You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मित्रपक्षांना सोबत घेऊन जाताना काँग्रेसची कोंडी झाली आहे का?
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे हे भारतीय जनता पक्षात गेले. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडी आणि काँग्रेसमध्येही चर्चा पूर्ण होऊ शकली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जाहीर केलं की ते माढ्यातून लढणार नाहीत. काँग्रेस आणि मित्रपक्षांची ज्या ठिकाणी आघाडी झाली त्या ठिकाणी तसंच ज्या ठिकाणी आघाडी होऊ शकली नाही त्या ठिकाणी काँग्रेसची कोंडी झाली आहे का, या प्रश्नाचा बीबीसीनं वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सुजय विखे पाटील भाजपमध्ये
आपण गेल्या तीन वर्षांपासून लोकसभेची तयारी करत होतो. त्यामुळे अहमदनगरची जागा ही काँग्रेसला सुटेल असं मला वाटत होतं. पण तसं झालं नाही आणि मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मला या ठिकाणी भविष्य दिसलं म्हणून मी इथं आलो, असं सुजय विखे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.
राष्ट्रवादीच्या तिकिटावर जागा लढावी असा प्रस्ताव तुम्हाला मिळाल्याची चर्चा होती, मग तुम्ही राष्ट्रवादीमध्ये का गेला नाहीत असं विचारलं असता ते म्हणाले,"राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याशी माझं याबाबत बोलणं झालं नाही. पण जर पक्षच बदलायचा असेल तर मी भाजपसोबतच जाणं पसंत करेन."
महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे सांगतात की "सुजय विखेंच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसची कोंडी झाली. कारण विरोधी पक्षाच्या नेत्याचा मुलगा जर भाजपमध्ये जातो तर त्याचं उत्तर राधाकृष्ण विखे पाटलांना द्यावेच लागणार आहे. प्रचाराच्यावेळीही ते मतदारांना कसं सामोरं जातील हा प्रश्न आहे. असं असलं तरी भाजपचा खूप मोठा राजकीय फायदा झाला असं समजण्याचं कारण नाही."
"विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा आपल्या पक्षात आणून काँग्रेसवर कशी नामुष्की आणली असं कदाचित काही भाजप नेत्यांना वाटू शकतं. पण त्यापलीकडे त्या गोष्टीला फारसं महत्त्व आहे असं मला वाटत नाही. कारण अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी आहेत. विद्यमान खासदाराला डावलून दुसऱ्या उमेदवाराला तिकिट दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश जातो," असं ते पुढे सांगतात.
शरद पवारांना माढ्यातून माघार घ्यावी लागली
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे माढातून निवडणूक लढविणार होते. पण पार्थ पवार यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आणि शेवटी एकाच कुटुंबातील किती सदस्यांनी निवडणूक लढवावी असं म्हणत शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली.
आता या ठिकाणी नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची असा पेच राष्ट्रवादीसमोर उभा राहिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शरद पवारांच्या या निर्णयामुळे थेट काँग्रेसची कोंडी झाली नसली तरी शरद पवारांच्या निर्णयाचा परिणाम काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रणनीतीवर पडू शकतो अशी चर्चा आहे.
"जेव्हा शरद पवारांनी आपण निवडणूक लढवणार नाहीत हे सांगितलं तेव्हाच त्यांनी हे स्पष्ट करायला हवं होतं की तिथून कोण लढणार? पण अद्याप तिथला उमेदवार जाहीर न झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आलं आहे," असं चोरमारे सांगतात.
काँग्रेस आघाडीला मिळाली नाही प्रकाश आंबेडकरांची साथ
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी एकत्र येऊ शकली नाही. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीचे 22 उमेदवार जाहीर केले आहेत. ते कायम ठेवा अशी मागणी आंबेडकर यांनी केली होती. त्यांची ही मागणी काँग्रेसने मान्य केली नाही.
वंचित आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी एकत्र न आल्यामुळे पर्यायाने काँग्रेस-राष्ट्रवादीचं नुकसान झालं, कारण त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
"प्रकाश आंबेडकर यांची जागांची मागणी अवास्तव आहे, पण चर्चेने मार्ग काढता आला असता. 2014 मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला बाजूला ठेवल्याने काँग्रेस आणि राष्ट्रावादीचं नुकसान झालं होतं," असं राजकीय विश्लेषक विलास आठवले यांनी बीबीसीला सांगितलं.
राष्ट्रीय स्तरावर मायावतींना सोबत घेण्यात काँग्रेसला अपयश आलं आहे. काँग्रेससोबत जाण्यास बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी नाराजी दर्शवली आहे. काँग्रेसबरोबर उत्तर प्रदेशातच नव्हे तर देशात इतर कुठेही आपण सोबत जाणार नसल्याचं मायावतींनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळाली आहे तसंच तामिळनाडूमध्ये काँग्रेसला डीएमकेची साथ मिळाली आहे. अजून इतर ठिकाणी बोलणी सुरू असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
'काँग्रेसमुळेच मित्रपक्षांची कोंडी'
काँग्रेसवर मित्रपक्षांना सोबत घेण्यास दिरंगाई करताना दिसत आहे का, असं विचारलं असता ज्येष्ठ पत्रकार सुनिल चावके सांगतात "ते दिरंगाई करत नाहीत पण त्यांचं काम अतिशय संथगतीनं चाललंय असं दिसतंय. त्यांना उत्तर प्रदेशात कुणाची साथ नको होती."
"बंगालमध्ये ते डाव्या पक्षांसोबत जाण्याच्या तयारीत आहेत. बिहारमध्ये देखील बोलणी सुरू आहेत. ही बोलणी अतिशय धिम्यागतीनं चालू आहे, त्यात गांभीर्याचा अभाव दिसतो त्यामुळे त्यांची कोंडी झाली असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या मित्रपक्षांचीच कोंडी झाली आहे," असं चावके सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)