You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IAF कारवाईचं टायमिंग मोदी, डोवलसह या 7 जणांना माहिती होतं - #5मोठ्याबातम्या
आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्या अशा:
1. 'पाकिस्तानमधल्या कारवाईची याच 7 लोकांना माहिती होती'
पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये भारतीय वायुसेनेनी केलेल्या हल्ल्याचं टायमिंग फक्त सात जणांनाच माहीत होतं, असं वृत्त द हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.
बालाकोट येथे असलेल्या जैश-ए-मोहम्मदचं तळ भारताने 26 फेब्रुवारी रोजी केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त केलं, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली होती.
पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि इंटेलिजेन्स ब्युरो आणि रॉ या दोन गुप्तहेर संघटनांचे प्रमुख. यांनाच या हल्ल्याच्या टायमिंगची माहिती होती. मंगळवारी सकाळी 3.40 ते 3.53 या काळात हा हल्ला झाला.
भारतीय वायुदलाने मंगळवारी पहाटे बालाकोट इथल्या जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला केला. या हल्ल्यात 200 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याचा दावा कऱण्यात आला आहे. या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, मुंबईसह इतर पाच शहरांमध्ये 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
'लोकसत्ता'नं यासंबंधीची बातमी प्रसिद्ध केली आहे. काश्मीर खोऱ्यातील इतर काही कट्टरतावादी कोणत्याही पद्धतीनं प्रत्युत्तर देऊ शकतात. त्यामुळे पुढील 72 तास हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सांगत, हा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधील तीन शहरांनाही 'हाय अलर्ट' देण्यात आला आहे.
2. पाकिस्तानी संरक्षण मंत्री झाले या वक्तव्यामुळं ट्रोल
भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांनतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री परवेझ खटक हे ट्विटरवर ट्रोल होत आहेत. पाकिस्तानी सेना भारतीय वायुदलाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला तयार होती, मात्र खूप अंधार होता, असं वक्तव्यं परवेझ यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.
त्यांच्या या विधानाची क्लिप पाकिस्तानी पत्रकारांनी सोशल मीडियावर शेअर केली आणि त्यानंतर परवेझ यांना ट्रोल करायला सुरुवात झाली.
NDTV नं ही बातमी दिली आहे. "आमची वायुसेना तयार होती. मात्र हल्ला रात्री झाला आणि अंधार होता. त्यामुळं किती नुकसान होतंय, याचा अंदाज आला नाही. म्हणून त्यांनी वाट पाहिली. आता त्यांना स्पष्ट सूचना मिळाल्या आहेत," असं पाकिस्तानी संरक्षण मंत्री म्हणत आहेत.
3. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज सादर होणार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा 2019-20 या वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे.
दुपारी 2 वाजता विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत अर्थसंकल्प मांडला जाईल. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेच्या सभागृहात अर्थसंकल्प मांडतील.
'महाराष्ट्र टाइम्स'नं ही बातमी प्रसिद्ध केली आहे. अंतरिम अर्थसंकल्पात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या कोरडवाहू आणि जिरायती शेतकऱ्यांना अनुदान जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते.
4. कर्णबधिर विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, सरकारकडून मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन
मागण्या मान्य झाल्यामुळे पुण्यातील कर्णबधिर विद्यार्थ्यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं आहे. राज्य सरकारनं सभागृहात काही मागण्या मान्य केल्याचं तसेच उर्वरित मागण्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.
सरकारच्या वतीनं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 'एबीपी माझा'नं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
गेल्या दोन दिवसांपासून हे तरुण आपल्या मागण्यांसाठी पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलनाला बसले होते. आंदोलक तरुणांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं सर्वच स्तरातून सरकारवर टीका होत होती.
5. दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प 'पुलवामा शहिदांच्या कुटुंबीयांना समर्पित'
'आप' सरकारनं मंगळवारी दिल्ली विधानसभेत 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना समर्पित केला.
'द इंडियन एक्सप्रेस'नं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सर्व आमदारांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात बालाकोटमध्ये हल्ला करणाऱ्या भारतीय वायुदलातील वैमानिकांचं अभिनंदन केलं.
दिल्ली सरकारनं यंदाही आपल्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी भरीव तरतूद केली आहे. शिक्षणासाठीची तरतूद अर्थसंकल्पाच्या 26 टक्के आहे. सलग पाचव्या वर्षी दिल्ली सरकारने अर्थसंकल्पात शिक्षणासाठी सर्वाधिक तरतूद केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)