पुलवामा : पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्यास अमेरिकेने दाखवला भारताला हिरवा कंदील

पुलवामा हल्ल्यानंतर अमेरिकेनेही भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे असं स्पष्ट केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतरची ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याचे सर्वाधिकार लष्कराला दिले आहेत, हे पूर्वीच स्पष्ट केलं आहे. तर हा हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याच्या पाकिस्तानने इन्कार केला आहे.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांची 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी फोनवरून चर्चा झाली. या चर्चेत पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात निवदेनही प्रसिद्ध केलं आहे.

बोल्टन यांनी सीमेवर सुरू असलेल्या कट्टरवादाला तोंड देण्यासाठी भारताच्या स्वसंरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या संघटनांना धडा शिकवण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन बोल्टन यांनी दिलं. डोवाल यांनी या पाठिंब्याचं स्वागत केलं आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

'जैश ए महम्मदने भारत, अमेरिका आणि इतर देशांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे या संघटनेला पाकिस्तान थारा देणार नाही यासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांनी घेतला. मौलाना मसूद अझहरला 'जागतिक दर्जाचा दहशतवादी' ठरवण्यात यावं यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीची मार्गदर्शक तत्त्वं पाळण्याच्या दृष्टीने पाकिस्तानला जबाबदार धरलं जावं,' असं ही बोल्टन यांनी म्हटल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.

बॉल्टन यांनी या संदर्भात ट्विटही केलं आहे. ते म्हणतात, "मी अजित डोवाल यांच्याशी बातचीत करून पुलवामा हल्ल्याबाबत संवेदना व्यक्त केल्या. पाकिस्तानने जैश-ए-महम्मद वर कारवाई करावी. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने घालून मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करावं आणि दहशतवाद्यांना थारा देऊ नये."

पाकिस्तानचा नकार

पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी पुलवामात झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग नसल्याचं म्हटलं आहे. तर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी या हल्ल्याचा निषेध केला पण "कुठल्याही प्रकारचा हिंसाचार पाकिस्तान सरकारचा सहभाग कधीच नव्हता आणि नसेल," असंही ते म्हणाले.

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मात्र पाकिस्तानचा या संदर्भातील दावा फेटाळला आहे. "जैश ए महंमद या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही संघटना आणि संघटनेच नेतृत्त्व करणारे पाकिस्तानात आहेत. लष्कर ए तय्यबा आणि इतर दहशतवादी संघटनांनी या हल्ल्याचं स्वागत केलं आहे. हे गटही पाकिस्तानात आहेत. या संघटनांचं अस्तित्व आणि त्यांच्या हालचाली यांची माहिती नाही, असा दावा पाकिस्तान करू शकत नाही. पाकिस्तानने या गटांवर काहीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानचे संबंध सुस्पष्ट आहेत. हा हल्ला जैशने घडवला हे दाखवणारे पुरेस पुरावे आहेत."

"पाकिस्तान एकाबाजूला संवादची भूमिका घेत आहे तर दुसरीकडे दहशतवादी संघटना आणि दहशतवादला आश्रय देत आहे. पाकिस्तानने दहशतवादी गटांवर तातडीने कारवाई करावी," असंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

'चीनची भूमिका धक्कादायक'

अमेरिकेने कारवाईसाठी समर्थन दिलं असलं तरी चीनची या संपूर्ण हल्ल्यावरची प्रतिक्रिया मात्र सावध आहे. आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणाकर यांनी पाकिस्तान आणि चीन यांच्या संबंधावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "चीनची भूमिका धक्कादायक आहे. कारण चीनने या घटनेचा उघड निषेध केलेला नाही. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्रीचा आधारच भारतविरोध आहे, हे त्यांनी लक्षात आणून दिलं."

त्याचवेळी निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना कोणताही पर्याय निवडताना विचारपूर्वक केला पाहिजे आणि उतावीळपणा असता कामा नये, असं मत व्यक्त केलं आहे. जी कारवाई केली जाईल, ती संपूर्ण यशस्वी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)