पुलवामा हल्ल्याचे खोटे व्हीडिओ, जवानांचे खोटे फोटो होत आहेत शेअर – फॅक्ट चेक

    • Author, फॅक्टचेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटं पाडण्याची भूमिका घेतली आहे,. शिवाय सरकारने लष्कराला योग्य वाटतील ती कारवाई करण्याची मुभा दिलेली आहे.

अशातच भारतीय लष्कर आणि CRPFच्या जखमी जवनांचे अनेक फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत. काही फोटो आणि व्हीडिओंमध्ये तर सैनिक रक्तबंबाळ अवस्थेत दिसत आहेत.

या फोटोंच्या बरोबरीने नागरिकांना पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी प्रक्षोभित करणारे संदेशही पसरवले जात आहेत. या फोटोंवरील कमेंटस हजारोंच्या संख्येने आहेत.

यातील बहुतेक कमेंटस सरकारने पाकिस्तानवर हल्ला करावा, अशी मागणी करत आहेत.

पण त्यापैकी बरेच फोटो आणि व्हीडिओ पुलवामा हल्ल्याशी संबंधित नव्हते, असं बीबीसीच्या तपासातून दिसून आलं आहे. लोकांनी शेअर केलेले काही फोटो तर सीरिया, रशिया आणि नक्षलवादी हल्ल्यांमधलेही असल्याचं दिसून आलं आहे.

14 फेब्रुवारीचा हल्ला काश्मीरमधील संरक्षण दलावर आतापर्यंतचा सर्वांत घातक हल्ला होता. या हल्ल्यांतील फोटो आणि व्हीडिओ शेअर करू नयेत, अशी विनंती काही अधिकाऱ्यांनी माध्यमांना आणि नागरिकांना केली होती.

त्यातच एक फोटो व्हायरल होतोय, ज्यात एक सैनिक छातीवरील जखमांना मलमपट्टी केलेल्या अवस्थेत धैर्याने, हातात रायफल घेऊन चालताना दिसत आहे.

"सैन्याला पूर्ण मोकळीक दिली आहे, हे समजताच हा जखमी सैनिक बदला घेण्यासाठी हॉस्पिटलमधून उपचार सोडून बाहेर पडला आहे. हे आपल्या सैनिकांचं धैर्य आहे. वंदेमातरम, जय हिंद," असा संदेश या फोटोसह व्हायरल होत आहे.

पण एक साधं गुगल इमेज सर्च केलं असता असं पुढे आलं की हा फोटो रशियामधला आहे.

Yandex या सर्च इंजिनवर हा फोटो 2004मधील असल्याचं दाखवलं आहे. काही कट्टरवाद्यांनी शाळेवर ताबा मिळवला होता, त्यात अनेक लोक मारले गेले होते. तेव्हा या जवानाने जखमी होऊनही कट्टरवाद्यांविरुद्ध लढा दिला, अशी या फोटोमागची कथा होती.

सीरियातील व्हीडिओ

एका व्हीडिओमध्ये एक कार चेक पॉईंटजवळ येते आणि मोठा स्फोट होतो, असं दाखवलं आहे. पुलवामा हल्ला झालेल्या ठिकाणी CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला व्हीडिओ, असं याचं वर्णन केलं जात आहे.

पण या व्हीडिओमध्ये दिसत असलेला भूप्रदेश आणि आजूबाजूची स्थिती ही काश्मीरमधील नाही. रिव्हर्स सर्च केल्यानंतर हा व्हीडिओ सीरियातील कार बाँब हल्ल्याचा असल्याचं दिसून येतं.

सीरियातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील ही घटना आहे. इस्राईलचं वृत्तपत्र हारेट्झने (Haaretz) 12 फेब्रुवारीला हा व्हीडिओ शेअर केला आहे.

 2017चा माओवादी हल्ला

आणखी एका फोटोत भारताच्या राष्ट्रध्वजात लपेटलेल्या शवपेट्या आणि त्यासमोर आदरांजली वाहतानाचे सैनिक दिसत आहेत. पण हा फोटो 2017मध्ये छत्तीसगड इथल्या सुकमात CRPFवर झालेल्या हल्ल्यानंतरचा आहे.

पुलवामातील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांना नागरिक आणि राजकीय लोक आदरांजली वाहतानाचे अनेक फोटो शेअर होत असताना काही पेजसवर मात्र जुने फोटो शेअर केले असल्याचं दिसतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)