Pakistan: बालकोटमध्ये IAFने केलेल्या हल्ल्यानंतरचे 'ते' फोटो खोटे - बीबीसी फॅक्ट चेक

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

भारताने पाकिस्तानमध्ये ज्या ठिकाणी हवाई हल्ला केला, त्या ठिकाणचे कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पाकिस्तानमध्ये खैबर पख्तुनख्वाह राज्यात बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद या कट्टरतावादी संघटनेचं सगळ्यात मोठं प्रशिक्षण केंद्र आम्ही लक्ष्य केलं, असं भारतानं स्पष्ट केलं होतं. या हल्ल्यात या संघटनेचे काही प्रमुख नेते ठार झाल्याचं भारतानं म्हटलं होतं.

14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे CRPF जवानांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 सैनिकांनी जीव गमावला.

जैश-ए-मोहम्मद संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या घटनेनंतर जैश-ए-मोहम्मद संघटना भारतात आणखी काही ठिकाणी हल्ले घडवणार असल्याचं भारताने सांगितलं. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बालाकोट इथे आक्रमण केल्याचं भारताने एका पत्रकार परिषदेत सांगितलं.

मात्र भारतीय अधिकाऱ्यांनी या आक्रमणाचे कोणतेही फोटो शेअर केले नाहीत.

दुसरीकडे, भारताच्या या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, फक्त एका खुल्या जागेतील काही झाडं मोडली गेली, अशा आशयाचे फोटो पाकिस्तानतर्फे शेअर करण्यात आले.

म्हणजे दोन्ही देशांतर्फे परस्परविरोधी दावे करण्यात आले. पाकिस्तानात करण्यात आलेल्या हवाई आक्रमणाचे आणि झालेल्या प्रचंड नुकसानाचे कथित फोटो अनेक शेअर करण्यात आले.

हे फोटो फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरच्या माध्यमातून हजारो वेळा शेअर करण्यात आले. मात्र हे फोटो खोटे असल्याचं बीबीसीच्या पडताळणीनंतर स्पष्ट झालं आहे.

फोटो क्रमांक 1

भारताने बालाकोट येथे केलेल्या हवाई आक्रमणात प्रचंड नुकसान झाल्याचा हा कथित फोटो आहे. घरं आणि इमारती भुईसपाट झाल्याचं या फोटोत दिसत आहे. मात्र सध्याच्या भारत-पाकिस्तान धुमश्चक्रीशी याचा संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

2005 मध्ये पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये झालेल्या भूकंपात नुकसान झालेल्या घरांचा हा फोटो आहे. या भूकंपात पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये 75,000 जणांचा मृत्यू झाला होता.

AFP वृत्तसंस्थेनं 10 ऑक्टोबर 2015 रोजी हा फोटो प्रसिद्ध केला होता.

फोटो क्रमांक 2

"I Support Amit Shah" नावाच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुप तसंच फेसबुक पेजेसवर एक फोटो वेगाने शेअर केला जात आहे. हे सगळे फोटोही त्याच भूकंपाचे आहेत. या फोटोतही प्रचंड नुकसान दिसत आहे.

पौला ब्रॉन्स्टीन यांनी टिपलेला हा फोटो आजही गेटी इमेजेसवर उपलब्ध आहे.

फोटो क्रमांक 3

आणखी एक फोटो व्हायरल होतोय, ज्यामध्ये अनेक शव पांढऱ्या कापडात गुंडाळण्यात आले आहेत. शेजारी लोक मदतकार्यात व्यग्र असल्याचं दिसत आहे. हा फोटो बालाकोटचा आहे, हे खरं. पण तो 2019चा नसून 2005 मधला आहे, जेव्हा या क्षेत्राला भूकंपाचे हादरे बसले होते.

हा फोटो AFPच्या फारूख नईम यांनी टिपला आहे.

फोटो क्रमांक 4

भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराचा कथित फोटो सोशल मीडियावरून सातत्याने शेअर केला जात आहे.

मात्र यातला पहिला फोटो 3 नोव्हेंबर 2014चा आहे. वाघा सीमेनजीक आत्मघातकी हल्ल्यात जीव गमावलेल्या व्यक्तींवर लाहोरमध्ये अंत्यसंस्कार करताचा हा फोटो आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या तत्कालीन बातमीनुसार, वाघा सीमेवर कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेत 57जणांनी जीव गमावला होता.

गेटी इमेजेववर हा फोटो आजही उपलब्ध आहे आणि हा फोटो राणा साजिद हुसेन यांनी टिपला आहे.

म्हणजे चुकीची माहिती पसरवण्यासाठी काही लोक नैसर्गिक आपत्तीनंतरचे किंवा आधी झालेल्या कट्टरतावादी हल्ल्यांचे फोटो आताच्या भारत पाकिस्तान तणावाचे फोटो म्हणून शेअर करत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)