2018मध्ये या 12 फोटोंनी वेधलं जगाचं लक्ष

    • Author, केली ग्रोवियर
    • Role, बीबीसी कॅपिटल

2018 संपण्यासाठी काही तास राहिले आहेत. या वर्षभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेण्याची ही वेळ आहे.

या वर्षभरात काही फोटोंनी जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यापैकी हे काही फोटो.

1. झोपून केलेले निदर्शन

जानेवारी महिन्यात लॅटिन अमेरिकेतील होंडुरासमध्ये निवडणुका झाल्या. राष्ट्रपती ऑरलँडो हर्नांदेज पुन्हा एकदा जिंकल्यावर त्यांच्याविरोधात निदर्शने होऊ लागली. यावेळेस होंडुरासमधील टेगुचिगल्पा शहरातील पोलिसांसमोर एका मुलीने आरामात झोपून विरोध दर्शवला. तिचा हा फोटो बराच प्रसिद्ध झाला.

तिच्या या फोटोमुळे स्लीपिंग हर्माफ्रोडिटस या दुसऱ्या शतकातील मूर्तीची आठवण आली. काही लोकांनी या फोटोची तुलना व्हीन्सेंट व्हॅन गॉने 1890 साली काढलेल्या रेस्ट फ्रॉम वर्क या चित्राशी केली.

2. एक्सरे स्टाइल

फेब्रुवारी महिन्यात दक्षिण चीनमधील डोंगुआन शहरात एक विचित्र घटना घडली होती. इथल्या एका रेल्वे स्टेशनवर महिलेची पर्स एक्स-रे मशिनमध्ये गेल्यावर ती महिलाही सरकत्या पट्टट्यावर बसून मशिनच्या आत गेली.

या महिलेचा एक्सरे फोटो सगळ्या जगभरात वायरल झाला. या छायाचित्राची तुलना हजारो वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील मूळनिवासींद्वारे तयार केलेल्या कलाकृतींशी केली जाते.

3. अंतराळात कार

फेब्रुवारी महिन्यात एलॉन मस्कने आपली कार सूर्याच्या कक्षेच्या दिशेने पाठवली होती. या कारमध्ये चालकाच्या जागी पुतळा बसवण्यात आला होता. अंतराळात विहार करणाऱ्या या कारच्या फोटोंनी माध्यमांमध्ये सर्वत्र जागा व्यापली होती.

4. एनबीए सामन्यादरम्यानचा प्रसंग

एप्रिल महिन्यात ह्युस्टन रॉकेट्स या अमेरिकन बास्केटबॉल संघाचा खेळाडू जेम्स हार्डेनचा अचानक तोल गेला. मिनिसोटाच्या टारगट स्टेडियममध्ये हा सामना सुरू होता. तोल गेल्यावर तो पहिल्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकांवर कोसळला. हा फोटो खूप शेअर करण्यात आला. फोटोमध्ये जेम्स हार्डेन आणि प्रेक्षकांचे हावभाव एकदम विचित्र आहेत.

5. लाव्हाची नदी

5 मे रोजी अमेरिकेच्या हवाई बेट हादरले. हवाईमध्ये गेल्या ४० वर्षांमधला सर्वांत मोठा भूकंप झाला होता. बेटावरील किलाउइया ज्वालामुखीचा उद्रेक झाला. खदखदणारा लाव्हा बाहेर येऊन आसपासच्या परिसरात पसरला. लाव्हाचा प्रवाह पाहून थोडावेळ स्तब्धच व्हायला झालं होतं.

6. प्लास्टिकने वेढलेला पक्षी

मे महिन्यात नॅशनल जिओग्राफिक चॅनलच्या एका फोटोग्राफरने काढलेल्या फोटोने सगळ्या जगाला धक्का बसला. पॉलिथिन पिशवीने लपेटलेल्या सारस पक्ष्याचे ते छायाचित्र होते.

प्लास्टिकच्या वाढत्या संकटाचे गांभीर्य या फोटोमुळे स्पष्ट होते. स्पेनमध्ये हा फोटो काढल्यावर फोटोग्राफरने सारस पक्ष्याला प्लास्टिकपासून मोकळे केले. पण जगाभोवती पडलेल्या प्लास्टीकचा फास कसा सुटणार, हा प्रश्न राहतोच.

