You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रघुराम राजन म्हणतात, 'भांडवलशाही गंभीर संकटात'
"भांडवलशाही सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकत नसल्याने तिच्यासमोर गंभीर संकट उभं राहिलं आहे," असं मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे.
"भांडवलशाही लोकांपर्यंत पोहोचली नाही तर अनेक जण त्याविरुद्ध बंड पुकारतील," असं राजन यांनी BBC Radio 4च्या टूडे प्रोग्राम या कार्यक्रमात म्हटलं आहे.
"अर्थव्यवस्थेचा विचार करता सरकारला सामाजिक विषमतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही," असंही त्यांनी म्हटलंय.
राजन यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
"भांडवलशाही समोर गंभीर संकट उभं राहिलं आहे असं मला वाटतं, कारण ती लोकापपर्यंत पोहोचवणं थांबवण्यात आलं आहे. पण असं झाल्यास लोक भांडवलशाहीविरोधात बंड पुकारतील," असं राजन यांनी म्हटलंय.
"पूर्वी चांगल्या शिक्षणानंतर ठिकठाक नोकरी मिळणं शक्य होतं. पण 2008 मधल्या जागतिक आर्थिक संकटानंतर परिमाणं बदलली आहेत. आता तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचं असेल, तर तुमच्याकडे उच्च दर्जाचं शिक्षण असायला हवं," राजन सांगतात.
"दुर्दैवानं जागतिक व्यापारामुळे धक्का पोहोचलेल्या समुदायातल्या लोकांना योग्य शिक्षण, वाढती गुन्हेगारी आणि सामाजिक अस्थिरता यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये तग धरता येत नाहीये," ते पुढे सांगतात.
जागतिक आर्थिक संकटामुळे जगभरातील कर्जाच्या प्रमाणात 50 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे, असं S&P Global Ratingच्या अहवालात म्हटलं आहे. या अहवालानुसार, 2008पासून सरकारी कर्जात 77 टक्के, तर व्यावसायिक कर्जामध्ये 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
"येणारं आर्थिक संकट हे 2008च्या अर्थिक संकटाएवढंच गहिरं असू शकतं," असंही अर्थ विश्लेषकांनी म्हटलंय.
भांडवलशाही समान संधी पुरवत नसल्यामुळे मोडून पडत आहे, असं राजन यांना वाटतं.
"भांडवलशाही समान संधी उपलब्ध करून देत नाहीये. खरंतर यामुळे त्यांचं नुकसान होत आहे जी माणसं खूपच वाईट स्थितीत आहेत," असं ते म्हणतात.
"जेव्हा सर्व उत्पादनाची साधनं सरकारच्या हाती जातात तेव्हा सरकारचा धाकदपटशा वाढतो, मला वाटतं बॅलन्स राखणं खूप गरजेचं आहे. संधींमध्ये सुधारणा करण्यासाठी गरज आहे."
वस्तूंच्या व्यापाराविषयीच्या मर्यादेबद्दल ते म्हणाले, "आपण जर असा अडथळा आणला, तर तेसुद्धा आशा प्रकारचा अडथळा आपल्या वस्तूंवर आणायचा प्रयत्न करतील. आपण त्यांना वस्तू पाठवण्याची गरज आहे आणि अशी बंधन आणल्यास आपण व्यापार कसा करू शकतो?"
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)