रमाकांत आचरेकर: सचिन तेंडुलकरच्या गुरूंचं 87व्या वर्षी निधन

ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं वयाच्या 87व्या वर्षी मुंबईत निधन झालं. 'क्रिकेट देव' म्हणवणाऱ्या सचिन तेंडुलकरला घडवण्यात आचरेकर यांचा मोलाचा वाटा आहे.

सचिनने अनेकदा आचरेकर सरांचं ऋण व्यक्त केलं आहे. दरवर्षी गुरूपौर्णिमेला सचिन आवर्जून आचरेकर सरांच्या घरी जायचा.

त्यांच्या निधनाचं वृत्त कळाल्यावर सचिनने एक निवेदन जारी करत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. "आचरेकर सरांनी आम्हाला क्रिकेटच्या बरोबरीने जगण्याचा मार्ग दाखवला. तुमच्या आयुष्याचा आम्हाला भाग होता आलं. तुमच्या मार्गदर्शनामुळे क्रिकेट वृद्धिंगत झालं. Well played, Sir. तुम्ही जिथे असाल तिथे अधिकाअधिक खेळाडू घडवाल.

"देवगतीचं क्रिकेट आचरेकर सरांमुळे समृद्ध होईल. अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे मीही क्रिकेटची धुळाक्षरं सरांच्या मार्गदर्शनाखालीच गिरवली. माझ्या आयुष्यातलं सरांचं योगदान शब्दातीत आहे. त्यांनी उभारलेल्या पायावरच माझी कारकीर्द घडू शकली.

"गेल्या महिन्यात सरांचे आम्ही काही विद्यार्थी त्यांना भेटलो. आम्ही त्यांच्याबरोबर काही वेळ व्यतीत केला. आम्ही जुन्या आठवणी जागवल्या. ते क्षण संस्मरणीय होते," असं सचिन निवेदनात म्हणाला.

सचिनसह विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, अजित आगरकर, प्रवीण आमरे असे अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली घडले.

1932 साली जन्मलेले आचरेकर यांनी 1943 साली खेळायला सुरुवात केली. 1945 मध्ये त्यांनी न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबचं प्रतिनिधित्व केलं.

त्यांनी यंग महाराष्ट्र XI, गुलमोहर मिल्स आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट संघांचंही प्रतिनिधित्व केलं. 1963-64 मध्ये ते एकमेव प्रथम श्रेणी सामना खेळले.

पत्रकार कुणाल पुरंदरे यांनी Ramakant Achrekar: Master Blaster's Master हे आचरेकराचं चरित्र लिहिलं आहे.

1990 मध्ये आचरेकर यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आलं. 2010 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याच वर्षी 'स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड'तर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

फेअरवेल स्पीचमध्ये आभार

16 नोव्हेंबर 2013 रोजी आपल्या निवृत्तीच्या वेळी सचिनने आपल्या संदेशात आचरेकर सरांच्या योगदानाचा उल्लेख केला होता. तो म्हणाला होता, ''अकराव्या वर्षी मी क्रिकेट खेळू लागलो. माझा भाऊ अजित तेंडुलकर याने मला आचरेकर सरांकडे नेलं. तो माझ्या कारकिर्दीतला निर्णायक क्षण होता.

"शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना सरांना स्टँड्समध्ये पाहणं अतिशय आनंद आणि समाधान देणारा क्षण आहे. सर्वसाधारणपणे ते माझ्या मॅचेस घरी टीव्हीवर पाहतात.

"अकरा-बारा वर्षांचा असताना सरांच्या स्कूटरवरबसून मी प्रॅक्टिस मॅच खेळायला जायचो. शिवाजी पार्क, आझाद मैदान असं एकामागोमाग एक मॅचेस मी खेळायचो. मला मॅचेस खेळायला मिळाव्यात म्हणून सर अख्ख्या मुंबईभर मला घेऊन जायचे," असं सचिन तेव्हा म्हणाला होता.

"गेल्या 29 वर्षात सरांनी मला कधीही 'Well played' असं म्हटलं नाही. कौतुकाने हुरळून जाऊन मी मेहनत करणं थांबवेन, असं त्यांना वाटायचं. हा माझा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. आता मी यापुढे खेळणार नाही. त्यामुळे आता ते मला 'Well done' म्हणू शकतात," असं सचिन भावूक होऊन म्हणाला होता.

"क्रिकेट माझा श्वास आणि प्राण आहे. तो सदैव राहील. माझ्या कारकिर्दीला योग्य वळण देण्यात तुमचा मोलाचा वाटा आहे. तुमचा ऋणाईत आहे," अशा शब्दांत सचिनने आचरेकर सरांप्रति कृतज्ञता व्यक्त केली होती.

'क्रिकेटविश्वात पोकळी'

"आचरेकर कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत," असं श्रद्धांजलीपर ट्वीट मुंबई क्रिकेट असोसिएशनने केलं आहे.

"'द्रोणाचार्य' रमाकांत आचरेकर यांच्या निधनाने क्रिकेटविश्वात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी अनेक क्रिकेटपटू घडवले. मात्र त्याहीपेक्षा त्यांनी युवा खेळाडूंना चांगलं माणूस होण्याची दीक्षा दिली. भारतीय क्रिकेटला त्यांचं योगदान अतुलनीय असं आहे," या शब्दांत BCCIने भावना व्यक्त केल्या आहेत.

"रमाकांत आचरेकर सरांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. सचिन तेंडुलकरच्या रूपात त्यांनी भारतीय क्रिकेटला नायक मिळवून दिला," असं माजी भारतीय क्रिकेटपटू V.V.S. लक्ष्मणने ट्वीट केलं आहे.

"आचरेकर सरांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. त्यांनी भारतीय क्रिकेटला सचिन तेंडुलकर दिला," असं माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ म्हणाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)