You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Abhinandan: शत्रूविरुद्ध भारत एक देश म्हणून लढेल, एक देश म्हणून जिंकेल – पंतप्रधान मोदी
"शत्रूच्या हल्ल्याचा एकच उद्देश असतो, की भारताची प्रगती थांबावी, पण आम्ही त्यापुढे एक भिंत म्हणून उभं राहू. देश कधीच थांबणार नाही. भारत एक देश म्हणून लढेल आणि एक देश म्हणून जिंकेल," असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी 'मेरा बूथ, सबसे मजबूत' या कार्यक्रमात ते देशरातील भाजप कार्यकर्ते, स्वयंसेवक तसंच विविध क्षेत्रातील नागरिकांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करत आहेत.
मोदींनी एक कोटी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचंही भाजपकडून सांगण्यात येत असून ही सर्वांत मोठी व्हीडिओ कॉन्फरन्सिंग असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, बुधवारी पाकिस्तानकडून झालेला हवाई हल्ला आणि वायुदलातील विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द केला जावा. अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र ठरल्याप्रमाणे पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
आपले बूथ हीच आपली ताकद आहे, आपला किल्ला आहे. त्यामुळे बूथ जिंकलं तर 'संकल्प से सिद्धी' हे आपलं ब्रीदवाक्य प्रत्यक्षात येईल, असं मोदी यावेळी म्हणाले.
एक महिन्यापासून या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचे आभारही पंतप्रधानांनी मानले.
पाहू या मोदींच्या भाषणातील काही ठळक मुद्दे -
- देशामध्ये सध्या भावनांचा एक वेगळाच स्तर पहायला मिळत आहे. देशातील जवान सीमेवर आणि सीमेच्या पलीकडेही आपला पराक्रम दाखवत आहेत. संपूर्ण देश एकजुटीनं आपल्या जवानांसोबत उभा आहे. सगळं जग आपली इच्छाशक्ती पाहत आहे.
- मी वैभवशाली भारताचं चित्र पाहू शकतोय. आपण मिळून देशाला प्रगतीपथावर नेऊया. देशाचा अभूतपूर्व विश्वास हेच आपलं भांडवल आहे. भारत सध्या अशाठिकाणी येऊन पोहोचला आहे, जिथून पहिल्यापेक्षा एक मजबूत झालेला देश मला दिसतोय. या देशाच्या निर्मितीसाठी जनतेचा सहभाग आणि संवाद आवश्यक आहे.
- तुमच्या प्रेरणेनं नवीन भारताचा संकल्प सिद्ध होईल.
- तुम्ही सरकारच्या योजनांशी लोकांना जोडत आहात. ही चांगली गोष्ट आहे. मात्र आपल्या प्रयत्नांचा जोर वाढवायला हवा. आपल्या परीक्षेची वेळ जवळ आली आहे. विद्यार्थी कितीही हुशार असले तरी अभ्यास करावा लागतोच.
- इच्छाशक्ती प्रबळ असते, काही करून दाखवण्याचा दृढ निर्धार असतो तेव्हा काहीही शक्य करून दाखवता येतं.
- कुंभमेळ्यादरम्यानची स्वच्छता संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरली होती. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी यंदाचा कुंभमेळा ऐतिहासिक केला. ज्यांनी कुंभमेळ्यात परिसर स्वच्छ ठेवला त्यांचे पाय धुवावेत अशी इच्छा मनात आली. त्यामुळे मी त्यांचे पाय धुतले आणि हे आपले संस्कार आहेत.
- देशाच्या अर्थव्यवस्थेत मध्यमवर्ग निर्णायक भूमिका बजावतो. खऱ्या अर्थाने मध्यववर्ग देशाचा कणा आहे. मध्यमवर्ग देशासाठी मोठ्या प्रमाणावर योगदान देतो. या मोबदल्यात त्यांची काहीच अपेक्षा नसते. मात्र तरीही अनेक दशकं हा मध्यमवर्ग उपेक्षितच राहिला आहे. आमच्या सरकारने या मध्यमवर्गाच्या उन्नतीकरणासाठी पावलं उचलली आहेत, जेणेकरून त्यांना दिलासा मिळेल.
- मध्यम वर्गाला भडकावण्याची आणि त्यांना चुचकारण्याची अनेक उदाहरणं तुम्ही अनुभवली असतील. नोटाबंदीनंतर उत्तर प्रदेशात झालेल्या निवडणुकांमध्ये तिथल्या मध्यम वर्गाने आम्हाला पूर्ण समर्थन दिलं. GSTच्या अंमलबजावणीनंतर गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये व्यापाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला.
- जेव्हा प्रतिस्पर्धी आपल्या देशावर हल्ला करतात तेव्हा इथल्या प्रगतीला, विकासाला खीळ बसावी असाही त्यांचा हेतू असतो. त्यांचा हा हेतू साध्य होऊ नये यासाठी आपण खंबीर होऊन एकजूट दाखवायला हवी.
- विरोधी पक्ष तुम्हाला नकारात्मक दिशेने जाण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यांच्या प्रयत्नांनी तुम्ही विचलित होऊ नका. सकारात्मक गोष्टी पाहा.
- सोशल मीडिया लोकशाहीवादी माध्यम आहे. सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्तीला आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)