You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
2019 मध्ये निवडणुका, क्रिकेट वर्ल्ड कप, नव्या वेब सीरिज आणि बरंच काही...
राजकारण, खेळ, चित्रपट, व्यापार, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांसाठी 2018 हे वर्षं घडामोडींनी भरलेलं होतं. सुप्रीम कोर्टाचे अनेक मोठे निर्णयही सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरले.
जमावाकडून झालेल्या हिंसक घटना, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद, राफेल व्यवहारातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आक्रमक झालेले विरोधक, CBIमधील अंतर्विरोध आणि बरंच काही सरत्या वर्षात घडलं.
यापैकी काही मागे सोडून सर्वांनीच नव्या वर्षांच स्वागत केलं. यापैकी काहींचे पडसाद नव्या वर्षांतही उमटतील.
पण तोवर नवीन वर्षांत काय काय घडणार आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तेव्हा घेऊया 2019 मधल्या काही महत्त्वाच्या घटनांचा घेतलेला हा वेध...
लोकसभा निवडणूकः नवीन वर्ष मोदींचं की राहुल गांधींचं?
मोदींची लाट आणि 'अच्छे दिन'च्या आश्वासनांसह 2014 मध्ये केंद्रात भाजपचं सरकार प्रचंड बहुमतानं आलं. या सरकारला पाच वर्षं पूर्ण होताना पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.
यंदाचं वर्ष हे लोकसभा निवडणुकांचं आहे, म्हणजे पुन्हा देशाला कौल देण्याची संधी. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा प्रभाव कायम राहणार की त्यांना कुठला पर्याय निर्माण होणार, हे 2019 मध्ये पहायला मिळेल.
2018 हे वर्ष राहुल गांधी आणि काँग्रेससाठी चांगलंच लाभदायक ठरलं. मात्र 2019 मध्ये त्यांच्या नेतृत्वाची परीक्षाच असेल. सर्व विरोधकांना एकत्र घेऊन भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचं राहुल गांधींपुढे आव्हान आहे. तर नरेंद्र मोदींना आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
विधानसभा निवडणुका
विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं विचार केला तर काँग्रेस आणि भाजपसाठी गत वर्ष संमिश्र स्वरूपाचं ठरलं. कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांत सत्ता मिळवण्यात काँग्रेसला यश मिळालं तर ईशान्य भारतात भाजपनं विजयी झेंडा रोवला.
2019 मध्ये सात राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. हरियाणा, आंध्र प्रदेश, आसाम, ओडिसा, महाराष्ट्र, सिक्कीम, जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील. या निवडणुका जितक्या भाजप आणि काँग्रसेसाठी महत्त्वाच्या आहेत तितक्याच प्रादेशिक पक्षांसाठीही निवडणुकांतील विजय महत्त्वाचा आहे.
राम मंदिराचा मुद्दा
2019च्या लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा राम मंदिराचा मुद्दाही तापू शकतो. त्यातच राम मंदिर प्रश्नाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. 10 जानेवारीला या मुद्द्यावर पुढील सुनावणी होणार आहे.
राम मंदिरावरील सुनावणीला दिरंगाई का होत आहे, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून विचारण्यात आला आहे. तर निवडणुकांपूर्वी सरकारने राम मंदिरावर वटहुकूम काढावा, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही राम मंदिराचा मुद्दा चर्चेत राहू शकतो.
तीन तलाक आणि शबरीमला
राम मंदिराप्रमाणेच 2018 मध्ये चर्चेत राहिलेले आणि 2019 मध्येही चर्चेच्या केंद्रस्थानी राहू शकणारे दोन धार्मिक मुद्दे म्हणजे तिहेरी तलाक आणि शबरीमला मंदिर प्रवेश.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तिहेरी तलाक विधेयक संसदेमध्ये मांडण्यात आलं. लोकसभेत मंजूर झालेलं हे विधेयक राज्यसभेत मात्र अडकलं आहे.
नवीन वर्षात हे विधेयक मंजूर होणार की सरकारला या प्रश्नावर वटहुकूम काढावा लागणारा हा प्रश्न आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्यात येत नव्हता. या भेदभावाविरुद्ध महिला संघटनांनी गेली अनेक महिने निदर्शनं केल्यावर अखेर 2 जानेवारीला दोन महिलांनी मंदिरात पहाटे दर्शन घेतलं. त्यानंतर मंदिराच्या तंत्रीने दरबाराचं "शुद्धीकरण" केलं, ते वेगळंच.
आतापर्यंत दहा महिलांनी अयप्पा स्वामी मंदिरात प्रवेश केला आहे, असं केरळ पोलिसांनी शनिवारी सांगितलं.
बॉलिवुडः राजकीय चित्रपटांचं वर्ष?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे पडघम एका अर्थानं बॉलिवुडमध्येही वाजायला लागले आहेत.
डिसेंबरच्या अखेरीस बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 'ठाकरे'चाही ट्रेलर रिलीज झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कारकिर्दीवर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला.
या चित्रपटांचा वापर राजकीयदृष्ट्या होणार, हे स्पष्टच आहे. 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'चा ट्रेलर भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करून त्याची झलकही दाखवून दिली आहेच.
'ठाकरे' चित्रपटातील काही संवादांवरूनही वाद सुरू झाला आहे. ट्रेलरच्या निमित्ताने सुरू झालेला वाद चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतरही पुन्हा उफाळून येऊ शकतो.
काय होणार ऑनलाइन स्ट्रीमिंगच्या विश्वात?
गेल्या वर्षात मनोरंजनाच्या क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाची घडामोड म्हणजे नेटफ्लिक्स आणि अमेझॉनसारख्या कंपन्यांनी हिंदी भाषेतून प्रसिद्ध केलेल्या वेबसीरिज. टीव्ही आणि चित्रपटाच्या पारंपरिक चौकटी मोडणारा आशय नेटफ्लिक्स आणि अमेझॉनवरून पहायला मिळत असतानाच वेबसीरिजनाही सेन्सॉरची चौकट असावी का, ही चर्चाही सुरू झाली आहे.
या सीरिजमधून दिसणाऱ्या लैंगिकता, हिंसाचाराच्या दृश्यांवर नियंत्रण हवं, असा सूर काहींनी लावला. नवीन वर्षांत अधिकाधिक दर्जेदार ऑनलाइन सीरिजची प्रतीक्षा प्रेक्षकांना असताना ऑनलाइन सीरीजवर सेन्सॉरशिप असावी की नसावी, ही चर्चाही पुढे सुरू राहू शकते.
क्रिकेट वर्ल्ड कप
यावर्षीच्या मे महिन्यात क्रिकेटप्रेमी विश्व चषकाचा आनंद लुटण्यास सज्ज होतील. जवळपास दीड महिना चालणाऱ्या क्रिकेटच्या या महाकुंभात 10 देशांचे संघ सहभागी होतील. या विश्वचषकात भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असणार आहे तर 16 जूनला भारत पाकिस्तानविरुद्ध खेळेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)