'पुलवामात CRPFवर आत्मघातकी हल्ला करणाऱ्या आदिलच्या घरी जेव्हा भेट दिली..'

    • Author, जुबैर अहमद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

14 फेब्रुवारीला पुलवामात सीआरपीएफच्या तुकडीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान युद्ध पुकारण्याच्या सीमेवर आले होते. हल्ला जम्मू-श्रीनगर हायवेवर झाला. हल्ल्याच्या ठिकाणापासून हल्लेखोर आदिल डारचं घर केवळ 10 किलोमीटर दूर आहे.

1 वर्षापूर्वी आदिल डार आपल्या काकपोरा गावातून गायब झाला. त्यानंतर तो जैश ए मोहम्मद या कट्टरवादी संघटनेत दाखल झाला. आता त्याच्या हातात बंदूक होती.

काकपोरा गावात आदिलचं दुमजली घर आहे. पहिल्या मजल्यावर सगळा परिवार एकत्र राहतो. डारचं कुटुंब पेशानं शेतकरी आहे. प्रचंड थंडी आणि पावसात जेव्हा मी आदिलच्या घरी पोहोचलो तेव्हा त्याच्या दोन भावांनी आणि वडिलांनी बीबीसीशी बोलण्यास नकार दिला.

थोड्या वेळानं आदिलचे वडील गुलाम हसन थोडे मोकळे झाले. माझ्याशी बोलताना म्हणाले की, "मृतदेह घरी आला नाही. मुलाला दफन केलं नाही. त्यामुळे थोडं दु:ख वाटतंय"

सीआरपीएफच्या 40 जवानांच्या मृत्यूबाबत तुम्हाला दु:ख वाटत नाही का? हे विचारल्यावर ते म्हणाले, "फौजी आपलं काम करण्यासाठी येतात. त्यांच्या कुटुंबांनाही तितकंच दु:ख झालं असेल. आमच्याप्रमाणेच इतर परिवारांनाही त्यांच्या मुलांचे मृतदेह मिळाले नसतील, ते ही वेदना समजू शकतात."

आदिल जैश ए मोहम्मदशी संबंधित होता. मात्र पुलवामासह दक्षिण काश्मिरात पाकिस्तानातून चालवण्यात येणाऱ्या जैशच्या कारवाया खूपच कमी आहेत. तज्ज्ञांच्या मते दक्षिण काश्मिरात हिज्बुल मुजाहिद्दीन जास्त सक्रीय आहे.

हिज्बुल मुजाहिद्दीनचं नेतृत्व कधीकाळी शिक्षक असलेल्या 33 वर्षीय रियाज नायकू यांच्या हातात आहे. नायकू यांचं नाव मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर आहे.

कोण आहे रियाज नायकू?

नायकूचं गाव पुलवामाजवळचं बेगपुरा. सात वर्षापूर्वी गणितात पदवी घेतल्यानंतर नायकूने बंदूक हातात घेतली.

कधी ना कधी नायकूचा मृतदेहच घरी येईल असं त्याच्या परिवारानं आता मनोमन मान्य केलं आहे. नायकूचे वडील असदुल्लाह सांगतात की, कधी कुठं एन्काऊंटर झालं की मला वाटतं मृतांमध्ये माझ्याच मुलाचा समावेश आहे.

फुटीरतावादाचं समर्थन आणि पित्याच्या भावनांमध्ये फसलेल्या नायकूंना त्याबद्दल विचारल्यावर ते सांगतात की, "मुस्लिम म्हणून मला त्याचा गर्व आहे. तो ड्रग्ज किंवा इतर अवैध गोष्टींमध्ये अडकला असता तर आमचं नाव खराब झालं असतं, पण सध्या आम्हाला बरं वाटतंय की तो बरोबर काम करत आहे."

काश्मिरी समाज काय विचार करतो?

काश्मिरमध्ये तैनात असलेले सरकारी अधिकाऱ्यांना हे माहिती आहे की स्थानिक लोक कट्टरवाद्यांना मदत करतात.

डार किंवा नायकू यांचा परिवार अतिशय साधारण किंवा सामान्य आहे. पण यांची मुलं जेव्हा बंदूक हातात घेतात तेव्हा त्यांना समाजात अचानक सन्मान मिळतो. कट्टरवाद्यांना स्थानिकांचं मोठं सहकार्य असतं. जर स्थानिक लोकांनी त्यांना लपण्यासाठी आसरा दिला नाही, खाण्यापिण्याची सोय केली नाही, ते आल्यानंतर जर पोलिसांना माहिती दिली तर हे हिंसक आंदोलन टिकूच शकत नाही.

पण सुरक्षा दलांचंही स्थानिकांमध्ये मोठं नेटवर्क आहे. त्यामुळे एन्काऊंटर अशाचवेळी होतो जेव्हा कुणी स्थानिक कट्टरवाद्यांच्या येण्याजाण्याची माहिती पोलिसांना देतो. पण काही स्थानिक डार किंवा नायकूसारख्या लोकांना मदत करतात त्यामुळे ते बचावले जातात.

एन्काऊंटरवेळी कधी गावकरी कट्टरवाद्यांना पळून जाण्यासाठी मदत करतात तर कधी पोलिसांसमोर येऊन संघर्ष करतात. काहीवेळा सुरक्षा यंत्रणांवर दगडफेकीचेही प्रकार घडतात.

