You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
800 बाँब निकामी करणारे पोलिसांचे 'मोदीजी'
- Author, रवी प्रकाश
- Role, रांचीहून बीबीसी हिंदीसाठी
"माझे वडील शिक्षक होते. त्यामुळे लहानपणी मला साधा सुतळी बॉम्ब फोडण्याची परवानगीही मोठ्या मुश्किलिनं मिळायची. माझा हात भाजेल, अशी काळजी वडिलांना सतत वाटायची. अनेकदा दिवाळीमध्ये आम्ही साधा फुलबाजाही उडवला नाही. आता मात्र मोठे मोठे बॉम्ब निकामी करताना भीती वाटत नाही. फटाके वाजवण्यापेक्षाही हे काम सोपं आहे. मी हे काम खूप एन्जॉय करतो."
हे सांगताना असित कुमार मोदींच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक येते. असित झारखंड पोलिस सेवेत इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहेत. आपल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत असित यांनी 800हून अधिक बॉम्ब निकामी केले आहेत. यामध्ये मोठा विध्वंस करू शकणाऱ्या 40 किलो वजनाच्या बाँबचाही समावेश होता. असित मोदींच्या बोटांनी त्यांना कधीच दगा दिला नाही. आतापर्यंत प्रत्येक वेळी बाँब निकामी करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
मुख्यमंत्री पदकानं असित यांना गौरविण्यात आलं असून पोलिस विभागानंही अनेक प्रशस्तिपत्रकांनी त्यांचा सन्मान केला आहे. झारखंडचे पोलिस महासंचालक दिनेश कुमार पांडेय यांनी नुकतंच दहा हजार रुपयांचे पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला.
सध्या असित अतिशय व्यस्त आहेत. आपल्या मुलांना आणि पत्नीलाही ते वेळ देऊ शकत नाहीत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे.
असित मोदी यांच्यावर पोलिस जवानांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भूसुरुंग कसे ओळखायचे तसंच बाँबपासून स्वतःचा बचाव कसा करायचा, यावर असित यांच्या प्रशिक्षणाचा मुख्य भर असेल.
पोलिस महासंचालक दिनेश कुमार पांडेय यांनी असित मोदींच्या कामाची खूप स्तुती केली. "असित मोदींच्या शौर्याचा पोलीस दलाला अभिमान आहे. 800हून अधिक बाँब निकामी करणं ही खूप मोठी कामगिरी आहे," असं पांडेय यांनी म्हटलं.
'पतीवर पूर्ण विश्वास आहे'
असित मोदी यांची पत्नी सुचित्रा गृहिणी आहेत. आपल्या पतीची ओळख एक शूर पोलीस अधिकारी म्हणून आहे, या गोष्टीचा त्यांना अभिमान आहे. त्यामुळेच असित कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत, याचा त्यांना खेद वाटत नाही. मात्र जेव्हा जेव्हा असित बॉम्ब निकामी करण्यासाठी जातात तेव्हा काळजीनं सुचित्रा यांना झोप लागत नाही.
सुचित्रा यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "जेव्हा हे घराबाहेर पडतो, तेव्हा भीती वाटतेच. पण पुन्हा असं वाटतं, की देव आपल्या पाठीशी आहे. शिवाय माझा माझ्या पतीवर पूर्ण विश्वास आहे. याच विश्वासाच्या बळावर आम्ही त्यांची वाट पाहतो."
"कधी कधी त्यांची वाट पाहण्यात 3-4 दिवसही जातात. त्यांच्या मोबाईलला नेटवर्क नसेल तेव्हा तर काळजीत अजूनच भर पडते."
पोलिस सेवेत आल्यावरच पाहिला बाँब
असित कुमार हे बिहारमधील 1994च्या बॅचचे सब-इन्स्पेक्टर आहेत. सध्या ते इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहेत. आपल्या मुलानं पोलिस सेवेत जावं अशी असित कुमार मोदींचे वडील विभूति भूषण मोदी यांची अजिबात इच्छा नव्हती.
