हैदराबादच्या डी-मार्टमधून अतिरेक्याला अटक? सावधान, 'तो' व्हीडिओ खोटा – फॅक्ट चेक

    • Author, फॅक्ट चेक
    • Role, बीबीसी न्यूज तेलुगू

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

असाच एक व्हीडिओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतोय, ज्यामध्ये हैदराबादमधील एका डीमार्टमधून एका अतिरेक्याला ताब्यात घेण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण त्याची सत्यता कुणीही पडताळून न पाहता तो सर्रास शेअर केला जातोय. पण या व्हीडिओमागचं नेमकं वास्तव काय आहे?

मुळात हा व्हीडिओ हैदराबादमधला नाहीये. या व्हीडिओमध्ये जे पोलीस दिसत आहेत, ते खरे आहेत मात्र ते हैदराबादचे नाहीत तर महाराष्ट्र पोलीस आहेत.

आणि त्यांची ही कारवाईसुद्धा खरी नसून ती हा व्हीडिओ एका मॉक ड्रिलचा आहे... तोही मुंबईजवळचा.

कुठे...केव्हा...कसं?

हा व्हीडिओ मुंबईनजीकच्या विरारमधल्या एका डी-मार्ट सुपरमार्केटचा आहे. इथे पालघर जिल्हा पोलिसांनी 14 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता दंगलविरोधी पथक आणि शीघ्र कृती दलाच्या सहकार्यानं एक मॉक ड्रिल केलं होतं.

'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वेबसाइटवर त्याच दिवशी आणि 'मिड डे'नं दुसऱ्या दिवशी या मॉक ड्रीलचं वृत्तही प्रसिद्ध केलं होतं.

या ड्रिलदरम्यान पोलिसांचं एक पथक अचानकपणे डी-मार्टमध्ये आलं आणि त्यांनी सुपरमार्केट सील केलं. त्यानंतर त्यांनी बॉम्ब बाळगणाऱ्या एका संशयित अतिरेक्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि अर्ध्या तासानंतर पोलिसांनी एका अतिरेक्याला ताब्यात घेतलं, अशी माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली होती.

अचानक झालेल्या या कारवाईनं मार्केटला आलेले ग्राहक भांबावून गेले होते. मात्र पोलिसांनी हे मॉक ड्रिल असल्याचं स्पष्ट केलं. तोपर्यंत अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा सर्व प्रकार चित्रित करून सोशल मीडियावर अपलोडही केला होता.

'लोकमत'चे फोटोग्राफर हनीफ पटेल यांनी या कारवाईचे फोटो काढले होते. त्यांनी त्याच दिवशी आपल्या फेसबुक पेजवरही हे फोटो टाकले होते. हनीफनं फेसबुक पोस्टमध्ये हा मॉक ड्रिलचा व्हीडिओ असल्याचं स्पष्ट केलं होतं.

पण हा व्हीडिओ कुणीतरी मुंबईऐवजी तो हैदराबादमधला आहे, असं सांगून पुन्हा पोस्ट केला आणि काही वेळातच तो व्हायरल झाला.

महाराष्ट्र पोलिसांकडूनही दुजोरा

बीबीसीनं या कारवाईचं तथ्यं जाणून घेण्यासाठी पालघर जिल्हा पोलिसांशीही संपर्क साधला. त्यांनी देखील डी-मार्टमधील कारवाई केवळ मॉक ड्रिल असल्याचं स्पष्ट केलं.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, या व्हीडिओमध्ये पोलिसांच्या युनिफॉर्म लोगो नीट दिसत नसला, तरी पोलिसांच्या गाडीवरचा लोगो महाराष्ट्र पोलीसचा आणि त्यावरील अक्षरं देवनागरी लिपीमधील असल्याचं दिसत आहे.

हैदराबाद पोलिसांनीही हा व्हीडिओ दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलं आहे. हैदराबाद पोलिसांनी 16 फेब्रुवारीला यासंबंधी एक पत्रकही प्रसिद्ध केलं आहे. शमशाबाद विभागाचे पोलीस उपायुक्त एन. प्रकाश रेड्डी यांच्या स्वाक्षरीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हा व्हीडिओ हैदराबादमधील नसल्याचं म्हटलं आहे.

पालघर पोलिसांनी आवर्जून सांगितलं आहे की जर तुम्हाला कुणाकडूनही अशा प्रकारचा मजकूर किंवा व्हीडिओ आला तर त्याची शहानिशा केल्याशिवाय तो फॉरवर्ड करू नका.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)