भय्यू महाराजांचा मृत्यू ब्लॅकमेलिंगमुळे झाल्याचा मुलीचा दावा : #5मोठ्याबातम्या

आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच महत्त्वाच्या बातम्या :

1.'भय्यू महाराजांचा मृत्यू ब्लॅकमेलिंगमुळे'

आपल्या वडिलांचा मृत्यू ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीमुळे झाला असा आरोप भय्यू महाराज यांची मुलगी कुहू हिने केला आहे.

माझी काळजीवाहक म्हणवणाऱ्या तरुणीने आपल्या वडिलांच्या बेडरुमवर कब्जा केल्याचा आरोप कुहूने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.

भय्यू महाराज मला कुहूप्रमाणे आपली मुलगी मानायचे. त्यांनी मला कुहूची काळजीवाहक म्हणून नेमल्याचा दावा करत कुहू आपला द्वेष करायची असं एका तरुणीनं 31 डिसेंबर रोजी पोलिसांना सांगितलं होतं. त्यानंतर कुहूने हे आरोप केले आहेत.

कुहूनंतर भय्यू महाराजांची पत्नी आयुषी यांच्याकडेही चौकशी केली जाणार आहे. भय्यू महाराज यांच्या आई कुमुदिनी यांनी आपल्या जबाबात या तरुणीने सर्व घराचा ताबा मिळवला होता असं सांगत तिनं महाराजांना धमकावून लाखो रुपयांच्या वस्तू घेतल्याचं म्हटलं होतं. याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

2. मिस्ड कॉलमुळे कोट्यवधी रुपयांचा फटका

मुंबईत दादरमधल्या एका व्यापाऱ्याला सिम स्वॅप प्रकारच्या गुन्ह्याचा फटका बसला आहे. एका रात्रीमध्ये त्यांना तीन वेगवेगळ्या फोन क्रमांकावरुन 6 मिस्ड कॉल आले.

त्यानंतर बँकेमध्ये जाऊन खात्याची तपासणी करताच त्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याचं दिसून आलं. याबाबत त्यांनी सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार नोंदवली आहे.

सिम स्वॅपमध्ये व्यक्तीच्या सर्व हालचाली, व्यवहार यांच्यावर लक्ष ठेवलं जातं. त्यानंतर मोबाइल ऑपरेटरकडे सिम बंद करण्याची विनंती केली जाते. त्यानंतर नवीन सिमवर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) मिळवून आर्थिक व्यवहार केले जातात.

बहुतांशवेळा हे प्रकार शुक्रवार किंवा शनिवारी केले जात असल्यामुळे फसवणूक होत असलेल्या ग्राहकाला मोबाइल गॅलरीपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. तसंच त्याच्याकडे जुने बंद पडलेले सिम असल्यामुळे ओटीपी त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिलं आहे.

3. 'लिव्ह इन नंतर विवाह न झाल्यास सहमतीने ठेवलेले संबंध बलात्कार ठरत नाहीत'

लिव्ह इन रिलेशनशिपनंतर विवाह होऊ शकला नाही तर त्या काळात सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार ठरत नाही, असा स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

महाराष्ट्रातील एका नर्सनं डॉक्टरांशी आपण बराच काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगत तक्रार दाखल केली होती. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं आहे.

सहमतीने ठेवण्यात येणारे संबंध आणि बलात्कार यामध्ये फरक आहे, असं सांगत त्या व्यक्तीला खरंच विवाह करण्याची इच्छा होती की आपली वासना शमवण्यासाठी खोटी आश्वासने देण्यात येत होती हे पाहाणं गरजेचं असल्याचं कोर्टानं सांगितलं.

जर खोट्या आश्वासनाचं प्रकरण असेल तर त्यात फसवणूक किंवा लबाडीचा गुन्हा दाखल करता येईल असं ए. के. सिक्री आणि एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

4. पेटीएम पेमेंटस बँकेला रिझर्व्ह बँकेची परवानगी

पेटीएम पेमेंटस बँक लिमिटेडला रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळाली आहे. आता या बँकेला बँक आणि वॉलेट ग्राहकांसाठी केवायसी सुरू ठेवून नवीन ग्राहक स्वीकारण्याची 31 डिसेंबरपासून अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.

यामुळे ग्राहक पेटीएम पेमेंट बँकेत आपले बचत किंवा चालू खाते सुरू करू शकतील.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात बँकेच्या सीइओ रेणू सट्टी यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून बँकिंग क्षेत्राचा मोठा अनुभव असणारे सतीश गुप्ता व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून रुजू झाले.

पेटीएमच्या पेमेंट बँक व्यवहारांची सुरुवात 2017मध्ये करण्यात आली. लाइव्ह मिंटने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

5. उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे भेट

साताऱ्यामध्ये जावळी तालुक्यात कुडाळमध्ये खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये झालेली भेट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

कुडाळ गावातील एका कार्यक्रमामध्ये दोघेही एकमेकांच्या समोर आले. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांची भेट झाल्यावर दोघांनीही हस्तांदोलन केले आणि मिश्किल गप्पाही मारल्या.

शिवेंद्रराजे यांचा खांदा उदयनराजेंनी दाबल्यानंतर, माझा खांदा सारखा का दाबता असं शिवेंद्रराजे यांनी विचारले. त्यावर उदयनराजे यांनी खांदा किती मजबूत आहे ते पाहातोय असं सांगितलं. तर शिवेंद्रराजे यांनी त्यावर आपला खांदा मजबूत असून हवं तर प्रात्यक्षिक दाखवतो असं म्हटलं.

ही शाब्दिक जुगलबंदी चांगलीच रंगली आणि त्याचे व्हीडिओही व्हायरल झाले आहेत. लोकसत्ताने याबाबत बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)