You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
2019मध्ये कोणकोणते सण, कधी येणार? सुट्यांच्या प्लॅनिंगसाठी हे वाचा
मावळत्या वर्षात तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ३० डिसेंबरपुढे सोमवार, मंगळवार अशी सुटी घेतली असण्याची शक्यता आहे.
येत्या वर्षामध्येही अशी संधी अनेकदा येणार आहे, जिथे एखादी सुटी टाकल्यावर मोठ्या वीकेंडबरोबर अनेक सुट्या तुम्हाला मिळणार आहेत.
तेव्हा एक नजर टाकूया की कुठे आणि कसं तुम्ही सुट्या टाकून कुटुंबासमवेत काही निवांतपणाचे क्षण प्लॅन करू शकता.
एक सूचना: खालील तारखा महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या काही प्रमुख दिनदर्शिकांवरून काढण्यात आल्या आहेत. यात आम्ही ठरवलेलं काही नाही, बरं का!
1. जानेवारी
वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत 15 जानेवारीला अर्थात मंगळवारी येतोय. प्रजासत्ताक दिन अर्थात 26 जानेवारी शनिवारी येत आहे. त्यामुळे ज्यांची शनिवारी सुटी तशीही असते, ते कदाचित थोडे नाराज होतील. पण ज्यांना नसते, त्यांना 26 तारखेला ध्वजवंदन झाल्यानंतर शनिवार-रविवार असे दोन दिवस सुटीचे मिळणार आहेत.
2. फेब्रुवारी
दुसऱ्या महिन्यात कुठली मोठी सुटी नसली तरी दोन तारखा सांगण्यासारख्या आहेत - 19 फेब्रुवारी तारखेनुसार शिवाजी महाराज जयंती मंगळवारी येतेय. ज्यांना ही सुटी असेल, त्यांच्यासाठी सोमवार साध्य झाल्यास लाँग वीकेंड असू शकतो. अर्थात महाराजांच्या गडकिल्ल्यांना भेट देण्यासाठी फेब्रुवारीचा मोसमही भारी असेल.
प्रेमी जिवांसाठी थोडं अडचणीचं होऊ शकतं, कारण व्हॅलेंटाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारीला गुरुवार आहे.
3. मार्च
मार्च महिन्यात 4 तारखेला सोमवारी महाशिवरात्र, 20 मार्च बुधवारी होळी आणि 21 तारखेस गुरुवारी धूलिवंदन असेल.
आतापर्यंत तुम्हाला फॉर्म्युला लक्षात आला असेलच, तर आम्ही वारंवार ते सांगणं टाळू.
4. एप्रिल
मार्चनंतर सुट्यांचा खरा महिना येतो तो एप्रिल महिना. या महिन्यात रविवारबरोबर अनेक सणांच्या सुट्या मिळणार आहेत. मुलांच्या परीक्षा आटोपून याच दरम्यान शाळांना सुट्याही लागतात, म्हणून प्लॅनिंग आधीच करावे.
6 एप्रिल रोजी शनिवारी हिंदू नववर्षाची सुरुवात होतेय, अर्थातच गुढीपाडवा. त्यानंतर पुढच्याच शनिवारी म्हणजे 13 एप्रिल रोजी रामनवमी असेल.
17 एप्रिल रोजी बुधवारी महावीर जयंती, 19 एप्रिलला शुक्रवारी गुडफ्रायडेची सुटी असेल. 20 जानेवारी रोजी ज्यू धर्मियांचा पासोवर सण आहे. म्हणजे हाही एक मोठा वीकेंड आलाच.
5. मे
मे महिन्यात 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाची सुटी बुधवारी आलीये. त्यानंतर 18 मे रोजी म्हणजे शनिवारी बुद्धपौर्णिमेची सुटी असेल.
6. जून
5 जून रोजी रमजानची सुटी असेल. हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणूनही साजरा केला जातो.
7. जुलै
शुक्रवारी 12 जुलैला आषाढी एकादशी आहे. त्याची तशी सार्वजनिक सुटी नसते, पण वारीच्या निमित्ताने पुण्यासह आसपासच्या अनेक भागात शाळा-कॉलेजांना सुटी असते.
8. ऑगस्ट
ऑगस्ट महिन्यातील सोमवारी 12 ऑगस्ट रोजी बकरी ईद आहे. त्यानंतर गुरुवारी 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन तर आहेच, शिवाय रक्षाबंधनही आहे. त्यामुळे भावा-बहिणींचा हा सण यंदा अनेकांना साजरा करणं शक्य होऊ शकेल.
तर 17 ऑगस्टला पारशी नववर्षदिनाची सुटी असेल.
9. सप्टेंबर
2 सप्टेंबर सोमवारी गणेश चतुर्थी येत आहे. त्यामुळे गणपतीची तयारी करण्यासाठी भाविकांना आदल्या दिवशी रविवार मिळणार आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या लोकांनाही सोमवारच्या आधी शनिवार-रविवार मिळणार आहेत.
त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी मोहरम मंगळवारी आणि 11 सप्टेंबर रोजी बुधवारी ओणमची सुटी काहींना असू शकते. म्हणून ऐन सणांच्या दिवसांतही काही चांगल्या सुट्या लागोपाठ आल्या आहेत.
10. ऑक्टोबर
2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जन्मदिनाची सुटी बुधवारी आली आहे. त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी दसरा सोमवारी आलाय.
मग 25 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी (शुक्रवार), पण नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी रविवारी अर्थात 27 तारखेला आल्याचं कालनिर्णयमध्ये दिसतंय. त्यापाठोपाठ 28ला (सोमवारी) बलिप्रतिपदा आणि 29 ऑक्टोबरला भाऊबीज मंगळवारी आली आहे.
11. नोव्हेंबर
10 नोव्हेंबरला रविवारी ईद-ए-मिलाद आहे. त्यानंतर मंगळवारी 12 नोव्हेंबरला गुरू नानक जयंती आहे.
12. डिसेंबर
2019 मध्ये ख्रिसमस बुधवारी असेल.
घ्या. आता तुम्ही प्लॅनिंग करायला मोकळे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)