You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IAF कारवाई : बालाकोटची कारवाई निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन का? पाकिस्तानी माध्यमांचा सवाल
बालाकोटची कारवाई ही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केली जात असल्याचा सवाल पाकिस्तानी माध्यमांमध्ये विचारला जात आहे.
भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये असलेलं जैश-ए-मोहम्मदचं तळ उद्ध्वस्त केलं. असं भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितलं.
मंगळवारी भारतीय वायुदलाने हल्ला केल्याची बातमी आल्यापासून ते या क्षणापर्यंत भारतीय वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रं आणि सोशल मीडियावर भारताच्या कारवाईचीच चर्चा सुरू आहे.
भारताने हा हल्ला कसा केला, कधीपासून तयारी केले याचे वर्णन आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळत आहे. या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हीडिओ देखील व्हायरल झाला आणि लोक फॉरवर्ड करताना सांगत होते की हा बालाकोटच्या कारवाईचा व्हीडिओ आहे, पण त्याची हकीकत काही वेगळीच होती.
काही भारतीय माध्यमं म्हणत आहेत की युद्ध झालं तर पाकिस्तान भारतासमोर टिकणार नाहीत. तर पाकिस्तानचे नेते देखील असा सूर आळवत आहेत की आम्ही आमच्या सेनेच्या पाठीशी आहोत. एकाच घटनेवरून पाकिस्तान आणि भारताच्या माध्यमामध्ये कमालीचा फरक आहे. नेमका काय आहे हा फरक?
1. हल्ल्यात किती जण ठार झाले?
भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सांगितलं की भारतीय वायुदलाने केलेल्या कारवाईमध्ये जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त करण्यात आला. त्यांनी कुठेही सांगितलं नाही की या हल्ल्यात किती जण ठार झाले. पण सरकारी सूत्रांच्या हवाल्याने भारतातल्या बहुतांश माध्यमांनी म्हटलं आहे की या हल्ल्यात किमान 300 जण ठार झाले आहेत. एनडीटीव्ही आणि आज तक नं ही बातमी केली.
पाकिस्तानची माध्यमं म्हणत आहेत की भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात एकही माणूस ठार झाला नाही. पाकिस्तानचं वृत्तपत्र द डॉननं बालाकोट भागातील जब्बा या गावातल्या रहिवाशांचं काय म्हणणं आहे ते प्रसिद्ध केलं आहे.
ते म्हणत आहेत की आम्ही स्फोटांचे आवाज ऐकले. गावापासून काही अंतरावर असलेल्या टेकडीवर हे स्फोट झाले पण कुणाचा मृत्यू झाला नाही.
पाकिस्तानचं वृत्तपत्र एक्स्प्रेस ट्रिब्यूननं एक बातमी प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये ते म्हणतात 'रक्त नाही, मृतदेह नाही आणि कुठेही शोकाकुल वातावरण नाही.'
ज्या ठिकाणी भारताने हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा होत आहे त्या ठिकाणचा दौरा ट्रिब्यूनच्या पत्रकाराने केला. त्या ठिकाणी फक्त काही झाडे जळाली आहेत असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या भागातले सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत आणि कुठेही रक्त दिसत नाही की मृतदेह दिसत नाहीत की शोकाकुल वातावरण दिसत नाही.
2. भारतीय एअरफोर्सची कारवाई
वायुसेनेनं तीन दहशतवादी तळ नष्ट केले. त्या ठिकाणी 1000 किलोची स्फोटकं टाकली. हे ऑपरेशन वीस मिनिटं चाललं आणि नंतर भारतीय वायुदलातले फायटर्स परतले असं एनडीटीव्हीनं म्हटलं आहे.
भारताच्या एअरफोर्सचं कौतुक भारतात सर्व स्तरातून होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील भारतीय एअरफोर्सचं कौतुक केलं आहे. पण जिओ टीव्हीनं एक बातमी प्रसिद्ध केली त्यात म्हटलं आहे की भारतीय विमानांना पाकिस्ताननं पळवून लावलं.