7. जी-7 परिषद

जून महिन्यात झालेल्या जी-7 परिषदेतील एक फोटो वायरल झाला होता. या फोटोत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप खुर्चीमध्ये बसलेले आहेत आणि बाकी देशांचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्यासमोर मेजावर हात टेकून त्यांच्याकडे पाहात असल्याचं दिसतं.

यामध्ये ट्रंप यांच्यासह अॅँगेला मर्केल यांच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट दिसतात. या फोटोमुळे जी-7 संघटनेतील सदस्य देशांमधील तणावाचे चित्रण झाले.

8. विचित्र खेळ

रशियामध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषकामध्ये एका सामन्यात बेल्जियमचा स्ट्रायकर विन्सेंट कोम्पनीला रोखण्यासाठी जपानचा गोलकिपर उजी कावाशिमाने हवेत उडी मारली होती. हा फोटो अत्यंत वेगळा होता. पीटर डेव्हिड जोसेक यांनी हा फोटो टिपला.

9. अर्ध्यावर आणलेला अमेरिकन झेंडा

अमेरिकेतील सीनेटर जॉन मॅक्केन यांचे ऑगस्ट महिन्यात कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना व्हाईट हाऊसमध्ये गोंधळ उडालेला दिसला. मॅक्केन ट्रंप यांच्या पक्षाचेच राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार होते.

मॅक्केन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आधी ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला. नंतर पुन्हा वर घेण्यात आला. मग टीका होऊ लागल्यावर पुन्हा अर्ध्यावर आणण्यात आला. यामुळे ट्रंप सरकारवर मोठी टीका झाली होती.

10. पॅलेस्टीनी आंदोलक

धुराने काळवंडलेलं आकाश णि समोरून येणारे अश्रुधुराचे गोळे यांचा सामना करत निदर्शने करणाऱ्या पॅलेस्टिनी युवकाचा फोटो चांगलाच प्रसिद्ध झाला. इस्रायली सैनिकांना विरोध करणाऱ्या या तरुणाच्या हातात पॅलेस्टाइनचा झेंडा होता.

या फोटोमुळे लोकांना डेलाक्रोच्या लिबर्टी द लिडिंग पिपल नावाच्या चित्राची आठवण आली. या मुलाच्या दुसऱ्या हातात लगोर असून पॅलेस्टीनी साहसाचं प्रतिक म्हणून हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

11. रोबोटची दुरुस्ती

इंग्लंडमध्ये एका रोबोटचे डोके उघडून दुरुस्ती करणाऱ्या अभियंत्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. जणू एखाद्या जिवंत व्यक्तीचे डोके उघडून त्यात दुरुस्ती करत आहे असा भास या फोटोकडे पाहून होतो.

सायप्रसच्या पिग्मॅलियनच्या एका पौराणिक कलाकृतीची आठवण या फोटोमुळे झाली. त्यातील पात्राला एका दगडी मूर्तीचा इतका लळा लागला की मूर्तीची प्रतिमा त्याच्या हृदयात हळूहळू माणसाप्रमाणे होत गेली.

12. बँक्सीची शक्कल

ब्रिटिश कलाकार बॅंक्सीने गर्ल विथ द बलूनचा लिलाव केल्यावर एक विचित्र घटना झाली. 12 लाख युरोंची किमत मिळाल्यावर त्या पेंटिंगला उतरवण्यात येऊ लागले. मात्र तेव्हा हे पेंटिंग पॅनलमधून बाहेर येऊ लागले आणि त्याच्या खालच्या भागाच्या पट्ट्या झाल्याचे दिसून आले. पण बॅंक्सीनेच त्याच्या फ्रेममध्ये कागदाचे तुकडे करणारे मशीन लावल्याचे दिसून आले. या स्टंटनंतर तयार झालेल्या नव्या कलाकृतीचे नाव लव्ह इज इन द बिन असे करण्यात आले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)