You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Abhinandan: विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तान आज करणार सुटका: इम्रान खान यांची घोषणा
विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची पाकिस्तान शुक्रवारी सुटका करणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा गुरुवारी संध्याकाळी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत केली.
शांततेचं पाऊल म्हणून आम्ही सुटका करत आहोत, असं इम्रान खान म्हणाले.
"मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मला यश आलं नाही," असंही ते म्हणाले. "नरेंद्र मोदी केवळ निवडणुकांवर डोळा ठेवून युद्धाचं वातावरण निर्माण करत आहेत. पण पाकिस्तानवर जर भारताने पुन्हा हल्ला केला तर पाकिस्तान मजबुरीने प्रतिहल्ला करेल," असंही त्यांनी सांगितलं.
"आम्हाला शांतता हवी आहे आणि तुम्ही दहशतवादाचे पुरावे दिल्यास आम्ही कारवाई करू," असंही त्यांनी मोदींना उद्देशून म्हटलं.
अभिनंदन वर्तमान यांना सोडावं, अशी मागणी भारताच्या वतीने काल करण्यात आली होती.
बुधवारी विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचं विमान पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये पाकिस्तानी वायुसेनेने पाडलं आणि त्यांना अटक केली.
कोण आहेत अभिनंदन?
अभिनंदन वर्तमान हे विंग कमांडर पदावर कार्यरत आहेत. त्यांनी 19 जून 2004 मध्ये भारतीय वायुसेनेत प्रवेश केला. अभिनंदन MiG21 बिसॉन विमानाचं सारथ्य करत होते.
अभिनंदन यांचे वडील S. वर्तमान हेही निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. ते एअर मार्शलपदी कार्यरत होते.
काही वर्षांपूर्वी भारतातील एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अभिनंदन यांनी देशासाठी काम करण्यामागची भावना व्यक्त केली होती.
अभिनंदन यांना पाकिस्तानने पकडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर देशभरात त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना होत आहेत. ते सुखरूप मायदेशी परतावेत, यासाठी ठिकठिकाणी दुवा केल्या जात आहेत, सोशल मीडियावरही लोकांनी पोस्टद्वारे आपल्या प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, अभिनंदन यांच्या विडिलांनी एका पत्रात, अभिनंदन यांच्या व्हीडिओवर आणि लोकांनी त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनांबद्दल भावनिक संदेश दिला आहे.
"सर्वांनी व्यक्त केलेली काळजी आणि सदिच्छांबद्दल आभार. मी देवाचेही आभार मानतो, की अभी सुखरूप आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही, मानसिकदृष्ट्याही तो ठीक आहे. त्याला धाडसानं बोलताना पाहिलं. तो एक सच्चा शिपाई आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे. तुमचे सर्वांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतीलच," असं एअर मार्शल (निवृत्त) वर्तमान पुढे लिहितात.
"त्याचा छळ होऊ नये. तो हाती-पायी सुरक्षितपणे घरी परतावा, अशी प्रार्थना मी करतो. या कठीण काळात आमच्यासोबत ठामपणे उभं राहण्यासाठी आभार. तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला बळ मिळत आहे," असं एअर मार्शल वर्तमान (नि.) यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे.
जिनिव्हा कराराअंतर्गत युद्धकैदींना धमकावलं-घाबरवलं जाऊ शकत नाही तसंच त्यांचा अपमानही केला जाऊ शकत नाही. युद्धकैदींच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारची वातावरण निर्मिती आणि उत्सुकता निर्माण केली जाऊ शकत नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)