"नियंत्रण रेषा ओलांडून भारताची विमानं काही किमी आत घुसली. नियंत्रण रेषा ओलांडल्यानंतर साधारणतः हे अंतर चार मिनिटांचं असावं पण त्यांना पाकिस्तान एअरफोर्सनं आव्हान दिलं. त्यानंतर भारतीय विमानांनी पळ काढला आणि जाताना काही स्फोटकं पाडली त्यात काही मनुष्यहानी झाली नाही."
3. पाकिस्तान आणि भारताचे नेते काय म्हणत आहेत?
पाकिस्तानच्या वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी भारताच्या 'आक्रमणा'चा निषेध केला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताच्या कृत्याचा निषेध केला आहे.
तर पंजाबच्या विधानसभेचे सभापती चौधरी परवेझ इलाही यांनी म्हटलं की भारताचं हे कृत्य भ्याडपणाचं आहे. जर युद्ध सुरू झालं तर भारताची सुटका नाही आणि काश्मीर स्वतंत्र होईल. हे वृत्त डेली टाइम्सनं दिलं आहे.
भारताच्या नेत्यांनी वायुदलाने केलेल्या हवाई हल्ल्याचं कौतुक केलं आहे. सत्ताधारी भाजपने या हवाई हल्ल्यासाठी भारतीय वायुदलाचं कौतुक केलं आहे, पण याबरोबरच विरोधी पक्षातल्या नेत्यांनी देखील हवाई दलाचं कौतुक केलं आहे. अखिलेश यादव, शरद पवार, अरविंद केजरीवाल, कपिल सिब्बल यांनी लष्कराचं कौतुक केलं आहे. बिजनेस टुडेनी ही बातमी केली.
4. जैश-ए-मोहम्मदचा 'तो' कॅंप
सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या फोटोंच्या आधारावर जैश-ए-मोहम्मदचं दहशतवादी प्रशिक्षण केंद्र किंवा त्यांचा कॅंप कसा होता हे एनडीटीव्हीनं सांगितलं आहे.
साधारणतः 600 जणांना राहता येईल इतका मोठा हा कॅंप होता. स्विमिंग पूल, जिम, अॅम्युनेशन रूम इत्यादी सुविधा या कॅंपमध्ये होत्या असं म्हटलं आहे.
पाकिस्तानचं वृत्तपत्र ए एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या पत्रकाराने असा दावा केला की भारताने जो तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला त्या ठिकाणी आपण गेलो असता तिथं अवशेष देखील दिसले नाहीत. त्या ठिकाणी जळालेल्या झाडांव्यतिरिक्त काही नाही.
आज तकनं एक बातमी केली आहे ज्यात त्यांनी पाकिस्तान पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. ज्या ठिकाणी भारताने कारवाई केली ते ठिकाण लष्कराने सील केलं आहे.
5. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कारवाई?
भारताच्या भूमिकेवर विश्लेषक प्रश्नचिन्ह उचलत आहेत असं द डॉननं म्हटलं आहे. लंडन येथील विश्लेषक राहुल बेदी यांनी न्यूयॉर्क टाइम्सकडे म्हटलं की भारताने जो कॅंप उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे त्या कॅंपच्या काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननेच सफाया केला. त्यांना ही माहिती गुप्तहेर खात्याने दिली असं ते सांगतात.
भारतात निवडणुका येत आहेत आणि आपण काही केलं हे दाखवण्यासाठी हे कृत्य केल्याचं बेदी यांनी म्हटलं आहे.
एक्स्प्रेस ट्रिब्यूनमध्ये निवृत्त ले. जनरल शफात उल्लाह शहा यांनी एक पुलवामाचं सत्य? असा लेख लिहिला आहे. त्या लेखात पुलवामा हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.
पुलवामा हल्ल्याचा हल्लेखोर आदिल दार होता यावर शहा यांनी जोर दिला आहे. भारतातले बहुसंख्य शहरी मध्यमवर्गीय हे हिंदुत्ववादी राष्ट्रवादाचा उदोउदो करतात. दुसऱ्यांच्या बलिदानावरच या राष्ट्रवादाचं पोषण होतं. भाजपला ही जाणीव आहे की देशातले 16 कोटी दलित, 10 कोटी आदिवासी आणि इतर धर्मीय त्यांच्या पाठीशी नाहीत. म्हणून उग्र राष्ट्रवादाचा वापर ते करत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)