मसूद अझहरला दहशतवादी घोषित करायला चीनचा पुन्हा विरोध - बीबीसी मराठी राऊंड अप

बीबीसी मराठीवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा राऊंड अप

1) मसूद अझहरला दहशतवादी घोषित करायला चीनने पुन्हा केला विरोध

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायला चीनने पुन्हा विरोध केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चीनने नकाराधिकाराचा वापर करत मसूदची अप्रत्यक्ष पाठराखण केली आहे.

मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसमोर फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि अमेरिका यांनी 27 फेब्रुवारी रोजी मांडला होता.

पाच देशांकडे सुरक्षा परिषदेचं कायम सदस्यत्व आहे - अमेरिका, फ्रान्स, युनायटेड किंगडम, चीन आणि रशिया. यांपैकी कोणताही एक सदस्य आपल्या नकाराधिकाराचा वापर करून कोणताही प्रस्ताव हाणून पाडू शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत नक्की काय घडलं हे वाचण्यासाठी इंथं क्लिक करा

2) युद्धकैद्याची पत्नी एवढीच दमयंती तांबेंची ओळख नाही...

दमयंती तांबें पती फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे भारतीय वायूसेनेत होते. 1971 च्या युद्धात लढताना त्यांचं विमान पाकिस्तानी सैन्याने मुलतानजवळ पाडलं आणि त्यांना ताब्यात घेतलं. त्यावेळी त्यांच्या लग्नाला फक्त 18 महिने झाले होते.

पाकिस्तानाच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन 50 तासात परतले, तशा दमयंती तांबेच्या बातम्या यायला लागल्या.

गेली 48 वर्षं पाकिस्तानात अडकलेल्या नवऱ्याला परत आणण्यासाठी त्या झगडतेय. त्यांचा 48 वर्षांचा संघर्ष जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा

3) प्रियंका गांधींनी घेतली चंद्रशेखर आझादांची भेट

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली. ANI या वृत्तसंस्थेनं प्रियंका गांधी आणि चंद्रशेखर आझाद यांच्या भेटीचं वृत्त दिलं आहे.

चंद्रशेखर आझाद यांना मंगळवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अटक केली आहे. निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या संख्येपेक्षा अधिक मोटरसायकल घेऊन रॅली काढल्याबद्दल चंद्रशेखर आझाद यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर तसंच ज्योतिरादित्य सिंधिया हेदेखील होते. प्रियंका-चंद्रेशेखर भटीत काय घडलं हे सविस्तर वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

4) अजित डोवाल यांचा सध्या सगळ्यात कठीण काळ आहे का?

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणजे नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून डोवाल भाजपच्या जवळ आले असं नाही. लालकृष्ण अडवाणीसुद्धा त्यांना बरंच महत्त्व देत असत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या डोवाल यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत. डोवाल एक अतिशय चाणाक्ष गुप्तहेर आणि संरक्षण तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. मात्र गेल्या काही दिवसांत भारतावर झालेले कट्टरवादी हल्ले आणि शेजारी देशांशी संबंधांत आलेला तणाव यामुळे त्यांच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. अजित डोवाल यांचा सध्या सगळ्यांत कठीण काळ आहे का? सविस्तर जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.

5) रघुराम राजन म्हणतात, 'भांडवलशाही गंभीर संकटात'

"भांडवलशाही सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकत नसल्याने तिच्यासमोर गंभीर संकट उभं राहिलं आहे," असं मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे.

"भांडवलशाही लोकांपर्यंत पोहोचली नाही तर अनेक जण त्याविरुद्ध बंड पुकारतील," असं राजन यांनी BBC Radio 4च्या टूडे प्रोग्राम या कार्यक्रमात म्हटलं आहे.

"अर्थव्यवस्थेचा विचार करता सरकारला सामाजिक विषमतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही," असंही त्यांनी म्हटलंय.

राजन यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कार्यभार सांभाळला आहे.

"भांडवलशाही समोर गंभीर संकट उभं राहिलं आहे असं मला वाटतं, कारण ती लोकापपर्यंत पोहोचवणं थांबवण्यात आलं आहे. पण असं झाल्यास लोक भांडवलशाहीविरोधात बंड पुकारतील," असं राजन यांनी म्हटलंय. राजन या मुद्द्यावर आणखी काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)