचा बदला घेण्याची भावनाही लोक व्यक्त करताना दिसत आहेत.

एकाचवेळी हल्ल्यात मरण पावलेल्या जवानांना श्रद्धांजली देतानाची दृश्यं टीव्ही आणि सोशल मीडियावर दिसतायत. तर त्याचवेळी हल्ल्याचा निषेध करणारं चित्रही रस्त्यावर दिसत आहे.

हा संताप हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या कट्टरवादी संघटना जैश ए महम्मदविरोधात आहे. आणि त्याची झळ देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षणासाठी राहणाऱ्या काश्मिरी तरुणांनाही बसताना दिसत आहे.

उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये काश्मिरी तरुणांवर हल्ला झाल्याच्या ताज्या घटना समोर आल्या आहेत. तिथं शिकणारे काश्मिरी तरुण भीतीच्या सावटाखाली जगताना दिसत आहेत.

डेहराडूनच्या एका खासगी कॉलेजात भौतिकशास्त्रात एमएस्सी करणाऱ्या एका काश्मिरी तरुणानं नाव न सांगण्याच्या अटीवर असं सांगितलं की पुलवामा हल्ल्यानंतर तो आणि त्याचे मित्र आपल्या वसतिगृहाच्या खोलीतून बाहेर पडलेले नाहीत.

ते पुढे सांगतात की, "दोन दिवसांपूर्वी आमच्या खोलीच्या बाहेर काही लोकांनी मोर्चा काढला आणि काश्मिरींना परत पाठवून द्या अशी घोषणाबाजी केली. तो जमाव प्रचंड संतप्त होता. त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या होत्या. ते काश्मिरींना देशाचे शत्रू आणि गद्दार म्हणत होते."

घोषणाबाजी करणारे लोक कुठल्या संघटनेचे होते, याची माहिती काश्मिरी विद्यार्थ्यांना नाहीए. मात्र त्यानं पुढं सांगितलं की, "ते लोक कुठल्या पक्षाचे अथवा संघटनेचे होते, हे मला माहिती नाही. मात्र त्यांच्या हातात तिरंगा होता. आणि ते भारत माता की जय अशा घोषणा देत होते."

काश्मिरी विद्यार्थी निशाण्यावर का?

पुलवामात 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान मारले गेले. त्याची जबाबदारी कट्टरवादी संघटना जैश ए महम्मदनं घेतली.

हल्ला करणारा 21 वर्षाचा तरुण आदिल अहमद होता.

पुलवामाच्या गुंडीबाग परिसरात राहणाऱ्या आदिल एक वर्षापूर्वीच जैश ए महम्मद या संघटनेत सामील झाला होता.

आणि यामुळेच देशाच्या विविध भागात काश्मिरी तरुणांवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होताना दिसत आहे.

डेहराडूनशिवाय चंदीगढमध्येही काश्मिरी तरुणांना धमकावल्याचं वृत्त समोर आलं आहे.

शिवाय बिहारची राजधानी पटनामध्येही काश्मिरी व्यापाऱ्यांच्य दुकानांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे.

काश्मिरी तरुण घरी परतायत

पुलवामा हल्ल्यानंतर सुरु झालेल्या निदर्शनं आणि घोषणांमुळे काश्मिरी तरुण भीतीच्या छायेत आहेत. त्यांनी पुन्हा घरी जाण्याची तयारी सुरु केली आहे.

डेहराडूनमध्ये शिकत असलेला एक काश्मिरी तरुण कालच जम्मूत पोहोचला. त्यानं सांगितलं की रविवारी सकाळच्या विमानानं तो घरी निघाला.

"मी सकाळी जौलीग्रांट एअरपोर्टवरून सकाळची फ्लाईट पकडली आणि जम्मूला पोहोचलो. इथं कर्फ्यू लागलेला आहे. त्यामुळे पुढे जाऊ शकत नाही. डेहराडूनला आमच्या वसतिगृहाबाहेर लोक घोषणाबाजी करत होते. त्यामुळे आम्ही घाबरलो होतो."

त्यानं पुढे सांगितलं की आमच्या कॉलेजात 300 काश्मिरी मुलं शिकतात. त्यातले माझे दोन मित्र काश्मीर खोऱ्यात परतले आहेत.

दरम्यान या स्थितीत आम्हाला पोलिसांनी प्रचंड मदत केली, तसंच पोलीस महासंचालकांनी स्वत: आम्हाला सुरक्षा देण्याचं आश्वासन दिल्याचंही त्यानं मान्य केलं.

पोलिसांचं म्हणणं काय आहे?

डेहराडूनच्या सुद्दुवाला परिसरात काश्मिरी तरुणींना कैद केल्याचंही वृत्त चर्चेत होतं. तब्बल 75 काश्मिरी तरुणींना वसतिगृहात डांबल्याचं सांगितलं जात होतं.

उत्तराखंड पोलिसांशी याबाबत बोलणं झालं तेव्हा त्यांनी ही केवळ अफवा असल्याचं सांगितलं शिवाय विद्यार्थ्यांनीही या वृत्ताचं खंडन केलं आहे.

सध्या वसतिगृहात 75 मुली आहेत. त्यांनीही अशा प्रकारच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलंय.

याशिवाय डेहराडूनमध्ये एका काश्मिरी तरुणानं सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्यानं त्याला अटक झाल्याचं वृत्त स्थानिक मीडिया आणि सोशल मीडियावर सुरू होतं.

याप्रकरणी डेहराडूनच्या सायबर सेल विभागाचे प्रमुख भारत सिंग यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारची कुठलीही कारवाई झालेली नाही. मात्र काश्मिरी तरुणांना घाबरवण्याच्या काही घटना घडल्याचं त्यांनी मान्य केलं आहे.

ते म्हणाले की, "यावेळी देशात असं वातावरण आहे की लोकांच्या भावना संतप्त आहेत. काही ठिकाणी मोर्चे आणि निदर्शनं झाली. मात्र कुठेही कुणाविरोधात तक्रार दाखल झालेली नाही."

दरम्यान उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी लोकांना शांत राहण्याचं आणि कायदा आपल्या हातात न घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच अफवांपासून दूर राहण्याचीही विनंती केली आहे.

तिकडे जम्मू काश्मीर पोलिसांनीही या सगळ्या घटना गांभीर्यानं घेऊन एक हेल्पलाईन सुरु केली आहे. काश्मीर झोन पोलीस नावाच्या ट्वीटर हँडलवरून असं आवाहन करण्यात आलंय की काश्मीरमध्ये किंवा काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला या हेल्पलाईनची मदत घेऊ शकतात.

सीआरपीएफनंही याप्रकरणाशी संबंधित एक नंबर काश्मिरी तरुणांसाठी जारी केला आहे. सीआरपीएफच्या ट्वीटर हँडलवरून कुठलीही अडचण आली तर या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

तसंच काश्मिरी तरुणांना डेहराडूनमध्ये धमकावल्याचं किंवा दहशत निर्माण केल्याचं वृत्त फेटाळण्यात आलं आहे. शिवाय कुठल्याही प्रकारच्य अफवा पसरवू नयेत असंही सीआरपीएफनं म्हटलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)