You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा निवडणूक 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर; माढा, मावळवर सस्पेन्स कायम
राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बारामती, सातारा, रायगडसह 12 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली.
बारामतीमधून सुप्रिया सुळे, साताऱ्यामधून उदयनराजे भोसले, कोल्हापूरमधून धनंजय महाडिक, रायगडमधून सुनील तटकरेंना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी मिळणार अशी चर्चा असली, तरी पहिल्या यादीत पार्थ यांचं नाव जाहीर करण्यात आलं नाही.
ठाण्यामधून आनंद परांजपे, ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील, परभणीमधून राजेश विटकर, जळगावमधून गुलाबराव देवकर यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
बुलडाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं राजेंद्र शिंगणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे बुलडाणाच्या जागेसाठी आग्रही होते. त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना उमेदवारी द्यायची होती. मात्र राष्ट्रवादीनं बुलडाण्यामधून आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे. हातकणंगलेची जागा आम्ही राजू शेट्टींसाठी सोडत असल्याचं, जयंत पाटील यांनी सांगितलं.
उर्वरित यादी आम्ही येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर करू. काही जागांसंबंधी काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
विश्वासात न घेता जागावाटप: स्वाभिमानी संघटनेची नाराजी
बुलडाण्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसनं राजेंद्र शिंगणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे बुलडाणाच्या जागेसाठी आग्रही होते. मात्र राष्ट्रवादीनं बुलडाण्यामधून आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे. हातकणंगलेची जागा मात्र आम्ही राजू शेट्टींसाठी सोडत असल्याचं, जयंत पाटील यांनी सांगितलं.
"चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केली आहे. ही गोष्ट आम्हाला पटलेली नाही, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलेल्या यादीवर नाराजी व्यक्त केली आहे. जागा वाटपावर तातडीनं निर्णय घेणं आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत घोळ सुरु ठेवला तर आम्ही प्रचार कधी करायचा," असा प्रश्न तुपकर यांनी उपस्थित केला आहे.
"स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बुलडाणा, वर्धा आणि सांगली या तीन जागांची मागणी केली होती. बुलडाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार दिला आहे. चर्चेनंतर अंतिमतः वर्धा किंवा सांगलीपैकी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचं मान्य झालं आहे. ही जागा काँग्रेस आमच्यासाठी सोडणार आहे," असं खासदार राजू शेट्टी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
सुजय विखे पाटलांविरोधात कोण?
राष्ट्रवादी काँग्रेसनं नगरमधील उमेदवारांचं नाव पहिल्या यादीत जाहीर केलं नसल्यानं सुजय विखे पाटलांविरोधात कोणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्न कायम राहिला.
सुजय विखे-पाटलांविरुद्ध चार उमेदवारांची नावं चर्चेत आहेत. अरूण जगताप, अनुराधा नागवडे, डॉ. सर्जेराव निमसे आणि प्रशांत गडाख. अरुण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. अनुराधा नागवडे या प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस आहेत. आधी पक्षात घेऊन मग त्यांच्या सदस्यत्वाचा विचार केला जाऊ शकतो. डॉ. सर्जेराव निमसे हे नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या आणि अन्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कार्यरत असलेले प्रशांत गडाख हे जिल्ह्यातलं तरूण नेतृत्व आहे, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे पाटील यांनी दिली.
या चारही उमेदवारांपैकी प्रशांत गडाख यांना पसंती मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे. प्रशांत हे यशवंतराव गडाख यांचे पुत्र आहेत. शरद पवार यांचीही इच्छा प्रशांत यांनी निवडणूक लढावी अशी आहे, असंही बाळ बोठे पाटील यांनी सांगितलं.
1991 च्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत यांचे वडील यशवंतराव गडाख यांनी बाळासाहेब विखे-पाटलांचा पराभव केला होता. काँग्रेसनं बाळासाहेब विखे पाटलांना उमेदवारी नाकारत यशवंतराव गडाखांना झुकतं माप दिल्यानं विखे-पाटलांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)