You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शबरीमला मंदिरात दोन महिलांचा प्रवेश; पुजाऱ्यांनी केली मंदिराची शुद्धी
- Author, इमरान कुरेशी
- Role, बीबीसीसाठी
दोन महिलांनी पोलिस संरक्षणात शबरीमला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. या महिलाचं वय 50 वर्षांपेक्षा कमी आहे. साध्या कपड्यांतील पोलिसांच्या सोबतीनं हा प्रवेश करण्यात आला.
मुख्यमंत्री पी. विजयन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून या महिलांना सुरक्षा पुरवण्यात आल्याचं सांगितलं.
महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिर बंद करण्यात आलं आहे. शुद्धिकरणासाठी मंदिर बंद केलं असल्याची माहिती मुख्य पुजाऱ्यांनी दिली. दुपारी मंदिर पुन्हा सुरू करण्यात आलं.
गेल्या महिन्यात बिंदू आणि कनकदुर्गा या दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. पण विरोध झाल्याने त्या मंदिरात जाऊ शकल्या नाहीत. विरोध करणाऱ्यांत उजव्या विचारांच्या संघटनांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता.
28 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने सर्व महिलांना मंदिरात प्रवेश दिला जावा, असा आदेश दिला होता. त्यानंतर किमान 10 महिलांनी मंदिरात जाऊन पूजा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. मासिक पाळीतील वयातील म्हणजे 10 ते 50 वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही.
भारतीय जनता पक्ष आणि संबंधित संघटना सुप्रीम कोर्टाच्या निर्यणाचा विरोध करत आहेत. महिलांना मंदिर प्रवेशाला असणारा विरोध हा परंपरेचा भाग आहे, अशी भूमिका भाजपची आहे.
दलित लेखक आणि कार्यकर्ते सनी कप्पीकड म्हणाले, "सकाळी 3.45 मिनिटांनी मंदिरात प्रवेश केला. दलित आणि आदिवासी काऊन्सिलच्या कार्यकर्त्यांनी त्यांना संरक्षण दिलं होतं."
एका पोलीस अधिकाऱ्याने मात्र कुणी मंदिरात प्रवेश केला कुणी नाही केला हे कसं सांगता येईल, अशी प्रतिक्रिय दिली आहे.
बिंदू यांनी एका मल्याळी चॅनलला सांगितलं की, "सकाळी 3.45वाजता आम्ही मंदिरा प्रवेश केला आणि स्वामी अय्यप्पाचे दर्शन घेतले. पहाटे 1.30च्या सुमाराला आम्ही मंदिराच्या दिशेने जायला सुरुवात केली. जवळपास 6 किलोमीटर चालून आम्ही मंदिरात पोहोचलो."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)