दरम्यान जम्मू काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना कट्टवाद्यांबद्दलच्या रणनीतीत तुम्ही बदल केला आहे का? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "माझ्या माहितीनुसार या सगळ्या कारवायांची रणनीती पाकिस्तानात बनते आणि बदलतेही. आणि यामागे पाकिस्तान आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात आहे."

काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या मुस्लिम विचारांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. त्यातली जैश आणि लष्कर या पाकिस्तानी संघटना आहेत. भारतातील काश्मीरच्या भागात त्यांचं अस्तित्व आहे. ज्यात काही स्थानिक कट्टरवादी असतात. पण बहुतेक कट्टरवादी सीमेपलीकडूनच येतात. या तीन संघटनांची मिळून बनलेली जिहाद काऊन्सिल पाकिस्तानात आहे. ज्यात मसूद अझहर आणि हाफिज मोहम्मद सामील आहेत.

विचारधारेत जरी अंतर असलं तरी या तीनही संघटनांमध्ये ऑपरेशनल ताळमेळ नक्की दिसतो. पुलवामात तेच झाल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

दिल्लीच्या जामिया मिलिया विद्यापीठातील अयमान माजिद यांनी काश्मिरातील फुटीरतावादी हिंसेवर संशोधन केलं आहे. ते सांगतात की, "माझ्या माहितीनुसार अशा प्रकारचे हल्ले यापुढे जास्त दिसणार नाहीत. जरी मीडियावाले अशा प्रकारच्या हल्ल्याची शक्यता वर्तवत असले तरी माझ्या अभ्यासानुसार अशा प्रकारचे मोठे हल्ले दुर्मीळ असतात."

अर्थात पुलवामा हल्ल्याची चौकशी सुरू आहे. मात्र हा हल्ला सरकारच्या रणनीतीचं अपयश आहे का? याचं उत्तर देताना काश्मीर विद्यापीठात शिकवणारे इब्राहिम वाणी सांगतात की, "सरकारनं गेल्यावर्षी कट्टरवादावर नियंत्रण आणल्याचा दावा केला होता. मात्र पुलवामाची घटना हा दावा फेटाळताना दिसते."

अधिकाऱ्यांना हे नक्की माहिती असतं की चकमकीत एक कट्टरवादी मारला गेला तर त्याठिकाणी दुसरा उभा राहतो. पोलिसांच्या रिपोर्टनुसार सक्रीय बंदूकधारी तरुणांची संख्या कायम 150 ते 250 च्या घरात असते. कट्टरवादी संघटनांना याची जाणीव आहे की एवढी संख्या सुरक्षा यंत्रणांना त्रास देण्यासाठी किंवा त्यांना बिझी ठेवण्यासाठी पुरेशी आहे.

काश्मिरात जनमताचा पेच

दक्षिण काश्मिरात सगळ्यात जास्त कट्टरवादी हल्ले होतात. ज्यात सुरक्षा दलातील जवान मारले जातात. हा पूर्णपणे सपाट भूप्रदेश आहे. इथं जंगल कमी आहे. त्यामुळे या भागात हिज्बुल मुजाहिद्दीन जास्त सक्रीय आहे. लष्कर आणि जैशचे कट्टवाद्यांसाठी इथं अडचण ठरू शकते. कारण त्यांना काश्मिरी भाषा येत नाही.

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार उत्तर काश्मिरात जैश आणि लष्करचे जास्त कट्टरवादी आढळून येतात. त्यांना या भागातील जंगल आणि रस्त्यांची नीट माहिती आहे. त्यांना लष्करी प्रशिक्षण दिलेलं असतं. हिज्बुलच्या कट्टरवाद्यांच्या तुलनेत त्यांचा अनुभवही जास्त असतो. यात पाकिस्तानातून आलेले लोक जास्त असतात. नुकतीच हंडवारा भागात एक चकमक झाली. जी 72 तास सुरू होती. आणि यात सुरक्षा दलातील जवानांना प्राण गमवावे लागले. याचं कारण सांगताना एक पत्रकार म्हणाले की इथं पाकिस्तानातून आलेले लोक सक्रीय होते. त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं कठीण होतं.

पुढचा मार्ग काय आहे?

काश्मिरात स्थिती सुधारत आहे, असं वाटत असताना पुलवामात हल्ला झाला असं राज्यपाल सत्यपाल मलिक सांगतात.

मलिक हे मान्य करतात की, काश्मिरातील हिंसा थांबवण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे पुन्हा चर्चेची सुरुवात.

पण पहिल्यांदा पाकिस्ताननं कट्टरवाद्यांना मदत करणं बंद करावं. तेव्हाच चर्चा शक्य आहे असं मलिक म्हणतात.

गुलाम हसन डार एका आत्मघातकी हल्लेखोराचे वडील आहेत. ते सध्याच्या परिस्थितीला केंद्र आणि राज्य सरकारला जबाबदार धरतात. ते आपल्या मुलाला कट्टरवादी बनण्यापासून रोखू शकले नाहीत. पण त्यांच्या मते काश्मिरातील हिंसा भारत-पाकिस्तानातील चर्चेमुळे बंद होऊ शकते.

डार यांच्या म्हणण्यानुसार हिंसेत माणसाचाच मृत्यू होतो. "हिंदू, मुस्लिम, शीख सगळी माणसंच आहेत. जर नेत्यांनी स्वार्थीपणे याचा विचार केला नसता तर याआधीच काश्मीर प्रश्नाची तड लागली असती."

पुलवामा हल्ल्यानंतर रोज सुरू असलेल्या एन्काऊंटरमुळे असं वाटतंय की हिंसेचा अंत नजीकच्या काळात शक्य नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)