You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानात अभिनंदन यांची 'भारत माता की जय'ची घोषणा : BBC Exclusive
- Author, मोहम्मद इलियास खान
- Role, बीबीसी प्रतिनिधी, पाकिस्तानहून
विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची पाकिस्तान उद्या म्हणजेच शुक्रवारी सुटका करणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत केली आहे.
शांततेचं पाऊल म्हणून आम्ही सुटका करत आहोत, असं इम्रान खान म्हणाले.
पण अभिनंदन वर्तमान यांना नेमकं कुठल्या परिस्थितीत पकडण्यात आलं. त्याच वेळी नेमकं काय घडलं याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला आहे.
अभिनंदन जेव्हा पॅराशूटमधून खाली आले तेव्हा त्यांनी ते भारताचं उतरले आहेत का, असा पहिला सवाल केला.
पाकिस्तानातल्या मोहम्मद रझाक चौधरी (58) यांनी अभिनंदन यांना पॅराशूटमधून खाली येताना पाहिलं. चौधरी हे पाकिस्तानातल्या भिंबर जिल्ह्यातल्या होरान गावचे रहिवाशी आहेत. तसंच ते पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या पक्षाचे (PTI) कार्यकर्तेही आहेत.
"मी त्या विमानावर हल्ला झाल्याचं पाहिलं. त्यानंतर पॅराशूटमधून एक पायलट (अभिनंदन वर्तमान) खाली येताना पाहिलं. त्या पॅराशूटवर भारतीय झेंडा होता त्यामुळे तो भारतीय असल्याची मला खात्री झाली होती," असं चौधरी यांनी बीबीसीला सांगितलं.
"पायलटला जिवंत ठेवणं हा माझा पहिला उद्देश होता. पण तो ज्याठिकाणी उतरला त्याठिकाणी स्थानिक लोक धावत होते. ते त्याला मारहाण करतील याची मला भीती होती," असं ते पुढं सांगतात.
"आपण भारतातचं उतरलो आहेत का? असं त्याच्याजवळ आलेल्या तरुणांना विचारलं असता एका खोडकर तरुणाने होकारार्थी मान हलवली. त्याने पॅराशूटचा पट्टा काढला आणि भारताविषयी घोषणा द्यायला सुरुवात केली.
पण तिथल्या मुलांनी पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा दिल्या. त्यावेळी मात्र त्यानं बंदुक काढली आणि हवेत गोळीबार केला. पण तरुणांनी जेव्हा हातात दगड घेतले तेव्हा तिथून त्यानं पळ काढला आणि परत हवेत गोळीबार केला.
"त्यानं एका नदीत उडी मारली, त्यावेळी माझ्या एका पुतण्यानं त्याच्या पायावर गोळी मारली. तो पाण्यात पडला. हातातली बंदुक फेकून दे असं माझा पुतण्या ओरडला. तेव्हा त्यानं बंदुक टाकून दिली. त्यानं परत दुसरं हत्यार काढू नये म्हणून दुसऱ्या मुलानं त्याला पकडलं. त्यावळी पायलटनं खिशातली कागदपत्रं काढली आणि त्यातली काही फेकून दिली. काही कागदपत्रं तोंडात घातली. त्यातली काही कागदपत्र मुलांनी हिसकावली आणि ती त्यांनी नंतर आर्मीला (पाकिस्तान) दिली.
"मुलं रागाच्या भरात त्याला मारायला पुढं येत होती. पण काहींनी त्यांना थांबवलं. मी सुद्धा त्याला मारू नका असं सांगितलं. त्याला आर्मीकडे देऊन टाका असं म्हटलं."
बुधवारी विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचं विमान पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये पाकिस्तानी वायुसेनेने पाडलं आणि त्यांना अटक केली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)