You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा 2019 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर.. नाना पटोले, सुशील कुमार शिंदे, प्रिया दत्त रिंगणात
काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये काँग्रेसच्या 21 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातून नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, प्रिया दत्त आणि नामदेव उसेंडी यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात जागांसाठी मदान होणार आहे. त्यातील नागपूर आणि गडचिरोली या दोन मतदारसंघात काँग्रेसनं आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
नाना पटोले हे नागपूरमधून निवडणूक लढविणार आहेत. याचाच अर्थ ते केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात उभं राहतील. त्यामुळे हा सामना लक्षवेधी ठरेल.
गेल्या निवडणुकीत नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवून ती जिंकली होती. मात्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत ते भाजपला रामराम करून पुन्हा स्वगृही आले.
सोलापूर मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. ते 77 वर्षांचे आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपच्या शरद बनसोडे यांनी त्यांचा दारूण पराभव केला होता.
दक्षिण मुंबई मतदार संघातून राहुल गांधींच्या टीममधील आणि निकटवर्तीयांमधील मानले जाणारे मिलिंद देवरा आणि उत्तर-मध्य मुंबईमधून प्रिया दत्त निवडणूक लढवतील.
नाना पटोलेंसमोर गडकरींना हरविण्याचं आव्हान
"नाना पटोले हे लढवय्ये नेते आहेत. नागपूरमधून लढणार का, अशी विचारणा झाल्यावर त्यांनी तातडीने होकार दिला. मात्र आता त्यांच्यासमोर गडकरींना हरविणं हे मोठं आव्हान असणार आहे," असं मत ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
"गडकरी हे नागपूरमधील लोकप्रिय नेते आहेत. दुसरीकडे नाना पटोले हे मूळचे नागपूरचे नाहीत. त्यांनी गेल्यावेळेस भंडारा-गोंदियामधून निवडणूक लढवली होती. काँग्रेसकडे नागपूरमध्ये गडकरींना आव्हान देऊ शकणारे उमेदवारच नव्हते. पहिल्यांदाच नागपूरमध्ये बाहेरचा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवत आहे. पण काँग्रेसमधील स्थानिक नेते नाना पटोलेंना किती मदत करणार, हाही एक प्रश्न आहे, असं सुनील चावके यांनी म्हटलं.
"सध्या तरी गडकरींना हरवणं हे कठीण दिसत आहे, मात्र नाना पटोलेंमुळे या लढतीत चुरस नक्कीच आली आहे," असं चावके यांनी म्हटलं.
प्रिया दत्त यांची नाराजी दूर
माजी खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पत्र लिहून प्रिया दत्त यांनी आपला निर्णय कळवला होता. वैयक्तिक कारणांसाठी हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. मात्र काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा होती. मात्र राहुल गांधी यांच्याशी चर्चेनंतर प्रिया दत्त यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं निश्चित केलं.
भावनिक दबावाचं राजकारण
"ज्या पद्धतीनं प्रिया दत्त आणि मिलिंद देवरांना उमेदवारी मिळाली होती, ते पाहता गटबाजीचं कारण पुढे करत दोघांनीही पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असंच दिसतं," असं मत पत्रकार किरण तारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
"प्रिया दत्त यांनी राहुल गांधींना अतिशय भावनिक पत्र लिहिलं होतं. मात्र त्यांचा सूर हा मी पक्षासाठी दिलेलं योगदान तुम्ही लक्षात घेत नाही, असाच होता. माझ्याऐवजी कृपाशंकर सिंह, नसीम खान किंवा नगमा यांना उमेदवारी देऊन पहा असंही त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवून पाहिलं. या दबावानंतर काँग्रेसनं दोन वेळा निवडून आलेल्या प्रिया दत्त यांनाच प्राधान्य दिलं," असंही किरण तारेंनी म्हटलं.
प्रिया दत्त यांची लढत आता विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याशीच होऊ शकते, असा अंदाजही किरण तारे यांनी व्यक्त केला. "पूनम महाजन यांचा मतदारसंघ बदलण्याची चर्चा होती. मात्र प्रिया दत्त यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघ बदलल्यास चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे पूनम महाजन आणि प्रिया दत्त अशीच लढत होण्याची शक्यता आहे" असं किरण तारेंनी म्हटलं.
किरण तारेंनी सांगितलं, की गेल्या पाच वर्षांत प्रिया दत्त यांचा जनसंपर्क पूर्णपणे तुटला आहे. त्या मतदारसंघात फारशा सक्रीय नाहीत. अशा परिस्थितीत त्या मतदारांच्या मनात पुन्हा स्थान कसं मिळवणार हा प्रश्न आहे.
किरण तारेंनी मिलिंद देवरांच्या उमेदवारीबद्दलही प्रतिक्रिया व्यक्त केली.
"प्रिया दत्त यांच्याप्रमाणे मिलिंद देवरांनीही निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या पाच वर्षांत त्यांचाही मतदारसंघात फारसा संपर्क नाही. निवडणुका तोंडावर आल्यावर त्यांना आपल्या मतदारसंघातील समस्या आठवल्या. मात्र तरीही मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळणं स्वाभाविक होतं. कारण ते राहुल गांधीच्या जवळचे मानले जातात."
उमेदवार नसल्यामुळे सुशील कुमार शिंदेंचं नाव पुढं
सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे दुसरा उमेदवारच नव्हता. त्यामुळे 77 वर्षीय सुशील कुमार शिंदे यांचं नाव पुढे करण्यात आलं. ते भारताचे गृहमंत्री असताना शरद बनसोडे यांच्याकडून पराभूत झाले होते. बनसोडे हे अंदाजे दीड लाख मतांनी पुढे होते. शिंदे यांच्या उभं राहण्यामुळे काँग्रेसचं निदान डिपॉजिट तरी वाचू शकतं. त्यांच्या मुलीच्या नावाची चर्चा सुरू होती पण पुन्हा सुशील कुमार यांचेच नाव पुढे करण्यात आलं. सुशील कुमार शिंदे यांचा जनसंपर्कही म्हणावा तितका राहिला नाही, असं सोलापूरमधील ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी सांगितलं. शिंदे यांच्याविरोधात जय सिद्धेश्वर स्वामी उभे राहू शकतात, असा अंदाजही जोशी यांनी व्यक्त केला.
यादीमध्ये राज बब्बर, सावित्रीबाई फुलेंचंही नाव
महाराष्ट्रातल्या पाच नावांव्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील 16 उमेदवारांची नावही काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. मोरादाबादमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 2009 मध्ये फिरोझाबाद पोटनिवडणुकीमध्ये राज बब्बर यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत मात्र गाझियाबादमधून निवडणूक लढविणाऱ्या राज बब्बर यांना व्ही. के. सिंह यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
या यादीतलं अजून एक महत्त्वाचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. बहराइच इथून खासदार म्हणून निवडून आलेल्या सावित्रीबाई फुले यांनी गेल्या वर्षी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसनं त्यांना बहराइचमधूनच उमेदवारी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)