ते बोकारो जिल्ह्यातील चंदन कियारी प्रखंड येथील चंदा गावातल्या रामडीह टोला येथे रहायचे. त्यांना सात अपत्यं होती. या सात बहीण-भावंडांमध्ये असित सर्वांत धाकटे होते. त्यामुळे स्वाभाविकच त्यांचे खूप लाडकोड झाले.
असित यांनी बंदूक आणि बाँब पहिल्यांदा पोलिस सेवेत आल्यानंतरच पाहिले. झारखंड राज्याच्या निर्मितीनंतर असित कुमार यांचं कॅडर बदलण्यात आलं आणि ते झारखंडला निघून आले.
'डोन्ट बी ए डेड हीरो'
घरातलं वातावरण एवढं मध्यमवर्गीय, साधं असतानाही असित यांना बाँब निकामी करताना कधी भीती नाही का वाटली, या प्रश्नाला त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. "बाँब निकामी करताना जर घाबरला तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. आपण यशस्वी होणारच या गोष्टीवर तुम्ही ठाम असला पाहिजे. म्हणतात ना, डर के आगे जीत है."
त्यांनी बीबीसीला सांगितलं, "आमच्या वरिष्ठांनी आम्हाला शिकवलं होतं, की डोन्ट बी ए डेड हीरो (आपल्याला मेल्यावर हिरो नाही व्हायचंय) त्यामुळंच पोलीस विभागाच्या मानकांच्या आधारेच (स्टँडर्ड ऑपरेशन्स प्रोसिजर्स) काम करूनच आम्ही बाँब डिफ्युज करतो."
यामध्ये खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण तुमच्या एका चुकीमुळे बाँब निकामी होण्याऐवजी फुटू शकतो. त्यामुळे आम्ही प्रत्येकवेळी पहिलीच वेळ असल्याप्रमाणे आम्ही दक्षतेनं काम करतो.
पहिल्यांदा बाँब निकामी केला तेव्हा...
असित मोदींनी सांगितलं, की माझं पोस्टिंग बिहारच्या गया जिल्ह्यात होतं. तिथं सदर पोलिस स्टेशनमध्ये एक बाँब सहा महिन्यांपासून ठेवण्यात आला होता. मी तोपर्यंत बाँब निकामी करण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं.
"मला वाटलं की माझ्या पोलिस स्टेशनमध्ये ठेवलेल्या बाँबचाही स्फोट होऊ शकतो. पण मी पोलिस स्टेशमध्येच तो बाँबनिकामी केला. ती माझी पहिली केस होती. त्यानंतर जवळपास सव्वाशे प्रकरणं माझ्यासमोर आली. प्रत्येक वेळी मी बाँब निकामी करण्यात यशस्वी झालो. याच दरम्यान पलामूमध्ये नक्षलवाद्यांकडून हस्तगत करण्यात आलेले ग्रेनेडही मी निकामी केले," असं ते म्हणाले.
मोठे बाँबही निकामी
2009 मध्ये रांचीमधल्या अनगडा भागात केन बाँब असल्याची माहिती मिळाली होती, असित मोदी सांगत होते.
ते सांगतात,"आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो, तेव्हा नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या मधोमध 40 किलोंचा बाँब ठेवला होतो. तो तिथेच निकामी करावा लागला. याच्या आधी आम्ही गुमला जिल्ह्यात 25-25 किलो वजनाचे बाँब निकामी केले होते.
अर्थात, बाँब छोटे असोत की मोठे असित यांनी ते निकामी करण्याची पद्धत बदलली नाही.
असित मोदी यांनी रसायन शास्त्रामध्ये पदवी घेतली आहे. त्यांनी अॅडव्हान्स ट्रेनिंग स्कूलमध्ये बाँब निकामी करण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं.
यानंतर पोलिस विभागातील अनेक प्रशिक्षण केंद्रांसोबतच असित यांनी सीमा सुरक्षा दल(BSF) आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) सोबतही प्रशिक्षण घेतलं होतं.
सध्या ते रांचीमध्ये आपल्या नेहमीच्या कामांसोबतच पोलिसांना बाँब निकामी करण्याचं ट्रेनिंग देत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)