You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुलवामा हल्ल्याची बातमी कळली, तेव्हा मोदी प्रचारासाठीच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते - काँग्रेस
पुलवामात कट्टरवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवानांनी प्राण गमावले. देश शोकात होता, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचार, प्रसारासाठीच्या व्हीडिओ शूटिंगमध्ये व्यग्र होते, असा गंभीर आरोप काँग्रेसनं केलाय.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपच्य नेत्यांवर टीकास्त्र डागलं.
पुलवामातील अंवतिपुरा भागात 2500 CRPF जवानांची तुकडी रस्त्याच्या मार्गे जात होती. त्यावेळी स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं सीआरपीएफ जवानांच्या बसला धडक दिली. ज्यात 40 जवानांनी प्राण गमावले.
"14 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी CRPF जवानांवर हल्ला झाला. 5 वाजून 15 मिनिटांनी काँग्रेसनं शोक व्यक्त करत या कठीण स्थितीत पक्ष शहीदांच्या कुटुंबासोबत आणि सरकारसोबत असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामनगरच्या कॉर्बेट नॅशनल पार्कात प्रचार, प्रसाराठीच्या फिल्मचं शूटिंग करत होते. बोट राईड करण्यात मग्न होते." असा आरोप रणदीप सुरजेवालांनी केला. यावेळी त्यांनी मोदींचे 14 फेब्रुवारीचे फोटोही पत्रकारांना दाखवले.
दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. "विरोधक आता आपला खरा रंग दाखवत आहेत," असं ते PTI वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
पुढे रणदीप सुरजेवाला यांनी नरेंद्र मोदींच्या हल्ल्यादिवशीच्या कार्यक्रमाचं मिनिटा-मिनिटांची माहिती दिली.
"दिवसभर कॉर्बेटचं पर्यटन केल्यानंतर पंतप्रधानांचा ताफा धनगडीकडे आला. संध्याकाळी 6.30 वाजता त्यांनी धनगडी इथं 10 मिनिटं अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 6.40 वाजता ते धनगडीतून पंतप्रधान रवाना झाले. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांनी नरेंद्र मोदी जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. 7 वाजता ते रामनर गेस्ट हाऊसवर पोहोचले. तिथं त्यांनी चहा आणि नाश्ता केला." असंही सुरजेवालांनी म्हटलंय.
त्यामुळेच देश ज्यावेळी जवानांच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करत होता तेव्हा देशाचे पंतप्रधान फिल्मच्य शूटिंगमध्ये, बोटिंगमध्ये आणि चहा-नाश्ता करण्यात व्यस्त होते ही अतिशय लाजिरवाणी बाब असल्याचं सुरजेवाला म्हणाले.
इतकंच नव्हे तर देशाच्या 40 सुपुत्रांनी प्राण गमावल्यानंतरही मोदींनी राष्ट्रीय शोक जाहीर केला नाही. कारण त्यांना उद्घाटनं आणि जाहीर सभा करायच्या होत्या. 16 फेब्रुवारीलाही जेव्हा जवानांचे मृतदेह दिल्लीत आणले त्यावेळी मोदी त्यांना वंदन करण्यासाठीसुद्धा 1 तास उशीरा पोहोचले. ते झांसीवरून थेट घरी गेले आणि त्यानंतर जवानांना अभिवादन करायला पोहोचले. मृत सैनिकांचे नातेवाईक घरी वाट पाहात असताना मोदींनी स्वत:च्या राजकीय कार्यक्रमासाठी जवानांचे मृतदेह घरी रवाना करण्यात 1 तास उशीर केला असा आरोपही सुरजेवालांनी केलाय.
काँग्रेसचे नरेंद्र मोदी यांना पाच प्रश्न
1.पंतप्रधान तुम्ही, तुमचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृहमंत्री आणि गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्यानं 40 जवानांचे प्राण गेले. त्याची जबाबदारी तुम्ही का घेत नाही?
2.स्थानिक कट्टरवाद्यांकडे शेकडो किलो आरडीएक्स, एमफोर कार्बाईन, रॉकेट लाँचर कसे पोहोचले? तुम्ही मनमोहन सिंगांना हेच प्रश्न विचारले होते. आता याचं उत्तर नरेंद्र मोदींनी द्यायला हवं
3.जम्मू-श्रीनगर हायवेवर जेव्हा CRPFजवानांची एवढी मोठी तुकडी प्रवास करत होती, तेव्हा सॅनिटायझेशनसाठी स्टँडर्ड प्रोटोकॉल असतो, मग तरीही कट्टरवाद्यांची कार तिथं कशी पोहोचली?
4.मोदी सरकारने पुलवामा हल्ल्याआधी 48 तास आधी जैश ए मोहम्मदच्या धमकीवजा व्हीडिओकडे दुर्लक्ष का केलं?
5.जवानांसाठी विमानानं ने-आण करण्याची सोय असावी असं पत्र CRPFनं गृहखात्याला पाठवलं होतं, विनंती केली होती. ती गृहखात्यानं का फेटाळून लावली?
याशिवाय सुरजेवाला यांनी मोदी सरकारनं नोटाबंदीनंतर अतिरेकी हल्ले थांबतील असा दावा केला होता. मग तसं का झालं नाही? भाजपाचे नेते शहीद जवानांच्या अंत्ययात्रेत हसताना, सेल्फी घेताना दिसत आहेत. या लाजिवाण्या आचरणावर मोदी का बोलत नाहीत? अशा प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
पुलवामा हल्ल्याचं राजकारण करू नका, असं आवाहन नरेंद्र मोदी यांन केलं होतं. त्यानंतरही अमित शाह यांनी आसाममध्ये जवानांचे बलिदान फुकट जाणार नाही कारण केंद्रात भाजप सरकार आहे, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसनं पंतप्रधान मोदींसह भाजपला पुलवामा प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय.
त्यामुळे निवडणुकीत जवानांच्या प्राणांचं बलिदान हा मतांच्या बेगमीसाठीचा हुकमी मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान काँग्रेसच्या आरोपांवर सरकारच्या वतीने रविशंकर प्रसाद म्हणाले, "काँग्रेसला पुलवामा हल्ल्याची माहिती होती का? आम्हाला तर नव्हती."
प्रसाद म्हणाले की एकीकडे संपूर्ण देश सैन्याच्या बाजूने उभा असताना काँग्रेसचे हे आरोप सैनिकांचं मनोधैर्य कमी करणारे आहेत. "काँग्रेसचे खरे रंग आता समोर येत आहेत."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)